लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

तो.....

तो कागद घेउन समोर आला की मला दे माय धरणी ठाय होतं.मी कवी असल्याचा त्याचा मोठाच गैरसमज आहे, तो स्वतःही कवी असल्याचा त्याला साक्षात्कार का काय झालाय म्हणे. तो माझ्या कविता लाईक करतो त्यावर कमेंटस करतो म्हणुन मिही त्याच्या कविता लाईक करुन त्यावर प्रशंसात्मक कमेंटस द्याव्यात किंबहुना ते माझ कर्तव्यच असल्याच त्याला प्रकर्षानं वाटतं, म्हणुन तो मला कवितेत टॅग करतो,(मिही त्याला टॅग करायचा गाढवपणा कधितरी केला होता हो.) मला कविता मेसेज,मेल करतो नाहितर कागद घेउन येउन माझी गचांडी धरुन मला ऐकवतो. त्याचं फेसबुक खातं आहे ' एक प्रेमप्यासा फेसबुक रोमीयो'(सगळ्या मुलखाचे फेक खाते त्याला ऍड आहेत) आणि मागे रात्रीबेरात्री तो जिच्यासोबत चॅटिंग करायचा ते त्याच्याच एका आगाऊ मित्राच फेक खातं होतं हे कळल्यावर त्याचा सतराव्यांदा दिल तुटुन अठराव्यांदा त्याचा प्रेमभंग झाला होता, त्याचा दर्द फारच होऊन गम म्हणुन त्यानं दोनदा गायछाप तंबाखु खाल्ली.(दारु सिगरेट प्यायला त्याच्याजवळ पैसे नव्हते). तर प्रेम ही अनुक्रमे अत्यंत तरल आणि पवित्र भावना आहे असं त्याला अत्यंत कळकळीन वाटतं आणि तो ख-या प्रेमाच्या शोधात असल्याच त्यान कैकदा मला डोळ्यात पाणि आणुन सांगितलयं.. त्याच्या काव्यप्रतिभेचा एक अलौकीक नमुना मी खाली देत असलेली कविता... प्रिये तुझी याद... अशी 'हरदया' मध्ये जागली.. तिव्रतेन जणु हागवण लागली... रेंगाळते याद तुझी मनी माझ्या मैलन मैल तुझी याद तरल अशी जणु एरंडेल तैलं.... (टेम्पो चेंज) प्रिये आठवते मला तुझं बोलणं हासणं.. तुझं रुसणं अन् रुमालाने हळुचं तुझं ते शेंबुड पुसणं.... (टेम्पो चेंज) प्रिये तुझी याद मुळव्याधिचं दुःखणं गं.. रात्रिबेरात्री गाढवान जणु उकिरडे फुकनं गं.. (कवि प्रेमप्यासा) टिप- अक्षरमर्यादेमुळ कवितेच रसग्रहण लांबणीवर टाकत आहोत. आपला महेंद्र कांबळे.

*तुझ प्रकाशाशी नातं...

बरचं लिहुन झाल्यावर काय सांगायच हेच आपल्या लक्षात येत नाही. तुमच झालयं का असं कधी...? माझ झालयं खालची कविता करतांना. **तुझ प्रकाशाशी नातं... जिणं पहाट प्रहरी कुरकुरणार जातं.. अंधारातल्या जलमा तुझं प्रकाशाशी नातं... सुरु देहाचे सोहळे ... राजरोस नंगानाच आत बघ बा एकदा मन मनालाच खातं.. तुझा अबोल रुसवा अन् रागही फसवा... डाव मांडू ये नव्यानं आता नको हारजितं... रानं उनगून गेली सारी उनगली शेतं.. आता प्राजक्त फुलावा.. तुझ्या माझ्या अंगणातं.. महेंद्र कांबळे.

समरांगणाच एक टोक पकडुनं.....

खरं तरं लढाईला तेव्हाचं
तोंड फुटलं होतं...
तुझ्याच काय पण
तुझ्या बापजाद्यांच्याही
जन्माअगोदर.....
किती युग लोटलीत
अन् या लढ्यानेही
किती रुपं घेतलीतं....
त्यात तुझी बाजू अगदीच लगंडी....
काळ्यांची ,शोषितांची,
...
कष्टकरी कामगारांची.....
'तुझं पध्दतशीरपणे खच्चीकरण करतील'..
निरागस मुखवट्याआडून
जिवघेणे वारही होतीलं...
डळमळु नकोस...
कारण प्रत्येक युगात
एक कडवा लढवय्या जन्मतोचं...
म्हणुन समरांगणाच एक टोक पकडुनं...
झुंजत रहा निरंतर...
हिरव्याची पिवळी पानेही होतीलं...
लवकरच संपुर्ण समानतेचे
दिवसंही येतीलं...
महेंद्र कांबळे.
दि.28.11.12

सिध्दार्था....!!!!

स्वतःच्या राजमहालाच्या गच्चीवर
हेलीपॅड असणारे राजेलोक
जेव्हा गोरगरिबांना हातोहात गंडवून
स्वतःच्या तुंबड्या भरतांना बघतो
तेव्हा वाटतं...
सिध्दार्था....!!!!
एवढ्या ऐश्वर्यसंपन्न घरात जन्मूनही
सरळ मनातल्या तृष्णेवरच
कसा हल्ला चढवलास...?
महेंद्र कांबळे.

शाहु...

शाहु...
होते वज्रासम बाहु
मनं मेणाहुन मऊ
खरा लोकांचा तो राजा
माझा छत्रपती शाहु....!
उंटाहुन नका हाकू
शेळ्या सांगत तो होता
अस्पृश्यांच्या हातचा चहा
स्वत: पीतही होता
लोका पाजतही होता
बंद केलं रे वतनं
त्यान रोखलं पतनं
त्यानं कैलं रे कैकांचं
बाप होऊन जतनं
त्याची पहाडी छाती
मर्द पैलवानं गडी
झोपडीत खाई आंबोळी
देई साडी अन् चोळी
करवीर नगरीचा
तो नरवीर राजा
त्याच्यासम कुणीतरी
आता होईलं का दुजा?
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे. mahendra.noble@gmail.com

सई आठवण तुझी....

सई आठवण तुझी....
जणू अंधार दाटला
हाक ऐकून धरेची
सुर्य प्राचीस पेटला...
सई आठवण तुझी
आलं आभाळ फिरुन
लाख कोरडे ठेवतो
डोळा पुन्हा ये भरुन
सई आठवण तुझी
जणु प्राजक्ताचा सडा
कणसात लपलेला
एक गंधाळ केवडा...
सई आठवण तुझी
जणु उठलं मोहोळं
थोड्याश्या गं मधासाठी
मन डंखाने घायाळं...
सई आठवण तुझी
जणु वणवा गं रानी
पारव्याच्या ओठावर
आर्त विरहाची गाणी....
सई आठवण तुझी
जणु आभाळ फाटलं...
वाट चुकल्या चंद्राला
जसं चांदणं भेटलं....
सई आठवण तुझी
जणु उन्हात चांदवा
घामाघुम झाल्या जिवा
गार आषाढ सांगावा...
सई आठवण तुझी
जणु समुद्राची गाज
हवाहवासा वाटावा
असा कोकीळ आवाज...
सई आठवण तुझी
जणु जखम जिव्हारी
तुझ्या डोळ्यातही पाणी
येतं का गं केव्हातरी....?
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे 

उजेडायला हवं...!!!

उजेडायला हवं...!!!
खास काहितरी अस घडायला हवं....
कुणावरतरी प्रेम जडायला हवं...
साचलेलं आयुष्य त्यास सडका वासं.....
झर्यासम बेधडकं पडायला हवं....
थांबलेत अश्रू कधीचे पापणकाठी......
एकवार मोकळुन रडायला हवं.....
रे सोन्याचा जरी पिंजरा तो पिंजराच...
फडफडून एकदा उडायला हवं....
तुडवतो 'माही' रोज काळोखाची वाटं.....
आतमध्ये एकदा उजेडायला हवं.....
महेंद्र कांबळे.

उतारा......

उतारा...
लहाणपणी जेव्हा....
पिवळंधम्मक तोंड करत
बनियानीवर रस सांडवत
तडस लागेपर्यंत आंबे खायचो....

तेव्हा माय (आजी)
मायेनं हातावर चारसहा
जांभळं ठेवत म्हणायची...
'आंबे पचत्यात जांभळानं
हा आंब्यावर रामबाण उतारा हाय'..,
आता......
रात्री ब-याच उशीरवर
मित्रांसोबत 'बसल्यावर'
जेव्हा सकाळी डोकं जडावतं
अन् जिभंही कशिशीच सपकते....
तेव्हा एखादा जिगरदोस्त
हातावर 'टिन' ठेवत म्हणतो...
घे माझ्याजवळ 'उतारा' आहे...
महेंद्र कांबळे.

सर.....

अचानक ब-याच वर्षानंतर
त्या दिवशी प्रवासात सर भेटले...
पायाला हात लावेपर्यंत
मला ओळखलच नाही त्यांनी
आणि मग गप्पकन मिठी मारत म्हणाले...

