येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Friday, 24 March 2017

सर्वनाश

एक दुःखाच रोपटं उगावलेलं
काळजाच्या खोल आतून
पसरू पाहणाऱ्या सर्वांगभर
त्याच्या बाजींद फांदोळ्या.

ऐकलंय आजकाल वेदनेचा
जबरी भाव सुरु असल्याचं..
शिकव शिकव मला
स्वतःला विकण्याची बाजारबसवी कला.
आताशा सहन होत नाही
हे तुझं जालीम छद्मी हसणं..

छाटून टाकू का मी मला?
झडून जाऊ का? जाऊ विझून?
माझ्यातल्या क्रयशक्तीचा
गळा घोटणारे तुझे लोणीदार हात...

महेंद्र गौतम.

Tuesday, 14 March 2017

सफरचंद

तू सफरचंद खातोस? आजारपणात तर आवर्जून खायला देतात सफरचंद
म्हणतात ना An apple a day keeps the doctor away...
महागडं असण्याशिवाय या फळाची खासियत माहितै का तुला?
हे फळं कधी लवकर कुजलेलं सडलेलं पाहिलंस?? जसं केळी, आंबा द्राक्ष असं कुठलंही फळं चटकन सडतं
तसं सफारचंदाच होत नाही फार फार तर ते सुकतं पण सडत नाही अट फक्त एकच त्याला कोरड्या जागी ठेवायचं.
आयुष्याचंही असंच असतं काहीसं, आपण कायम टवटवीतच राहिलं पाहिजे असं काही नसतंच, कधीतरी सुकलेसुद्धा असूच की, पण त्यामुळे सडायचं कुजायचं का?
तर नाही फक्त शक्य तेव्हढं स्वतःला कोरडं ठेवायचं...
चलता है.....
(लिहिण्यातून)

महेंद्र गौतम.

Sunday, 5 March 2017

एव्हढं करशील माझ्यासाठी..

कोणाच्याच देहाचं होत नसतं सोनं मेल्यावर
माझीही होईल मातीच मी गेल्यावर..
फक्त एक करशील माझ्यासाठी...
जिथं मला पुरशील तिथे दोन झाडं लावशील,
एक निंबाचं अन एक सिताफळाचं.
त्याच्या बाजूलाच लावशील एक हजारमोगऱ्याचं रोपटं.
आणि काळजी घेशील की निंबाच्या फांद्या फांद्यावर
लगडायला हवीत मोहळं...
एव्हढं करशील माझ्यासाठी.???

महेंद्र गौतम.

Monday, 27 February 2017

देह नाजूक साजूक

देह नाजूक साजूक
मन आभाळ निळाई
मन होताच आनंदी
देह बहरली जाई

देह मातीचा बाहुला
मन तरंग आतला
देह झिजतो क्षणांनी
मन बघते हासुनी

मन विखुरल्या वाटा
देह रुतलेला काटा
मन वाहता ओहळ
देह ओहळात गोटा...

मन जांभूळला डोह
देह संन्याशाला मोह
मन देह का अभिन्न??
करू नको उहापोह...

महेंद्र गौतम.

Sunday, 19 February 2017

शिताफी

तू म्हणालीस दोन्ही हात पसरुन
माणसानं चिरंतन प्रकाशाला कवटाळलं पाहिजे.
मी म्हणालो, अंधार हाच असतो शाश्वत.
कारण अंधार असतो तेंव्हा तिथे प्रकाश नसतो,
पण प्रकाश असतो तेंव्हाही तिथे अंधार असतोच असतो.
तू म्हणालीस आपणं सगळी सूर्याची लेकरं,
तेंव्हा का म्हणून नकारात्मक राहायचं?
हुशार आहेस किती शिताफीनं
मला युगायुगापासून सूर्यचं नाकारणाऱ्या
व्यवस्थेबद्दल बोलणं टाळतेस...

महेंद्र गौतम.