'बाळ..!!
किती वर्षानंतर भेटतोयसं..?'
सर्वांनाच मायेनं ओथंबलेल्या
'बाळ' ह्या संबोधनानं ते पुकारत....
चार-सहा वाक्यात एक संस्कृत श्लोक
अगदी ठरलेलाचं....
बोलता बोलता बोलून गेले,
'पार बदललंय रे जग...!!
टोंगळ्याएवढं पोरगंही पुड्या खातं
हल्ली...'
बाणाने घायाळ झालेल्या पक्षाची तडफड
दिसली त्यांच्या डोळ्यात..
मी म्हटलं,'सर, उगाच मनाला लावून
घेता तुम्ही'
खरय रे बाबा.....
पण खरं नी प्रामाणिक जगण्याला
हे लोक हरकत का घेतात उगाचं..?
माझा मित्र खाजगी क्लासच दुकान
चालवतो
आणि माझ्यापेक्षा चौपट कमावतो...!
मला मात्र अजुनही
विद्यार्थीच खर धन वाटतात...!!
खेळाच्या तासाला मी विद्यार्थ्यांत
जाऊन खेळतो
त्यांच्यात बसून डबा खातो
म्हणून सहशिक्षक टर उडवतात...
स्टाफरुममध्ये सिगारेटी फुंकत अन्
पान तंबाखुचे तोबरे भरत न बसणारा मी
बावळट आहे का खरचं?
मी म्हटलं,
'सर, पन्नास कामचुकारात
एकावन्नावा कामसू कसा मिसळणार?'
'खरयं...!' ते म्हणाले,
पण हेच लोक संस्थाचालकांपुढं
का शेपटी हलवतात कळत नाही..?
'त्या' संस्थाचालकाच्या वाढदिवसाला
एका महिन्याचा पगार कापला सक्तीनं
आणि त्याला कार भेट दिली...
मी म्हटलं अन्याय आहे.. तर म्हणतात..
'घरी बसा...!'
मला उगाच आत काहितरी तुटल्यासारखं
झालं...
त्यांचा थांबा आला
हात घट्ट पकडून ते म्हणाले....
'काही असो, पण मला माझी जुनी लेकरं
जेव्हा भेटतात...
तेव्हा वाटतं की..
मी जगातला सगळ्यात श्रीमंत अन्
सुखी माणुस आहे..
मी त्यांना निरोप दिला
गाडी सुरु झाली अन् माझे सर मागे
पडले....!!!
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे...

'अर्घ्यदान'चं दैनीक 'सकाळ'मध्ये आलेलं परिक्षणं..

काँलेज (ग्रामिण) ........

काँलेज (ग्रामिण)
या येळी ठरवलचं व्हतं.. जाणार
आपणबी कालेजात जाणार...
ती निळीजांबळी झॅक बिल्डींग
आयन्यावाणी फरश्या
मोठी पुस्तकाची लायबरी त्या गार्डनमंदी झोकात
फिरणार... जाणार आपणबी कालेजात
जाणार... ईस्त्री केलेले मास्तर..
भल्या मोठ्या खोल्या चितरागत
कापडातली पोरं... हाव डू हाव डू मनना-
या
पोरी...
आपणबी हाव डू मननारं..
जाणार आपणबी कालेजात जाणारं...
त्या दिशी सांचाला बाला सपश्टच
सांगीतलं... बा यंदा धावी व्हईल
मंग मला कालेजात धाड
दोन जिनच्या पँड घे साळतल्यासारख
ढुंगणावर ठिगळवाली ईजार नगं
शरट पण घे
या येळी गाड्यावरच नग दुकानातले घे...
बेवडा मारता मारता बाप हसला पण लय
बेस बोलला
एक टायमचा बेवडा कमी करणार पण
तुला शिकीवणार
तू मोठा लेक....
धाडणार तुला कालेजात धाडणार... पण
धावी पास नापास कळायच्या आतचं.. बाप
लिवर फुगुन गेला..
निस्त नवसागरच व्हतं
त्याच्या लिवरमधी... माय मने तुवा बाप
चांगला व्हता दारू ढोसायचा पर
घराकडबी बगायचा... आता सा जिवाच
एकटी कसं बगू..? तू मोठा लेक
तुबी द्याया पायजी टेकू.... आता त्याच
कालेजापुडच्या हाटेलात
कपबश्या ईसळतांना... मन
कवा कवा ईचारत...
आपण कवा कालेजात जाणारं...?
सालं आपण कवा कालेजात जाणार...?
महेंद्र कांबळे.

काँलेज म्हणजे....

काँलेज म्हणजे....
काँलेज म्हणजे....
उरात स्वप्न
अन् पंखात बळ...
स्वतःला सिध्द करण्याची
अविरत तळमळं...
काँलेज म्हणजे...
ओस ओस क्लास
अन् फुललेला कट्टा
कट्ट्यावरती तोंडाचा

सुरू दांडपट्टा...
काँलेज म्हणजे...
मागे बसुन दंगा
कुणाशिही पंगा
मॅमला दिलेला त्रास
अन् मोग-याचा श्वास...
काँलेज म्हणजे...
भटकायचा आटापिटा
सरसरत्या पावसात
धुंडाळलेल्या वाटा...
काँलेज म्हणजे
एक मिसळ सहा पाव
भैय्या चार कटींग लगावं..
टिचर्सची खपामर्जी..
गरमागरम अंडाभुर्जी..
काँलेज म्हणजे
कुणालातरी छेडणं
कुणीतरी आवडणं..
कुणाच्यातरी नंबसाठी
लाख लफडी करणं...
काँलेज म्हणजे
काँमनऑफची दमदाटी
क्वचीत लाडिगोडी
अन् पेट्रोलपंपपर्यंत
ढकलत नेलेली गाडी...
काँलेज म्हणजे...
नुस्तीच मज्जा करणं..
एकमेकांच्या बापाच्या नावानं..
एकमेकांना हाका मारणं...
काँलेज म्हणजे
लंचब्रेकमध्ये डब्बा शेअर करणं...
सतत तिच्या गोष्टी सांगुन
मित्रांना बोअर करणं...
काँलेज म्हणजे...
बहरलेली रातराणी
टेबल वाजवत म्हटलेली
बेधुंद गाणी...
काँलेज म्हणजे
क्रिकेटची मॅच
गुडघे फोडुन घेतलेला
अफलातुन कॅच...
काँलेज म्हणजे
काँरीडोरमध्ये केलेली झुकझुक गाडी
पिएलमध्ये वाढलेली दाढी
परिक्षेची धाकधुक थोडी...
काँलेज म्हणजे
फाटका खिसा
अन् काँलेज म्हणजेच
"विद्यार्थीदशा"..
काँलेज म्हणजे....
मित्राची घट्ट मिठी
मैत्रिणीच ओळखिच हसू..
अविरत चालत राहत काँलेज...
भले आपण त्यात असू किंवा नसू....
महेंद्र कांबळे.

माझ्या त्या सा-या कविता .........

माझ्या त्या सा-या कविता
ज्यात कधी चंद्र असायचा
कधी सुर्य दिसायचा
कधी मोगराही गंधवेड हसायचा.
माझ्या त्या सा-या कविता
ज्यात सकारात्मकतेचा सूर होता
धपापता उर होता
गढुळपिवळा पूर होता.
माझ्या त्या सा-या कविता
काही प्रेमबंबाळ होत्या
काही अवखळ खट्याळ होत्या
काळीजविरहाचा जाळ होत्या.
माझ्या त्या सा-या कविता
ज्यात काव्य अगदिच कमी
पण भावना मात्र अस्सल होती
शब्दाशब्दांमध्ये कसलितरी टस्सल होती.
माझ्या त्या सा-या कविता
कुठली काँलेजमध्ये झळकलेली
एखादी दैनिकात आलेली
एकतर खास 'तिला'
'ईम्प्रेस' करायला लिहिलेली.
माझ्या त्या सा-या कविता
ज्या गझलेवर जळत नव्हत्या
वृत्तबध्द नाहीत म्हणुन सलत नव्हत्या
लोकभितीन काजळत नव्हत्या...
----------------
कधी फार गुदमरायला झाल्यावर
जुन्या वहितून त्यांची भेट घेतो...
अन् त्यांच्याहून नजर फिरवत
एकटाच खुळ्यागत हसत राहतो...
महेंद्र कांबळे.

फुपाटा....

आपल्याबी आयुक्षात
अस कायतरी घडावं
मलेबी वाटते राजेहो
का मी पिरमात पडावं...
कालेजातल्या जवा मी
पोरी पायतो
सर्ग फक्त मले
दोनच बोट रायतो...
पायतो पोरापोरीयला
गुलूगुलू बोलताना
मनात सारखा सुरु रायतो
ताना धिन तंदाना...
म्हनं हे पोर पोरी
संग आईसकीरीम खात्यात
एकमेकाईसंग म्हनं
सिनेमाला बि जात्यात..
एक पोरगी मले
लय लय आवडते
पण दिसली ती का माई
चड्डीच गयते....
--------------------
कालेजातुन जवा
घरी मी येतो
झोपड्याला पाहून मनात
पयला ईचार येतो
पावसाळ्यात गळक्या झोपड्यात
कसं झोपावं?
दोन वर्सापास्न भईन घरीच हाय
तिच्या लग्नाच काय करावं?
थकलेल्या मायचा जवा
चेहरा पायतो..
पिरमाचा ईचार
मनातुनच पयतो...
मले रोज दिसते
करजान बेजार झालेला बाप
अन् भाकरिची वाट पायनारी दिवडी..
संसारगाडा वडायची त्याला चिंता केवडी..?
आठ एकर कोरडवाहू
वायता वायता..
जाईन माई बी जिनगानी सडून
शेतक-याईच्या पोराईन
काय करावं पिरमात पडून?
काय करावं पिरमात पडून?
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे.

हुरहुर....

संध्याकाळच्या मंद प्रकाशात
मी एकटाच...
दिवसभराच्या कामाची
गोळाबेरीज करण्यात मश्गुल
खिडकीबाहेरच्या निंबाची पाने...
हलतात हलके हलके
नुकताच सुर्याच्या सोनेरी किरणांना
त्यांनी निरोप दिलेला....
खिडकीबाहेर टाकतो
सहज एक कटाक्ष
काहीतरी हलतं माझ्याही मनाच्या
खोल खोल डोहातं...
कश्याच्या तरी जाणीवेनं..
बघतो परत मंदस्मित करणा-या
मोहक संध्येकडं,
हातातले कागद गुंडाळून ठेवतं
मी हसतो गालातं..
थंडगार झुळूक चेह-यावर
घेत....
मनाशीच म्हणतो...
'काल जाम भांडली होतीस
फोनवरं.....
आता काय करत असशीलं?'
महेंद्र कांबळे

happy friendship day....

तसा तर मिही एक लहानसा जिवं....
या प्रचंड
पृथ्विगोलाच्या कुठल्याशा एका कोप-यात...
रेगांळत रेगांळत जगणारा
अन् तू भेटलासं...
दुनियेच्या बाजारात चिक्कार अपयशी मी...
जिकण्याच्या घिसाडघाईतही..
माझ्यासाठी तू थांबलास...
माझी लायकीच नाही यार 
विषादून जेव्हा बोललो..
माझ्यासाठी तू खास आहेस
फक्त तूच म्हणालासं...
आता आठवतयं...
पहिल्यादांच जेव्हा खरडल्या होत्या काही ओळी..
त्या वाचून चमकला होता
एक अवर्णनीय आनंद
तुझ्या डोळी...
आणि काँलेजात झळकलेला
तो पहिला लेखं...
त्यात रंग भरायला...
रात्रभर तू खपलासं...
खरतरं तू भरत होतास
तेव्हा रंग...
रंगहिन होत चाललेल्या
माझ्या आयुष्यातचं...
तापभरल्या अंगाने
जेव्हा आलो होतो..
तेव्हा चार शिव्या देऊन
डाँक्टरकडे नेणारा तू होतासं...
तू होतासं...
VIMP नोट्स माझ्यासाठी
झेराँक्स करणारा
गाढवा अभ्यास कर म्हणतं
माझे प्राँब्लम्स साँल्व करणारा..
पैशाच्या चणचणीत स्वतःच एटिएम माझ्या खिशात कोंबणारा...
कुणास ठाऊक पण 
जेव्हा जेव्हा तुझ्याकडं बघतो तेव्हा मला नाही वाटतं की...
मी आहे एक जिवं...
या प्रचंड पृथ्विगोलाच्या
कुठल्याशा कोप-यात
रांगत रांगत जगणारा...
(कायम तुझ्या ऋणाईत)
महेंद्र कांबळे.

चंगो...

काही वर्षांअगोदरची गोष्ट.
पाँलीटेक्नीकच्या फर्स्ट ईअरचं गॅदरींग
त्यात संगीत रजनीचा (singing
competetion) कार्यक्रम होता..
अँकरींग करणारा सिनीअर मध्ये मध्ये चार
चार ओळींची सुरेख पेरणी करत, तुफान
टाळ्या मिळवत होता. डायरेक्ट
काळजाला भिडणा-या चार
ओळींनी अक्षरशः भारावून गेलो.
मी रनर अप ठरलो अन् तो ईव्हेंटनंतर
... अभीनंदन करायला आला. मी म्हटल तुझं
अँकरींग भन्नाट होतं मध्ये चार ओळींचे
मराठी शेर जबरदस्त आवडलेत
तो हसला म्हणाला ते शेर नव्हते
काही त्या चारोळ्या होत्या चंद्रशेखर
गोखलेंच्या.
काही दिवसानंतर सहज पुस्तक प्रदर्शन
पहायला गेलो शंभर एक रुपये असतील
खिशात. विक्रेत्याला म्हणालो 'परवडेल'
असं काही दाखवा. त्याने एका कप्प्याकडे
बोट केलं. तिथल हँडबुक सारख एक पुस्तक
मी उचललं, अन् खरं सांगतो आनंद पोटात
माझ्या माईना असं झालं.
त्या पुस्तकाच नाव मी माझा... वर
दाक्षिणात्य सुपरस्टार सारखा कृष्णधवल
फोटो हेच चंगोच पहीलं दर्शन... नंतर
ईतरांसारखाच चंगोचा कैफ
माझ्यावरही चढलाच
तो तसा चढणंही अपरीहार्यच म्हणा.
नंतर चंगो भेटत राहीले
कधी स्टेजवरल्या निवेदनात तर
कधी एखाद्या टिशर्ट वर कधी मेल मध्ये
तर कधी एखाद्या sms मधूनं...
चारोळ्यांवर ,चंगोवर ईथ भरभरुन
बोलल्या गेललयं मी पामर काय बोलु?
तेव्हढी माझी लायकी पण नाही.. पण
तुषार सरांची चंगो वरली कविता पुढे
नेण्याचा मोह आवरत नाही...(म्हणजे
माझा आपला एक प्रयत्न)
चंगो...
शब्दसौर्द्य अनुपम चंगो
आयुष्याचं निरुपण चंगो
भरलेल आभाळ चंगो
कातर संध्याकाळ चंगो
तिचा मखमली हात चंगो
सबके दिलकी बात चंगो
चारोळ्यांचा बाप चंगो
न उतरणारा ताप चंगो
मी माझ्यात हरवण चंगो
गोड घास भरवणं चंगो
मी नवा मी माझा चंगो
चार ओळींचा राजा चंगो.
चंगोच्या असंख्य चाहत्यांपैकी एक...
महेंद्र कांबळे.

बिगुलं....

बिगुलं....
ते सहा आहेत
मी एकटा...
कधी ते वरचढ कधी मी.
पण हारजीतीचा फैसला होत नाही...
निकाल काही लागत नाही.
ते पाच आहेत
अन् मी एकटा...
ईथेही हारजीत नाही
अन् निकाल तर नाहीच नाही..
आता ते चार आहेत..
पण यावेळी मी एकटा नाही...
निकाल लावयचाच त्याशिवाय चालायचंच नाही....
'निकाल' लावण्यासाठीच
पेटुन उठावे आता....
महेंद्र कांबळे.

जन्मांतरीच देणं...प्रेमकथा

    • पुर्वार्ध 1..
      किती रे छळतोस? किती वेळची वाट बघतेय? एव्हढा कसा उशीर? किती कंटाळलेय मी...
      अगं पण मुद्दाम का केला मी उशीर.. हे बघ यामुळं झाला तो...
      अगं बाई गजरा अन् हे काय माझी आवडती जिलेबी.
      मग? अगदी पहिल्या घाण्याची आणलीय खास तिथ थांबुन गरमागरम.
      किती रे जपतोस?
      तू नाहीस का जपत मला? किती किती जिवं लावतेस.
      हे काय रे? असा रस्त्यात मिठी काय मारतोस. बघेल की कोणी...
      एक सांगतेस?
      विचार.
      तू अशीच राहशील कायम? असाच जिवं लावशील मला? अगं डोळ्यात का पाणी आल उगाच?
      अवघडच आहे रे. स्पष्टच तर बोलले की... जाऊ दे गजरा माळतोस ना तुझ्या हाताने.?
      माहीत्येय का हा मोगरा पण खजील होत असेल तुझ्या केसात?
      ते का म्हणुन?
      त्याच्यापेक्षा जास्त सुगंधी तू आहेस म्हणून... लाजतेस काय, ईतकी गोरीमोरी का होतेयस? अगं हळू किती जोरात हात दाबतेस..
      चल निघायच ना रे घरी वाट बघत असतील. कुठे गेली कुठे गेली करत असतील.
      अन घरी काय सांगाल मॅडम..?
      तेच जे रोज सांगते.... मैत्रीणीकडे...
      लबाड आहेस एक नंबर.
      प्रेमात सगळं माफ असतं सरकार. चला आता...
    • 2.
      का रे किती निरोप धाडायचे तुला?
      मिळाले होते गं निरोप पण मिच भेटायच टाळत होतो.
      पण का? विसरलास आपल काय ठरलं होत ते?
      हसत हसत निरोप घ्यायच ठरलेल कस विसरेन गं.. पण तुला निरोप तोही हसत शक्यच नाही.
      रडू नकोस रे असा ओक्साबोक्सी आधीच किती अपराधी वाटतय मला.
      नाही गं नाही.. तुला का म्हणुन अपराधी वाटावं उगाचं तसा विचारही नको करुस प्लिजं.एव्हढे दिवस किती किती दिलस मला.. तुला सुध्दा मर्यादा आहेतच की कुठल्या आगीतून तू जातेयस ते मला कळतं गं सगळं.. मी सावरेन. तू दुर असलीस तरी छान राहीन मी..
      प्राँमीस कर मला आधी तु तसाच वागशील असं.
      प्राँमीस.
      किती मोठ्या मनाचा आहेस रे. पुढच्या जन्मी ना तुझ्याच जातित जन्म घेईन अन् कायम तुझीच होउन राहीनं. माफ कर मला.
      वेडीच आहेस. एका मोठ्या शासकिय अधिका-याच्या बायकोला असं मुळूमुळू रडायला शोभतं का.
      तुला नाही कळायच रे पण काय गमावतेय ते माझ मलाच ठाऊक.
      श्रीमंत आहे गं तुझं सासरं, मोठी तालेवार माणसं आहेत म्हणे. चार सहा बंगले, एव्हढी शेती सुखात राहशील बघं. तेव्हढंच मला एक समाधान.
      किती भोळा आहेस रे. लग्नाला येशील ना पण?
      नाही गं. जमनारच नाही कितिही हिंम्मत केली तरी.
      आग्रह तरी कसा करु? पण माझी शप्पथ स्वतःची काळजी घे.
      नक्की घेईन. तू स्वतःला सांभाळ अन् सुखाने नांद.
    • उत्तरार्ध-
      3.
      किती हाका द्यायच्या रे? किती वेळची हाँर्न वाजवतेय, लक्ष कुठयं?
      बापरे तू..!!! एव्हढ्या दिवसानंतर.! अगं सिटी बसस्टाँपवर आमच्यासाठी कोण कार उभी करेल म्हणुन दुर्लक्ष केलं. पण ईथ कधी आलीस तू? अन् मला बर ओळखलंस एव्हढ्या गर्दीत.!!
      ते का अवघड आहे रे.? ये गाडीत.
      नको गं बस येईल माझी एव्हढ्यात...
      अरे सोडते ना, बुजतोस काय नवख्यासारखा..!!
      काय आलेशान कार आहे गं तुझी अन् तू कधी शिकलीस ड्रायव्हींग.?
      वेळच वेळ असला म्हणजे शिकावं लागत असं काही..
      मोठी माणसं बाबा तुम्ही?
      किती वर्षानी भेटतोय रे आपण.?
      18-20 कदाचित त्याहून जास्त....
      कित्ती बदललास, डोक्यावरचे केस बघ किती पातळ झालेत हा हा हा.. आणि डोळ्यावर पण चष्मा आलाय.
      ओ बाईसाहेब तुम्ही पण बदलल्यातच की पांढरे पांढरे केस डोकावतायत की डोक्यात पण ईथे कधी आलीस.?
      झालेत की साताठ महीने, ह्यांची बदली झालीय ईथच म्हटल नशीबात असेल तर तुझी भेट होईलचं.
      आणी आज भेटलीस? पण एकटीच कुठ गेली होतीस.?
      माँलमध्ये शाँपींगला. अरे रिकामा वेळ खायला उठतो घरीही कामं करायला नौकर चाकरं..
      मज्जा आहे म्हणायचं..
      पण तु रे स्टाँपवर काय करत होतास?
      तेच जे ईतर चाकरमाने करतात,ऑफीस सुटल्यावर बसची वाट बघणं. आज पगार त्यामुळ जरा उशीरच झाला.
      नौकरी करतोस?
      हो. आहे एक छोटीसी क्लर्कची.
    • मुलबाळ किती आहेत?
      एक मुलगी एक मुलगा. तुला गं?
      एकच मुलगा, पण बाहेरच असतो तो.
      ईकडं कुठं वळवतेस गाडी?
      अरे चहा काँफी घेऊयात ना काही?
      एव्हढ्या मोठ्या हाँटेलात चहा?
      चल जरा निवांत गप्पा होतील?
      काय बघतेस अशी?
      काही नाही किती वाळलास रे?
      छे गं फार दिवसांनी बघतेस ना म्हणुन वाटतय अस तुला?
      हसतेस काय? आणि कसं चाललय तुझं?
      मजेतच. पण कुणी बोलायला मन मोकळ करायला माणुसच नसतो. हे तर सारखे कामात अन् मुलगा बाहेर शिकायला मी आपली एकटीच. जाऊ दे ते. तुझ्या हातातल्या पुड्यात काय आहे खुप ओळखीचा गंध येतोय..
      अरेच्चा विसरलोच की, ही तीच अण्णाची फेमस जिलेबी तुला खुप आवडायची ना? मुलांना पण आवडते माझ्या.. घे पुर्ण घे मी उद्या नेईन परत.
      नको बस थोडीच. घरी ने तुझ्या. तो गजरा दे पण मला.
      हात्तीच्या हे काय घे तुझ्या आवडीचा मोगरा आहे. हिला पण आवडतो मोगरा फार, मीही हटकुन नेत असतो एखादवेळी, खुप खुशीत येते मग ती. फार भोळी आहे बिचारी. अन् प्रेमळ पण.
    • नशीबवान आहे बाबा तुझी बायको. मी तर खुप दिवसात गजराच नाही माळला केसात, मोत्याचा सर सहज मिळतो रे पण जिवंत सुगंधाचा मोगरा मात्र आणत नाहीत हे कधी. जाऊ दे एक ऐकतोस माझं?
      बोल.
      ही साडी देतोस तुझ्या बायकोला?
      बापरे एव्हढी महाग? अगं एव्हढ्या पैशात तर चार साड्या घेईल ती, नको बाबा चिडायची उगाच.
      माझी शप्पथ तुला घे ही साडी. सेल वगैरे लागला होता म्हणं प्लिजं.
      अगं पणं..
      घे म्हटलं ना. चल आता फार वेळ झाला.
      4.
      हे हो काय? किती उशीर केलात आज. मुलं किती वाट बघुन झोपलेत माहित्येय?
      अगं झाला जरा उशीर. पगार नव्हता का आज?
      आणला ना निट. बिलं रखडलीत अन् किराणापण भरायचाय उद्या. माझं मेलीचं हेच बाई. जाऊ द्या तुम्ही कपडे बदला अन् हात पाय धुवा आपण जेउयात मगं बोलु. अहो अशी मिठी काय मारताय मुल उठतील सोडा.
      उठु दे गं. हे बघं.
      अगं बाई एव्हढी महाग साडी.? अख्खा पगार काय यातच घातलाय का की लाँटरी लागलीय.?
      अगं सेल होता स्वस्तात मिळाली. घालुन दाखवं बरं.
      भलतचं. घालेन संक्रांतीला नुसती उधळपट्टी करता.
      हसता काय असे? जा गरम पाणी काढलय फ्रेश व्हा.
      ओके सरकार.
      अहोऽऽऽ
      काय?
      ह्यात गजरा कुठाय? फक्त एकच फुल आहे मोग-याच
      अगं देणेकरी भेटला होता एक वाटेत.. जन्मांतरीच देण होतं..
      दिला मग गजरा........!!!!!!
      महेंद्र कांबळे.

पहिला पाऊस...

आईशप्पथ तो पहिला पाऊस...
भिजक्या मातिचा वेडावणारा...
ओला ओला मृद्गंध..
मातिच्या खोल खोल गर्भात..
अंकुरण्या आसुसलेली बिजं...
मनामनामनावर पसरलेली हिरवळं.....
आणि समोर तू...!!!
चिंब चिंब नखशिखांत भिजलेली...
दुधगो-या अंगावर बरसणा-या....
चंद्रदुधाळ सरी...
गालावरुन ओगळणारे...
लोचट, लगटखोर मोतिथेंब....
डोळ्यावर सारखी येणारी रेशीमबट....
सराईत कानामागे ढकलणारे हळदपिवळे हात...
विभोरुन बघतांना..
थंडावलेला आलेचहा...
सर्दी तापाने कोण फणफणेल......
तू का मी...?
महेंद्र कांबळे.

प्रेमाची भानगड .......स्वभाव..

नातं
कुठलही असो तुटतांनाच्या वेदना ठरलेल्याच
त्यातही जर प्रेमाची भानगड असेल तर,
काळजावरले ओरखडे असह्यचं...
मुळात शरीरावरल्या जखमा दिसतात
मलमपट्टी पण करता येते पण
मनाच्या जखमांच काय?
मनालाही जखमा होतात
त्यालाही ईलाजाची आवश्यकता असते हेच
कित्येकांना ठाऊक नसतं...
तो अन ती....
तो म्हणतो प्रवासात
अनोळखी लोकांशी उगच बोलु नये
(विशेषतः समवयस्क तरुणांशी)
ती म्हणते नाही मी कशाला बोलत बसेन
उगाचं...
काही दिवसानंतर तिचा काँल वेटिंगवर....
कुणाशी बोलत होतीस..?
अमक्याशी...
तुझ्या ओळखीचा आहे?
हो दोन महिन्या अगोदर प्रवासात ओळख
झाली माझ्याच डब्ब्यात होता..
आणि मला आता सांगतेस?
लक्षात नाही राहिलं...
अश्यावेळी त्याची काय अवस्था होत
असेल?
आता दुसरी गोष्ट..
तो म्हणतो तु कुणाच्या गाडीवर
बसल्याची कल्पना पण नाही करवत यार.
पार जळुनच जाईल अस काही मला दिसलं
तर.
ति म्हणते वेडा आहेस का? कायपण विचार
का करतो मी कशाला जाईन
दुस-याच्या गाडिवर...
काही दिवसानंतर
अरे मला बाहेर जायचय जरा पहाटे
पाचाला निघावं लागेल
ढमक्याला गाडीवर सोड म्हणु का?
बिचारा पार
बिथरतो म्हणतो मैत्रिंनी मेल्यात काय
तुझ्या मुलं कशाला हवित तुला सोडायला..
सांगुन सुध्दा असच का वागतेस.. प्रकरण
वाढतं..
पुष्कळ वेळा असच काय काय घडत राहत अन्
गाडी येते ब्रेकअप च्या फलाटावर.. चुक
त्याचीही असतेच अद्वातद्वा बोलतो तो..
तिही कुठे ना चुकतेचं..
पण स्त्रित्वाचा असा कुठला पैलु आहे
जो त्याला आजन्म कळत नाही?
आणि पुरुषाच कुठलं लक्षण आहे जे
तिला कधी उमजतच नाही..?
आहे काही उत्तर.. असल्यास द्या रावं
खरचं..
महेंद्र कांबळे..

डायरिच पानं...

वर्षभरात एखादतरी मोठ आजारपण माणसाला यायलाच हवं complete bed rest.. एरवी तसही कधी स्वस्थपणे बसून स्वतःचा विचार मला नाही वाटत कुणी करत असेल.
ईतक्या गोष्टी उलगडतात अन् ईतके गुंते सुटतात अश्यावेळी की थक्कच व्हायला होतं..
आज टि.व्ही वर ता-याच बेट नावाचा नितांत सुंदर सिनेमा पाहीला तसा तो चारेक वेळेस तरी मी पाहीलाय दरवेळी काहीतरी नवं देऊन जातो तो मला. काही काही कलाकृती अजोडचं मग ती धग, पुर्णामायची लेकरं ऑलकेमीस्ट, मृत्युजंय सारखी कादबंरी असो, सलाम,बोलगाणी किंवा सुर्व्यांचा किंवा अजुन कुणाचा काव्यसंग्रह असो, दादांची किंवा जगजितची एखादी गझल असो वा पु.ल. व.पूं.च पुस्तकं यांच्यातुन मिळणारा आनंद कधी शिळा होतच नाही.
ता-यांच बेट, एक निरागस मुलगा आणि त्याचा जेमतेम परिस्थिती असणारा बाप साधा सरळमार्गी कमालीचा श्रध्दाळू ईसम.
पोराची एक ईच्छा फाईव्ह स्टार मध्ये मज्जा करण्याची त्यासाठी अभ्यास करुन तो वर्गात पहिला देखील येतो..
पोराची ईच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडणारा बाप सरळ मार्गाने पैसा जुळवण्यात अपयशी ठरतो अन् मग चिडुन सगळे संस्कार डब्बाबंद करुन वाममार्गाने पैसा कमवायला लागतो पण शेवटी पश्चातापदग्ध होतो..
अन् मुळ आयुष्यच जगायला लागतो..
कथानक भारी भन्नाट..
माणुस कितिही वाईट असला तरी त्याच्यातलं चांगुलपण कधी मरतच नाही. आणि सखोल आत असणारा तो सल एकदम वर येतो त्यालाच बहुधा पश्चाताप म्हणत असावेत..
तुमचा मुळ स्वभावं,जडणघडण कधीच बदलत नाही हेच खरय कि काय कुणास ठाउकं....

पेटून उठावे आता...

पेटून उठावे आता...
डोस्क हाय का जाग्यावर?
का धुसफुसाया लागलास?
कालेजात शिकलास, गाँटमॅट बोलायलास..
म्हुन जास्त शाना झालास?
काय करु आबा....
ग्रामसेवकान दोनशे खाल्ले
त्याला धरुन नेला.
अन् करोडो जिरवलेला,
जामीनावर सुटला..
त्याचा म्हणे सत्कार केला..
आरं पारं पिकलो,
मरायला टेकलो...!!
पळापळीच्या साली पाच रोहीले धरले...
गंगच्या थडंला नेऊन कापले.....
भारत माता की जय
आबादी आबाद झालं,
सवतंत्र मिळाल म्हणाले
चौथी यत्ता शिकलो..
मास्तर न व्हता काळ्या माय कडं वळलो..
कसण्यात रग जिरवली
अन् ईथच चुकलो...
आबा...
कापसाच्या गाड्या ओढण्यात...
फुकट आयुष्य घालवलत..
पण मला वाटत...
वणवा होऊन जाळत सुटावं आता...
वाझोंटी व्यवस्थाच बदलण्या...
नेटान झटावं आता...
बारुद पेरलय गात्रागात्रात...
पेटून उठावं आता...!!!!
महेंद्र कांबळे.
दि.02/07/12

पाऊसगाणं....

पाऊसगाणं....
येता ढग हे सावळे
लोपे आभाळनिळाई....
अश्या सरीवर सरी
मन चिंब चिंब होई...
असा आषाढ आषाढ
मन ढगात ढगात...
गाढगुड झोपलं बी
कसं मातिच्या कुशीत....
कुजबुज चाललेली
अशी थेंबात थेंबात...
गजबज झालेली रे
सा-या नभात नभात....
बळीराजा कृतकृत्य
होवो हिरवी ही धरा....
भुकेजल्या पाखरांना
मिळो मोतियांचा चारा...
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे.

काव्यसंग्रह- अर्घ्यदान प्रकाशक- अक्षरलेणं प्रकाशन. मुल्य- साठ रुपये फक्त.

अर्घ्यदान.....!
ही स्मशानशांतता संपून...
कधितरी पाखरांचा किलबिलाट कानावर
येईलच...
नाकापुढचही न दिसणार्या गर्द
काळोखास,
सुर्य शह देईलचं....
कधितरी थांबेलच
ही रातकिड्याची किरकिरी
अन् कोल्ह्यांची कोल्हेकुई...
बहरेल ना लवकरचं...
परसातली जाईजुई....
चला.........!
हे काळोखात चाचपडणं
आता थांबवायलाच हवं...
सुर्याला "अर्घ्यदान"
देण्याच्या तयारीला....
आता लागायलाचं हवं...!
(अर्घ्यदान)
हा माझा पहिला वहिला काव्यसंग्रह आता उपलब्ध झालाय सर्व रसिकमित्रांचे मनापासुन आभार.
महेंद्र कांबळे.
काव्यसंग्रह- अर्घ्यदान
प्रकाशक- अक्षरलेणं प्रकाशन.
मुल्य- साठ रुपये फक्त.

अधांतर.......!!!!!!

तशी तर बारा तासांचीच असते रात्र.
पण ती रात्र मात्र होती तब्बल अडीच
हजार वर्षांची.
खांदे पाडुन जगणारे लाचार जिवं.
अस्मिता स्वाभीमानशुन्य जिणं.
टोकाची पराधिनता अन् गुलामी.
अश्यात उगवला एक तारा...
सुर्याहून हजारपट तेजस्वी.
अन पेटवुन दिला त्याने अधम अंधार..
बाबा...!
तोकड्या शब्दात कस वर्णाव तुमच कतृत्व.
तमाम दिनदलितांच तुम्ही
स्विकारलेल पितृत्व..
आज सिएफएलच्या दुधाळ प्रकाशात
लिहीतांना विचार येतोय
कसा केला असेल तुम्ही दिड
पैशाच्या घासलेटवर अभ्यास...
युरोपाच्या कुडकुड थंडीत
कशी केली असेल दोन पापड नी कपभर
दुधावर गुजारणा.
उन्मत्त रानटी जमावात
कसे राहीलात एकटेच शड्डू ठोकत उभे..
गारवा कधी तुमच्या वाट्याला आलाच
नाही.
मिळाला होता फक्त गरम
लाव्ह्याच्या झोत अन् रखरख
वाळवंटी रस्ता..
पण मी बसलोय आज आरामात
एसीची हवा खात...
काय दिल नाहीत तुम्ही
मुरमाड माळरानाला
नंदनवन करणारे किमयागार तुम्ही
बुध्दाच्या ओटीत घालुन
मला जगायचा महामंत्र दिलात..
पण बाबा
कालच्या झोपडीतला मी
आज 1 बिएचके 2 बिएचके मध्ये येउन पार
बिथरलोय..
मिळालेल स्वातंत्र्य गेलय डोक्यात...
घराभोवती आखलय एक अदृष्य कुंपण..
भिंतीवरल्या देवदेवतात
असतो तुमचाही एक फोटो.
त्यांच्या सड्यावरही जाण्याचा अधिकार
नव्हता
आज थ्रीपिस नी ब्रँडेड बुटात वावरतोय.
बाटवशिल रे
म्हणणा-याच्या घशात दात घालण्याच बळ
दिलत तुम्ही पण खैरलांजीसारख्या
अत्याचाराचही काहीच वाटेनास झालय..
शिव्या देतो रोज नेत्यांना.
गटातटाच राजकारण करणारे भाडखाऊ
म्हणतो.
पण कार्यकर्ता मात्र होत नाही.
पण एक बरय निदान आज हातात पेन
तरी आहे तुमच्या कष्टाईने...
नाहीतर मिही जगलो असतो कुठतरी..
शेणाच्या पाट्या वाहत अन् मेलेली गुर
ओढतं...!! 
महेंद्र कांबळे.

चारोळी1

श्रावणातले हे काळे ढग...
नेहमीच मला फसवतात...
एकटच भिजाव लागल्यान
धागे काळजाचे उसवतात..
(अर्घ्यदान)
...

ती मुलगी आहे म्हणुनी.

पाणचटल्या स्टेटसवरती
सरी लाईक्सच्या कोसळती.
स्वतःच्याही फोटोवरती..
नित तिला टॅगतो कोणी..
ती मुलगी आहे म्हणुनी...
ती मुलगी आहे म्हणुनी...:!!
... अपलोड करीच ती जेव्हा,
एक फोटो हो जिवघेणा...
बघताच कितीक जिवांची,
हाय जिवघेणीच रे दैना...
हाय..! हाउ आर यु मेसेजनी...
ईनबाँक्स वाहे भरुनी...
ती मुलगी आहे म्हणुनी...
ती मुलगी आहे म्हणुनी...
पाचपन्नास रिक्वेस्टा कायम...
रोज तिला येती नेमानी..
ऑनलाईन चॅटाया तिजला...
आसुसुन धडपडे कोणी...
ती मुलगी आहे म्हणुनी...
ती मुलगी आहे म्हणोनी....
महेंद्र कांबळे..:)

जिंकण्याची जिद्द आहे...

जिंकण्याची जिद्द आहे...
आस नी उल्हास आहे
बात हिच खास आहे
जोश वाहे नसांतून
मोकळे आकाश आहे
झिंग आली रे जिण्याला
लागलेली तार आहे
भार फेकला भितीचा
विजेवर स्वार आहे
काटाळ ही वाट जरी
दुनिया विरुध्द आहे
घे वेग भन्नाट आता
जिंकण्याची जिद्द आहे.
महेंद्र कांबळे.

तुझी आठवण येते.....!!!!

तुझी आठवण येते...
बघतो एखाद्या ग्रुपला दंगामस्ती करतांना
मिळुन मिसळुन धमाल करत ईकडुन तिकडे
फिरतांना..
मन उगाच गलबलते
अन् दोस्ता...
तुझी आठवण येते.
दिसतं भर पावसात कुणी
हात गुंफुन चालतांना डोळ्यात टाकुन डोळे
भान विसरुन बोलतांना
जरा काळीज चलबिचलते
अन् सये...
तुझी आठवण येते...
बघतो कुणालातरी चिमणचोचीने
चारा भरवतांना...
आणि आपल्या पिल्लांवर...
मायेच आभाळ पसरवतांना...
उगच पापणी पाणावते
अन् माये...
तुझी आठवण येते...
------------
एकट्याचाच असतो आरंभ
प्रवासभरही माणूस एकटाच..
एकट्यानचं
की असत जाणं.
गर्दित मिही आतून एकटाच....
आपलं कुणी जवळ असाव रावं...
सारखं सारखं
वाटत राहते..
अन् मज "तुझी" आठवण
येते....!!!!
महेंद्र कांबळे.
दि.13/04/12

5. पहीलं डेटींग...(तु का मी...?)

मैत्रीतल पहीलं डेटिंग
गजबज रेस्टाँरंटमधला
ऐकु न आलेला गोंगाट
काय करु काय नको
शांत चेहरा अन्
हृद्यायतल वादळं...
बोलाव काय..?
झालेली गोची...
ऑर्डर देण्यासाठी उगच बुजणारी ती
कोण ऑर्डर करेल...
तु का मी...
महेंद्र कांबळे.

4. मैत्री....! (तु का मी...?)

झालेली मैत्री
रोजच मेसेजींग
वाढत जाणारं काँल ड्युरेशन
शेवरीच्या कापसासारख तरंगणार कुणीतरी
डोळ्यांनी बोलणं
मोकळ मोकळ हसणं..
इमोशन शेअरींग...
मैत्री कोण निभावेल...
तु का मी...?
महेंद्र कांबळे.

3.ओळख (तु का मी....?)

पहिल्यांदाच तिचं घुटमळत बोलणं...
ऑफ आहे का वर दिलेल उत्तर
मन बधीर करणारा आवाज
खोल काळजातुन उमटणारे बासरीचे वेल्हाळ सुर....
वाढत जाणारी ओळख
फाईल्सची अदलाबदली
नंबर्सची देवघेव
पहीला SMS कोण करेल
तु का मी....?
महेंद्र कांबळे.

2. रात्र....... (तु का मी...)

ती लांबच लांब रात्र
नशेतच गेलेला दिवस
डोळ्यांपुढे सारखा तरळणारा तोच चेहरा
काय होतय.. कुठं कळतयं...?
अगम्य गोड हुरहुर
दुर उजाड माळावर
थरारणारं एकाकी निष्पर्ण झाडं....
उडालेली झोप
न संपणारी रात्र
कोण संपवेल
तु का मी......?
महेंद्र कांबळे.

1. काँलेजचा पहीला दिवस..... ( तु का मी...?)

लख्ख आठवतो
काँलेजचा पहीला दिवस
पहिल्यांदा दिसलेली तू
डवरून आलेल्या गुलमोहरागत
फुलारलेलं रुप
संमोहनी डोळ्यांशी
भिडलेले डोळे
अंतरंगात उसळलेली त्सुनामी
तुझ्यावरुन हटायला तयार नसलेली नजर
मनभर पसरलेली धुंदी
खेळाला झालेली सुरवात
कोण जिंकेल....
तु का मी...?
महेंद्र कांबळे(तु का मी...?) series poems

जरा विसावा घे...!

ढसढसुन रडतांना...
खांदा तुझा असू दे
खळाळून हसतांना
स्वताःस एक हसू दे
संशयाने बघेल जेव्हा
दुनिया ही मजकडे
तुझ्या डोळ्यात अगाध एक
विश्वास मज दिसु दे..
दुनियेने झिडकारले
मी मनस्वितेने पछाडलेला
श्रावणही येतो ईथे
कोरडा दुष्काळलेला
थिटी पडेल झुंज जेव्हा
अलवार हात हाती दे..
अन् एव्हढच म्हण सये
जरा विसावा घे...!
महेंद्र कांबळे.

अल्पभुधारकं...

ळटळीत दुपार अंगावर काढतो...
उन्ह, वारा, पाऊस अखंड झेलतो..
घामान अंगभर डबडबतो
बैलांसोबत बैल होऊन राबतो..
शेतकरी आहे मी
शेती करतो....
काखेत फाटका सदरा
पायात रबरी (टिकाऊ) चपला
एखादं ठिगळलेला पायजामा
अन् चाळणी झालेल बनियान घालतो
तरी कपाशीच्या पिकाची काळजी करतो
शेतकरी आहे मी
शेती करतो....
कधी विंचु कधी साप डसतो
डोळ्यासमोर उपवर पोरीचा चेहरा दिसतो
जागलीसाठी रात्री बायकोलाही टाळतो
शेतकरी आहे मी
शेती करतो...
जेव्हा आभाळाला येत नाही दया
तडकावी धरणी तशी तडकते काया..
दुबार तिबार जेव्हा करपतात पिकं
कर्जाच्या बोजावर उपाय..
गळफास किंवा किटनाशकं....
कंटाळुन शेवटी मरण जवळ करतो...
शेतकरी आहे मी..
शेती करतो...
जितेपणी जरी कुणी भाव देत नसतो
मेल्यावर निदान लाखभर तरी मिळतो..
चितेवर शांत पडलेलो असतांना..
आता जरा विसावा घे..
गोठ्यातला माझा बैल म्हणत असतो....
महेंद्र कांबळे
01.04.12

बालकविता...1

एकदा अचानक चंद्राला
वाजून आली थंडी
म्हणे चांदण शाळेला
मारेन आज मी दांडी..
आई म्हणे दांडी बिँडी
अजिबात मारायची नाय
अभ्यास बुडवलेला मला
अजिबात चालायच नाय
शाळेत जातो सांगुन
चंद्र घरुन सटकला
शाळा बिळा काही नाही
नुस्ताच आभाळभर भटकला
रात्र सरत आली तरी
चांदोबा नाही घरी
कावली आई चांदोबाची
काळजीत पडली बिचारी
शुक्राच्या चोमड्या चांदणीने
केली चंद्राची चुगली
घरी बिचा-याची मग
खरपुस पाठ शेकली
चंद्र झाला शहाणा मग
ना मारली कधीच बुट्टी
चांदोबाला अमावस्येची
मिळाली बक्षीस सुट्टी..
महेंद्र कांबळे.
दि.31.03.12

coverpage

डायरीच पानं.. कोहम..?

एक खुप सुंदर शब्द आहे...
"कोहम"....!
म्हणजे who am i?
दिवसभर धावपळ करुन रात्री थकुन अंथरुणावर पडल्यावर हा प्रश्न कधी कधी फार छळतो. कोहम..?
पुस्तकाच्या कपाटातल कुठलच पुस्तक अश्यावेळी रिझवत नाही...
गझलसुध्दा ऐकाविशी वाटत नाही..
मन अगदीच सैरभैर... अस्वस्थ...
दिवसभरात किती मुखवटे चढवावे लागतात
चेह-यावर...
हे मुखवटे रात्रीच्या निरव शांततेत उतरवून खिडकीतल्या चांदण्याकडे बघत मी मनाशीच विचार करतो.... कोहम....?
पण उत्तर काही केल्या गवसत नाही...!!!
बहुधा ते कधीच गवसणारं नसावं...!
महेंद्र कांबळे.

होय मी फुटपाथ आहे..

होय मी फुटपाथ आहे..
रस्त्याच्या बाजुला असलेला..
कायम सगळ्यांनी दुर्लक्षीलेला...
आता सिग्नल पडेल
आणि ती हातात गजरा असलेली
केसांना तेल नसलेली मुलगी
प्रत्येक गाडीजवळ जाऊन
घ्या ना ओ सायब
घ्या ना ओ सायब म्हणेल..
तो फाटक्या बनियानीतला पोरगा
झपाझप गाड्या पुसत सुटेल..
कडेवर बाळ घेतलेली मळकट चेह-याची ती
दिणवाण्या हावभावासह
भिक मागेल..
माझ्यावर पाँलिशसाठी बसलेला तो किशोर..
खुप मेहनती आहे तो..
चहा देणारा सलीम
झाडुवाला रतनं...
माझ्या अंगाखांद्यावरच तर वाढलेत सारे..
खर सांगु?
यातल्या प्रत्येकालाच वाटत खुप शिकावं..
चांगल खावं प्यावं अन् ल्यावं...
ऑफीसमधुन येतांना त्यांच्यासाठीही पप्पांनी चाँकलेट आणावं..
मम्मीच बोट धरुन शाळेत जाणारी मुलं पाहीली ना..
की यातले कित्येक रडतात.
पण पोट.....
त्याच्याचसाठीतर ही लाचार झालीत..
काही वर्ष उलटतील...
मग ती भिक मागणारी, गजरेवाली
भडक पोशाख करुन
पावडर लाली लावुन
माझ्यावर उभ्या राहुन
गि-हाईक हेरतील..
आणि चहावाला झाडुवाला
माझ्यावरचं बसुन नशापाणी करतील
काहिजण चो-यामा-या करतील दादा होतील..
आणि पोलीसांच्या वा स्वतःसारख्यांच्याच गोळ्यांनी संपतील..
वेदना होतात हो..
कदाचित मी माणुस नाही म्हणुनही होत असतीलं...
होय मी फुटपाथ आहे
रस्त्याच्या बाजुला पडलेला
अन् सगळ्यांनी दुर्लक्षीलेला..
महेंद्र कांबळे.

कवितेची एक ओळं....!

अस्वस्थ आयुष्य अन्
जिवाचीया तळमळं
डोळ्यातुनही रे दुःख
वाहू लागे घळघळं
देई दिलासा निखळं
कवितेची एक ओळं..
घुसमटलेलं जिणं
साचलेली मरगळ
आनंदाच्या झ-याचिही
आटलेली खळखळं...
करी आयुष्य वेल्हाळं..
कवितेची एक ओळं...
धावधाऊनी थकता
ठसठसतांना वळं...
होई काहिली काहिली..
अशी सोसतांना झळं...
देई लढायाचं बळं..
कवितेची एक ओळं...
महेंद्र कांबळे.

कवितेची एक ओळ2

कवितेची एक ओळ...
डांबलीय अंधार कोठडीत
बोथटल्यात संवेदना
मनावर पांघरलय चिलखत...
सहा वर्षीय मुलीवर बलात्कार..
काळजात कालवत नाही
प्रतीष्ठेसाठी मुलीचा खुन..
काहीच वाटत नाही..
भुकेजून फोडलेला टाहो
जात नाही चिरत काळजं..
पुंडाई पाहून देतो..
स्वतःला शिखांडी समज...
दुस-याच यश पाहुन
जळफळाट जळफळाट होतो...
सरस काम नकोच...
साहेबांचा हरकाम्या होण्यात
धन्यता मानतो..
मशगुल आहे स्वतःत..
दिमाखात मिरवतोय डबक्यातला कुपमंडूक
ताज..
अधिक लक्ष कोसल्याचे धागे मजबुत
करण्यात...
पण कधीतरी वाटल होतं..
ही कवितेची एक ओळ..
अंधार जाळत सुटेल..
अन् अंधारल्या आयुष्यात
तेजोमयी तांबड फुटेलं..
महेंद्र कांबळे.

चल ना यार पुन्हा एकदा........

चल ना यार पुन्हा एकदा
शाळा शाळा खेळुया...
दुस-यांनी डाव मांडलेल्या गोट्या
धुम घेऊन पळुया.
चल ना यार पुन्हा एकदा....
मारकुट्या गणित मास्तरांना
नंदीबैल म्हणुन चिडवुया
नक्कल करुन हेडमास्तरांची
पुन्हा खिल्ली ऊडवुया.
चल ना यार पुन्हा एकदा...
टळटळीत दुपारी मसणवट्यात
भुत शोधत हिंडुया
ईवल्या ईवल्या खोड्या करुन
एकमेकांशी भांडुया.
चल ना यार पुन्हा एकदा...
गरम गरम फुफाट्यातून
चिंगाट पळत सुटूया
आइसकांडीवाल्या मामाचं
गारेगार चाखुया
चल ना यार पुन्हा एकदा...
गाभुळ गाभुळ चिंचा
शेंड्यावर जाऊन तोडुया
पाडाचा आंबा पुन्हा
नेम धरुन पाडुया.
चल ना यार पुन्हा एकदा...
सकाळी कट्टी बट्टी करुन
दुपारीच गट्टी फु करुया
टिव्हीवरचा मिथुन पाहुन
पुन्हा टाळ्या पिटुया.
चल ना यार पुन्हा एकदा...
पहिल्या सरीचे थेंब झेलण्या
परत आतुर होऊया
भिजला का म्हणुन आईचे
खमंग धपाटे खाऊया.
चल ना यार पुन्हा एकदा....
कुसुमाग्रजांची कणा पुन्हा
चिमण्या आवाजात गाऊया
पुन्हा एकदा फुलपाखरामागं
वेडपिसं धाऊया...
चल ना यार पुन्हा एकदा....
------------------------
महीन्याच टार्गेट पुर्ण करण्याचं...
साँलीड टेन्शन असतांना
किती साईट्स व्हिजीट केल्यात
अस बाँस विचारतांना...
गुदमरलेल्या ऑफीसात पुन्हा..
जुनी शाळा शोधुया...
चल ना यार पुन्हा एकदा
शाळा शाळा खेळुया...
(अर्घ्यदान या माझ्या काव्यसंग्रहातुन)
महेंद्र कांबळे.

रंगपंचमी....!

लहानपणी किती आतुरतेन
पंचमीची वाट पहायचो
सकाळीच फाटके कपडे
अंगावर चढवायचो...
नसला जरी रंग तरी नुस्तच पाणी उडवायचो..
टोळकं टोळकं करुन
मस्त हूंदडत रहायचो
याच्या त्याच्या बैलाला
बो.ऽऽऽ करत फिरायचो..!
पळसफुल कुटून केलेला
"नॅचरल रंगं"....
पोटामध्ये जाई खुशाल
पुरणपोळीच्या संगं..
कुणाच्या तरी तोंडाला
फासलेल वंगण..
तव्याचं काळ अन्
रंगलेलं ओलं अंगण...
रंग खेळून दमल्यावर मग
आणखी पोरं जमवायचो
गावभर बोंबलत फिरुन
नदीत डुंबायला जायचो.
आज आहे एखाद्याचं
रंगाच दुकान..
स्वत:च बांधलय कुणी
रंगीबेरंगी मकान...
पण त्या निर्भेळ आनंदाला
जो तो मुकलाय गड्या
आयुष्यातला रंग आता..
कुठतरी हरवलाय गड्या..!
महेंद्र कांबळे.

काँलेजचे वेडे दिवस कधी येतात का माघारी....?

विसरायचं कसं...?
B.M. चं लेक्चरं
उडवलेली टर
खडुंचा मारा
चुकवलेली नजर...
विसरायचं कसं...?
इंटर्नल ग्रुपिंग
क्लासमधलं चॅटींग
सगळ्यांना कटवून
केलेल डेटिंग...
विसरायचं कसं...?
काँमन ऑफचा दंगा
HODशी पंगा..
क्लासटिचरला हळुच
कुणीतरी सांगा..
विसरायचं कसं...?
लिहीलेल्या असाईन्मेंट्स
प्रॅक्टीकलचं टेन्शन..
रेग्युलर आहे म्हणतं
आलेलं डिटेंशन...
विसरायचं कसं...?
टिफीनचं शेअरींग
पार्किंगमधल्या गप्पा
कुणासाठी मनाचा
हळवा एक कप्पा...
विसरायचं कसं...?
अॅटीट्युड फुकाचाच
एक टाँट उगीचाच
टाँपरला त्रास...
C.Rला वनवास...
विसरायचं कसं....?
क्रिकेटची मॅच
गॅदरींगची धमाल..
प्रोजेक्टसाठी
बनलेलो हमाल...
विसरायचं कसं...?
PL च्या रात्री..
डाऊट्सचे फोन
पहाटच्या चार पर्यंत
जागतयं कोण कोण..?
विसरायचं कसं...?
A4 बॅच...
सगळ्यांना जाच
चहाची काँट्री
फक्त रुपये पाचं...
विसरायचं कसं..?
समज गैरसमज
चिडण चिडवणं..
गरज पडली तर
सपोर्टला धावणं..
विसरायचं कसं...?
-------------------------
अविट गोडीच्या त्या एकाका क्षणाला...
खरतरं ईथ विसरायचचं आहे कुणाला...?
उद्या कदाचीत नावसुध्दा मिळेल...
हातात बराच पैसाही खुळखुळेल...
पण काँट्रीची नुस्तीचं मज्जा तिथे असणार नाही....
जाणुण बकरा करणार कुणी दिसणार नाही...
डोक्यात जेव्हा चमकेल
एखाद दुसरा रुपेरी केस...
आरसा दाखवेल जेव्हा..
सुरकुतलेला फेस...
हेचं क्षणं तेव्हा फार हसवतील गड्या...
हसतांना हळुच रडवतील गड्या...
तेव्हाच्या विरंगुळ्याची हिच असेल शिदोरी...
काँलेजचे वेडे दिवस कधी येतात का माघारी....?
महेंद्र कांबळे.
miss u guys luv u all.

दिप घेउन चाल गड्या.....!

दिप घेउन चाल गड्या
वस्तीत अंधार दाटलाय फार...
वाटतोय प्रत्येकच भयभीत ईथला..
चहुकडे माजलाय हाहाकार...
दिप घेऊन चाल गड्या..
गल्लोगल्ली अन् रानोमाळ...
फुलव अंगणोअंगणी प्रकाश...
तिमिराला नित्य जाळं...
दिप घेऊन चाल गड्या...
कर एकाच तरी आयुष्य उजळं...
जरी सुर्य नाही होता आलं...
तरी निदान पणती होऊन जळं...!
महेंद्र कांबळे.
(माझ्या "अर्घ्यदान"
या काव्यसंग्रहा मधून)

राती....

एकटाचं उरलो..
या सुन्न किर्र राती..
नको काजवे सये
दे सुर्य आता हाती...
ही निज थांबलेली
उंब-यावर राती...
झोपू नकोस वेड्या
का काजवे हो गाती...
डोळा सयं दाटली..
आषाढलेल्या राती....
भिजुन चिंब गेली..
ही मनाचिया माती...
भेसुर शांतता ही
स्मशानलेल्या राती
माणसेचं का आता...
शव माणसांचे खाती...?
महेंद्र कांबळे.

निरभ्र..!!!

त्याला मुलं आवडायची. त्यांच्या निरागसतेन तो आनंदविभोर होई. त्यांचे गोबरे गाल, गुलाबपाकळ्यागत ओठ, कुरळे केश.. हातापायाचा लुसलुशीत मखमली स्पर्श, न्हाऊमाखु घातल्याचा गर्भगंध.. त्यांच्या बोबडबोलाने तर पार आनंदवेडाच होई तो.
काँलनीतल्या कैक बच्चे कंपनीचा तो आवडता दादा होता.
त्याला तिही खुप आवडायची. चिमुकल्यांसारखीच तिही निरागसचं..! ती रुसुन गाल फुरंगटुन बसली की भारीचं मज्जा येई त्याला.
ऐन भरात असलेला त्यांच्या प्रेमाच वसंत.. प्रितीची पाकळी न पाकळी फुललेली.. आयुष्याला एक अभुतपुर्व बहर आलेला..
रोज आँफीसमधुन थेट तिला भेटायलाच जाई तो बागेत. कामातही सारखा तिचाच विचार. तिची तरी अवस्था याहून काय वेगळी होती.. कधी काँलेज संपत अन् कधी सांज होते असं व्हायचं तिला.
सलग दोन वर्षापासुन रोज भेटत ते.. पार गडद होईपर्यंत. दोघांनाही वाटायचं सांज होऊच नये. वेळ पूढे सरकुच नये.
दुर ढळणा-या सुर्याकडे बघत तो म्हणायचा..
मला ना अकरा मुलं हवीतं..
मला ठेवतोस की नाही ?
ती लटकंच चिडायची.
अगं धृतराष्ट्राला शंभर होते आपली क्रिकेट टिमही नको का?
जा रे..! एक किंवा दोनचं. आणि पहिला मुलगाचं पण नाव काय रे ठेवायचं.?
क्षितीज..!!
का?
अगं आभाळ नी पृथ्वि जिथं भेटतात ती जागा म्हणजे क्षितीजं...! तु अवनी मी आकाश नि म्हणुन तो क्षितीज..
ती हरखुन जायची तेव्हा. वयच स्वप्नाळु. एकमेंकात हरवलेले ते पुढच्या आयुष्याच्या स्वप्नात रंगुन जातं.
ती मध्येचं त्रसिक सुरात विचारायची..
पण कधी रे करायचं लग्न आपण ?
तिला हळुचं मिठीत घेत तो म्हणायचा..
प्रमोशन होईल माझं ईतक्यात. नविन प्रोजेक्ट घेणारेय कंपनी. कामावर बेहद खुश आहे मॅनेजमेंट, पक्का मलाच मिळेल प्रोजेक्ट मग मी मॅनेजर. अन् आता तुझीही डिग्री होईलचं की या वर्षी. मग लगेच लग्न..
ती घट्ट बिलागची मग त्याला.. बराचवेळ कुणी काहीचं नाही बोलायचं मग..
 आणि एक दिवस तिच्यासाठी पेढे घेउन तो नाचतचं आला..
माझं प्रमोशन झालयं...!
ति तर वेडीच झाली आनंदान. काय करु न काय नको. काही बोलायच भानचं नाही उरलं...
त्याच्या खांद्यावर डोकं ठेउन तिनं डोळे मिटले..
ऐकतेस...?
काय?
मला ट्रेनिंगसाठी दोन महीने मॅक्सिकोला जाव लागेल..
खळकन डोळेच पाणावले तिचे....
त् तुझ्याशिवाय दोन महिने..? कशी रे जगु..?
ए वेडाबाई. मी काय कायमचा चाललो का ? नि पैसे पण मिळतील खुप म्हणजे तुला स्विर्त्झंलंडला नेता येईल लग्नानंतर..
त्याचा हात घट्ट दाबला तिनं..
मला नाही सहन होणार एकही क्षण....
दिर्घ सुस्कारा टाकला त्यानं
त्यालासुध्दा कुठ वाटत होतं तिला सोडुन जावं..
खुप वेळनंतर बराचसा गंभीर होत त्यान विचारल...
एक बोलु ?
हं..!!
दोन महीने काँन्टॅक्ट तोडायचा आपण.. no call, msg & no mail...
ती चिनभीनंच झाली..
का?
शांतपणे तो उत्तरला..
बघं गेल्या दोन वर्षापासून रोज भेटतो आपणं... शिवाय फोनवर तास न् तास बोलतोचं. पण लग्न करायचयं आता. प्रेमात सगळच गोड गोड असतं पण संसार वेगळाचं. म्हणुन या नात्याचा त्रयस्थपणे विचार करुन निर्णय घेउयात..
हे काय भलतचं? वैतागुन आगतिक होऊन तिन विचारलं..
अगं सर्रास किती लग्न मोडतात हल्ली.. आपल तसचं होऊ नये असं वाटत मला..
शेवटी खुप मनधरणी केल्यानंतर ती तयार झाली..
आणि एक दिवस तो उडुन गेला ट्रेनिंगसाठी..
पहिल्याच दिवशी सैरभैर झाला तो. तिला बोलायची अनावर ईच्छा झाली किमान एक मेल तरी टाकावा अस राहुन राहुन वाटलं. पण सावरला आणि कामात गढून गेला.
दोन महीन्यानंतर...
आज त्याचा परतायचा दिवस. आता एअरपोर्टवर ती येईल एखादं छानसं गुलाब घेउन पाणावल्या डोळ्यांनी म्हणेल वेलकम... किती वाट पहायची..?
हे रिस्टवाँच तिला नक्की आवडेल एव्हढ महागडं का आणलं म्हणून ओरडेल नेहमी सारखी...
पण ती आलीचं नाही. वडील आणि मित्रचं फक्त तिथे. तो गोंधळला वारंवार बाहेर पाहू लागला.
रागावली असेल कदाचित...!
संध्याकाळी भेटुन, गुडघ्यावर बसुन तिला म्हणायचं जिंकलीस तू.. नाहीच जगता येणार तुझ्याशिवाय.. खुदकन हसेल न मिठित येऊन बसेल मग...
संध्याकाळी धावतपळत तो बागेत पोहचला.. तिथेही शुकशुकाट...!
हातात फुलांचा गुच्छ न गिफ्ट घेऊन ताटकळत राहिला खुप वेळ.
शेवटी काँल केला...
स्विच ऑफ...???
भयंकर रागावला आता. भेटल्यावर खडसावायचं चांगलचं.. कंटाळून तो परतला...
रात्री मात्र काही केल्या झोप येईना... तिचा सेलसुध्दा ऑफचं..!
fb वर जाण्यासाठी त्यान लॅपी उघडला.. तिचा मेसेज..
प्रिय आकाश.
कल्पना आहे तु रागावला असशिल.
खरतर संपर्कात न राहण्याची अट घालुन तु निघून गेलास तेव्हा कससच झालं.
पण रिकाम्या वेळात विचार करतांना कैक नविन गोष्टिंचा उलगडा झाला.
या नात्यात मला काही स्पेसचं नाही. नेहमी तु म्हणशील तिच पुर्व दिशा.
जगात मलाही माझी ओळख असावी.. मला माझ करीअर आहे, तुझ्या प्रेमापोटी साफ विसरलेच होते... घरघर, मुलबाळं नकोय मला असलं काकूबाई आयुष्य..!
माझा विचार सोड. जमणार नाही आपलं.
क्षितीज म्हणजे आभाळ नी धरतीच्या मिलनाची जागा अस सांगितल होतसं. खरतर ते कधीच भेटत नसतात एकमेकांना..
कल्पना आणि वास्तव दोन्ही गोष्टी भिन्नचं.
साँरी..
मला वास्तवात जगायचयं आता, कल्पनेत नाही.
चांगली मुलगी बघून लग्न उरकुन टाक...
मोठ्यानं ओरडावस वाटल त्याला. डोळे घळघळु लागले.. विंचवान दंश केल्यागत वेदना सर्वांगभर पसरली..
मस्तक सुन्न पडलं.. ओंजळीत तोंड घेउन मुसमुसायला लागला.  फिक्कट चेह-यानच त्यांन ऑफीसच आगत स्वागत स्विकारलं.. मॅनेजरच्या खुर्चित बसतांनाही त्याला आनंद नव्हता. त्याला घरी जावसं वाटलं. थांबला कसाबसा..
संध्याकाळी सरळ बागेत गेला. नेहमीची जागा.. अन् डोळे पाणावले... कितीतरी हृद्यंगम भेटी तरळल्या नजरेसमोर क्षणात.. आठवांच्या विखारी इंगळ्या पुन्हा डसू लागल्या. पुन्हा सेल काढला परत ऑफचं..
कुणाशी फारसं न बोलता ,काम करत, रडत कुढत तो दिवस कंठु लागला..
आणि एक दिवस अचानकचं मित्रांच टोळक त्याच्या घरी धडकलं.. हास्यकल्लोळात तो नावापुरताचं.
काय झालयं एव्हढा उदास का?
nothing, त्यान विषय टाळला.
पण मित्र खनपटीलाच बसले.
ब्रे---क---अ---प.....!!
मान वळवत तो चाचरत बोलला अन् क्षणात वातावरण बदललं...!
जडाउन त्यान सगळ सांगितलं..
झाल ते वाईटचं.. मुली असतातच अश्या.. सावरं.. आयुष्याचा सत्यानाश नको. जाळ तिचे फोटो ग्रिटिंग्ज.. फेक गिफ्ट कचर्यात. डिलीट मेसेजेस..
काही दिवसात घरी सुध्दा कळलं.. सावरलं सगळ्यांनी मिळुन.
आता तिच्या विचारानही त्याला संताप यायचा... मनसोक्त शिव्या हासडायचा तो...
लग्नाची कुजबुज सुरु झाली घरी. या रविवारी त्यानं मुलगी बघायच नक्की केलं.
तो बाहेर पडला.. अचानकच अंधारुन आलं अन जोरदार सरी कोसळू लागल्या, आस-यासाठी तो एका हाँटेलात शिरला..
आकाश राईट...? कुणितरी जवळ येत त्याच्याशी बोललं..
हो..! पण तु..?
अरे मी अवनीची मैत्रिण. कशी आहे आता ती...?
बरी.. तो सहज बोलुन गेला.
एकदाच भेटले तिला. पण खुप वाईट झाल यार..!!
त्याला काहिचं संदर्भ लागेना..
म्हणजे तु गेल्यावर हप्त्याभरातच तिचा अपघात नंतर मेजर सर्जरी... कस सहन केल असेल बिचारीने..?
म्हणजे तिचा अपघात झाला.. त्याला गरगरुन आलं....
डोळ्यापुढे अंधारि आली मटकन खाली बसला तो.
अरे काय झाल?
क्षणात तो ऊठला अन भर पावसात धावत सुटला..
बेल वाजली. दारात तिची आई...
अवनी कुठेय?
त्या रुममध्ये. पण आपण?
ओल्या अंगानिशीच तो रुमकडे धावला. तिची आई त्याच्या मागं..
त्या रुममधला डेटाँल न औषधांचा तिव्र भपकारा आला.
तु...? ती चपापलिचं.. उठुन बसण्यासाठी धडपडली.
आकाश.. तिच्या आईकडे बघुन ती बोलली. तशी तीची आईही निघुन गेली.
रागावलोय तुझ्यावरं.. तिच्या जवळ जात भावनावेगान तिचे दोन्ही हात पकडले त्यानं..
ऐक ना..!
नाही ऐकायचं. एव्हढ घडुन मला काहिच थांग नाही लागु दिलास...
कसं कळवू? तुझ्याशिवाय भानावरच नव्हते. अपघातात डाव्या कुशीत गज शिरला. सर्जरी केली पण ईन्फेक्शन झालचं औषधांचा पण उपयोग नाही झाला एव्हढं वाढल की गर्भाशयचं काढाव लागलं माझं....!!
कशी देणार मी तुला मुलं मगं...? म्हणुन.. पुढचे सगळे शब्द अश्रुत मिसळले....
गहिवरुन त्यान मिठीत घेतलं...
मुल नाही तर नाही. पण मला तु हविस अवनी. दत्तक घेता येतील मुलं.. पण तुझ्याशिवाय नाहीच जगता येणारं...!!
त्याला बिलगुन ती स्फुंदत होती...
बाहेरचा पाऊस आता थांबला होता...
अन् आभाळही निरभ्र झाल होतं..
समाप्त.
महेंद्र कांबळे.

डायरीचं पानं...

हो मला दुःख होतं. वेदना होतात.
कुणी अपमान केला तर
कानशीलही तापतात. कौतुक
वाट्याला आल्यावर मी हुरळून जातो.
आनंद झाल्यावर हसतो अन् रडतो देखील.
उदासीनता, अस्वस्थता, नैराश्य ते तर
येतचं. किंबहुना ते यावचं.
एखादा सुंदर चेहरा समोरुन जाताच
बघण्याचा मोह होतो. फुलांचा गंध,
पहिल्या सरिचा मृद्गंध मला बेभान करतो.
ह्या गोष्टींमुळे मला जिवंत
असल्याचा भरवसा येतो.
साधा माणुस आहे मी षडरिपूनी युक्त असा.
कुणी योगी नाही स्थितप्रज्ञ तर मुळीच
नाही....
पण एखाद्या फुलाचा उरभर सुगंध घेतांना ते
चुरगाळू नये याच भानं मी कायम ठेवतोचं.
महेंद्र कांबळे. .

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected