लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

coverpage

डायरीच पानं.. कोहम..?

एक खुप सुंदर शब्द आहे...
"कोहम"....!
म्हणजे who am i?
दिवसभर धावपळ करुन रात्री थकुन अंथरुणावर पडल्यावर हा प्रश्न कधी कधी फार छळतो. कोहम..?
पुस्तकाच्या कपाटातल कुठलच पुस्तक अश्यावेळी रिझवत नाही...
गझलसुध्दा ऐकाविशी वाटत नाही..
मन अगदीच सैरभैर... अस्वस्थ...
दिवसभरात किती मुखवटे चढवावे लागतात
चेह-यावर...
हे मुखवटे रात्रीच्या निरव शांततेत उतरवून खिडकीतल्या चांदण्याकडे बघत मी मनाशीच विचार करतो.... कोहम....?
पण उत्तर काही केल्या गवसत नाही...!!!
बहुधा ते कधीच गवसणारं नसावं...!
महेंद्र कांबळे.

होय मी फुटपाथ आहे..

होय मी फुटपाथ आहे..
रस्त्याच्या बाजुला असलेला..
कायम सगळ्यांनी दुर्लक्षीलेला...
आता सिग्नल पडेल
आणि ती हातात गजरा असलेली
केसांना तेल नसलेली मुलगी
प्रत्येक गाडीजवळ जाऊन
घ्या ना ओ सायब
घ्या ना ओ सायब म्हणेल..
तो फाटक्या बनियानीतला पोरगा
झपाझप गाड्या पुसत सुटेल..
कडेवर बाळ घेतलेली मळकट चेह-याची ती
दिणवाण्या हावभावासह
भिक मागेल..
माझ्यावर पाँलिशसाठी बसलेला तो किशोर..
खुप मेहनती आहे तो..
चहा देणारा सलीम
झाडुवाला रतनं...
माझ्या अंगाखांद्यावरच तर वाढलेत सारे..
खर सांगु?
यातल्या प्रत्येकालाच वाटत खुप शिकावं..
चांगल खावं प्यावं अन् ल्यावं...
ऑफीसमधुन येतांना त्यांच्यासाठीही पप्पांनी चाँकलेट आणावं..
मम्मीच बोट धरुन शाळेत जाणारी मुलं पाहीली ना..
की यातले कित्येक रडतात.
पण पोट.....
त्याच्याचसाठीतर ही लाचार झालीत..
काही वर्ष उलटतील...
मग ती भिक मागणारी, गजरेवाली
भडक पोशाख करुन
पावडर लाली लावुन
माझ्यावर उभ्या राहुन
गि-हाईक हेरतील..
आणि चहावाला झाडुवाला
माझ्यावरचं बसुन नशापाणी करतील
काहिजण चो-यामा-या करतील दादा होतील..
आणि पोलीसांच्या वा स्वतःसारख्यांच्याच गोळ्यांनी संपतील..
वेदना होतात हो..
कदाचित मी माणुस नाही म्हणुनही होत असतीलं...
होय मी फुटपाथ आहे
रस्त्याच्या बाजुला पडलेला
अन् सगळ्यांनी दुर्लक्षीलेला..
महेंद्र कांबळे.

कवितेची एक ओळं....!

अस्वस्थ आयुष्य अन्
जिवाचीया तळमळं
डोळ्यातुनही रे दुःख
वाहू लागे घळघळं
देई दिलासा निखळं
कवितेची एक ओळं..
घुसमटलेलं जिणं
साचलेली मरगळ
आनंदाच्या झ-याचिही
आटलेली खळखळं...
करी आयुष्य वेल्हाळं..
कवितेची एक ओळं...
धावधाऊनी थकता
ठसठसतांना वळं...
होई काहिली काहिली..
अशी सोसतांना झळं...
देई लढायाचं बळं..
कवितेची एक ओळं...
महेंद्र कांबळे.

कवितेची एक ओळ2

कवितेची एक ओळ...
डांबलीय अंधार कोठडीत
बोथटल्यात संवेदना
मनावर पांघरलय चिलखत...
सहा वर्षीय मुलीवर बलात्कार..
काळजात कालवत नाही
प्रतीष्ठेसाठी मुलीचा खुन..
काहीच वाटत नाही..
भुकेजून फोडलेला टाहो
जात नाही चिरत काळजं..
पुंडाई पाहून देतो..
स्वतःला शिखांडी समज...
दुस-याच यश पाहुन
जळफळाट जळफळाट होतो...
सरस काम नकोच...
साहेबांचा हरकाम्या होण्यात
धन्यता मानतो..
मशगुल आहे स्वतःत..
दिमाखात मिरवतोय डबक्यातला कुपमंडूक
ताज..
अधिक लक्ष कोसल्याचे धागे मजबुत
करण्यात...
पण कधीतरी वाटल होतं..
ही कवितेची एक ओळ..
अंधार जाळत सुटेल..
अन् अंधारल्या आयुष्यात
तेजोमयी तांबड फुटेलं..
महेंद्र कांबळे.

चल ना यार पुन्हा एकदा........

चल ना यार पुन्हा एकदा
शाळा शाळा खेळुया...
दुस-यांनी डाव मांडलेल्या गोट्या
धुम घेऊन पळुया.
चल ना यार पुन्हा एकदा....
मारकुट्या गणित मास्तरांना
नंदीबैल म्हणुन चिडवुया
नक्कल करुन हेडमास्तरांची
पुन्हा खिल्ली ऊडवुया.
चल ना यार पुन्हा एकदा...
टळटळीत दुपारी मसणवट्यात
भुत शोधत हिंडुया
ईवल्या ईवल्या खोड्या करुन
एकमेकांशी भांडुया.
चल ना यार पुन्हा एकदा...
गरम गरम फुफाट्यातून
चिंगाट पळत सुटूया
आइसकांडीवाल्या मामाचं
गारेगार चाखुया
चल ना यार पुन्हा एकदा...
गाभुळ गाभुळ चिंचा
शेंड्यावर जाऊन तोडुया
पाडाचा आंबा पुन्हा
नेम धरुन पाडुया.
चल ना यार पुन्हा एकदा...
सकाळी कट्टी बट्टी करुन
दुपारीच गट्टी फु करुया
टिव्हीवरचा मिथुन पाहुन
पुन्हा टाळ्या पिटुया.
चल ना यार पुन्हा एकदा...
पहिल्या सरीचे थेंब झेलण्या
परत आतुर होऊया
भिजला का म्हणुन आईचे
खमंग धपाटे खाऊया.
चल ना यार पुन्हा एकदा....
कुसुमाग्रजांची कणा पुन्हा
चिमण्या आवाजात गाऊया
पुन्हा एकदा फुलपाखरामागं
वेडपिसं धाऊया...
चल ना यार पुन्हा एकदा....
------------------------
महीन्याच टार्गेट पुर्ण करण्याचं...
साँलीड टेन्शन असतांना
किती साईट्स व्हिजीट केल्यात
अस बाँस विचारतांना...
गुदमरलेल्या ऑफीसात पुन्हा..
जुनी शाळा शोधुया...
चल ना यार पुन्हा एकदा
शाळा शाळा खेळुया...
(अर्घ्यदान या माझ्या काव्यसंग्रहातुन)
महेंद्र कांबळे.

रंगपंचमी....!

लहानपणी किती आतुरतेन
पंचमीची वाट पहायचो
सकाळीच फाटके कपडे
अंगावर चढवायचो...
नसला जरी रंग तरी नुस्तच पाणी उडवायचो..
टोळकं टोळकं करुन
मस्त हूंदडत रहायचो
याच्या त्याच्या बैलाला
बो.ऽऽऽ करत फिरायचो..!
पळसफुल कुटून केलेला
"नॅचरल रंगं"....
पोटामध्ये जाई खुशाल
पुरणपोळीच्या संगं..
कुणाच्या तरी तोंडाला
फासलेल वंगण..
तव्याचं काळ अन्
रंगलेलं ओलं अंगण...
रंग खेळून दमल्यावर मग
आणखी पोरं जमवायचो
गावभर बोंबलत फिरुन
नदीत डुंबायला जायचो.
आज आहे एखाद्याचं
रंगाच दुकान..
स्वत:च बांधलय कुणी
रंगीबेरंगी मकान...
पण त्या निर्भेळ आनंदाला
जो तो मुकलाय गड्या
आयुष्यातला रंग आता..
कुठतरी हरवलाय गड्या..!
महेंद्र कांबळे.

काँलेजचे वेडे दिवस कधी येतात का माघारी....?

विसरायचं कसं...?
B.M. चं लेक्चरं
उडवलेली टर
खडुंचा मारा
चुकवलेली नजर...
विसरायचं कसं...?
इंटर्नल ग्रुपिंग
क्लासमधलं चॅटींग
सगळ्यांना कटवून
केलेल डेटिंग...
विसरायचं कसं...?
काँमन ऑफचा दंगा
HODशी पंगा..
क्लासटिचरला हळुच
कुणीतरी सांगा..
विसरायचं कसं...?
लिहीलेल्या असाईन्मेंट्स
प्रॅक्टीकलचं टेन्शन..
रेग्युलर आहे म्हणतं
आलेलं डिटेंशन...
विसरायचं कसं...?
टिफीनचं शेअरींग
पार्किंगमधल्या गप्पा
कुणासाठी मनाचा
हळवा एक कप्पा...
विसरायचं कसं...?
अॅटीट्युड फुकाचाच
एक टाँट उगीचाच
टाँपरला त्रास...
C.Rला वनवास...
विसरायचं कसं....?
क्रिकेटची मॅच
गॅदरींगची धमाल..
प्रोजेक्टसाठी
बनलेलो हमाल...
विसरायचं कसं...?
PL च्या रात्री..
डाऊट्सचे फोन
पहाटच्या चार पर्यंत
जागतयं कोण कोण..?
विसरायचं कसं...?
A4 बॅच...
सगळ्यांना जाच
चहाची काँट्री
फक्त रुपये पाचं...
विसरायचं कसं..?
समज गैरसमज
चिडण चिडवणं..
गरज पडली तर
सपोर्टला धावणं..
विसरायचं कसं...?
-------------------------
अविट गोडीच्या त्या एकाका क्षणाला...
खरतरं ईथ विसरायचचं आहे कुणाला...?
उद्या कदाचीत नावसुध्दा मिळेल...
हातात बराच पैसाही खुळखुळेल...
पण काँट्रीची नुस्तीचं मज्जा तिथे असणार नाही....
जाणुण बकरा करणार कुणी दिसणार नाही...
डोक्यात जेव्हा चमकेल
एखाद दुसरा रुपेरी केस...
आरसा दाखवेल जेव्हा..
सुरकुतलेला फेस...
हेचं क्षणं तेव्हा फार हसवतील गड्या...
हसतांना हळुच रडवतील गड्या...
तेव्हाच्या विरंगुळ्याची हिच असेल शिदोरी...
काँलेजचे वेडे दिवस कधी येतात का माघारी....?
महेंद्र कांबळे.
miss u guys luv u all.

दिप घेउन चाल गड्या.....!

दिप घेउन चाल गड्या
वस्तीत अंधार दाटलाय फार...
वाटतोय प्रत्येकच भयभीत ईथला..
चहुकडे माजलाय हाहाकार...
दिप घेऊन चाल गड्या..
गल्लोगल्ली अन् रानोमाळ...
फुलव अंगणोअंगणी प्रकाश...
तिमिराला नित्य जाळं...
दिप घेऊन चाल गड्या...
कर एकाच तरी आयुष्य उजळं...
जरी सुर्य नाही होता आलं...
तरी निदान पणती होऊन जळं...!
महेंद्र कांबळे.
(माझ्या "अर्घ्यदान"
या काव्यसंग्रहा मधून)

राती....

एकटाचं उरलो..
या सुन्न किर्र राती..
नको काजवे सये
दे सुर्य आता हाती...
ही निज थांबलेली
उंब-यावर राती...
झोपू नकोस वेड्या
का काजवे हो गाती...
डोळा सयं दाटली..
आषाढलेल्या राती....
भिजुन चिंब गेली..
ही मनाचिया माती...
भेसुर शांतता ही
स्मशानलेल्या राती
माणसेचं का आता...
शव माणसांचे खाती...?
महेंद्र कांबळे.

निरभ्र..!!!

त्याला मुलं आवडायची. त्यांच्या निरागसतेन तो आनंदविभोर होई. त्यांचे गोबरे गाल, गुलाबपाकळ्यागत ओठ, कुरळे केश.. हातापायाचा लुसलुशीत मखमली स्पर्श, न्हाऊमाखु घातल्याचा गर्भगंध.. त्यांच्या बोबडबोलाने तर पार आनंदवेडाच होई तो.
काँलनीतल्या कैक बच्चे कंपनीचा तो आवडता दादा होता.
त्याला तिही खुप आवडायची. चिमुकल्यांसारखीच तिही निरागसचं..! ती रुसुन गाल फुरंगटुन बसली की भारीचं मज्जा येई त्याला.
ऐन भरात असलेला त्यांच्या प्रेमाच वसंत.. प्रितीची पाकळी न पाकळी फुललेली.. आयुष्याला एक अभुतपुर्व बहर आलेला..
रोज आँफीसमधुन थेट तिला भेटायलाच जाई तो बागेत. कामातही सारखा तिचाच विचार. तिची तरी अवस्था याहून काय वेगळी होती.. कधी काँलेज संपत अन् कधी सांज होते असं व्हायचं तिला.
सलग दोन वर्षापासुन रोज भेटत ते.. पार गडद होईपर्यंत. दोघांनाही वाटायचं सांज होऊच नये. वेळ पूढे सरकुच नये.
दुर ढळणा-या सुर्याकडे बघत तो म्हणायचा..
मला ना अकरा मुलं हवीतं..
मला ठेवतोस की नाही ?
ती लटकंच चिडायची.
अगं धृतराष्ट्राला शंभर होते आपली क्रिकेट टिमही नको का?
जा रे..! एक किंवा दोनचं. आणि पहिला मुलगाचं पण नाव काय रे ठेवायचं.?
क्षितीज..!!
का?
अगं आभाळ नी पृथ्वि जिथं भेटतात ती जागा म्हणजे क्षितीजं...! तु अवनी मी आकाश नि म्हणुन तो क्षितीज..
ती हरखुन जायची तेव्हा. वयच स्वप्नाळु. एकमेंकात हरवलेले ते पुढच्या आयुष्याच्या स्वप्नात रंगुन जातं.
ती मध्येचं त्रसिक सुरात विचारायची..
पण कधी रे करायचं लग्न आपण ?
तिला हळुचं मिठीत घेत तो म्हणायचा..
प्रमोशन होईल माझं ईतक्यात. नविन प्रोजेक्ट घेणारेय कंपनी. कामावर बेहद खुश आहे मॅनेजमेंट, पक्का मलाच मिळेल प्रोजेक्ट मग मी मॅनेजर. अन् आता तुझीही डिग्री होईलचं की या वर्षी. मग लगेच लग्न..
ती घट्ट बिलागची मग त्याला.. बराचवेळ कुणी काहीचं नाही बोलायचं मग..
 आणि एक दिवस तिच्यासाठी पेढे घेउन तो नाचतचं आला..
माझं प्रमोशन झालयं...!
ति तर वेडीच झाली आनंदान. काय करु न काय नको. काही बोलायच भानचं नाही उरलं...
त्याच्या खांद्यावर डोकं ठेउन तिनं डोळे मिटले..
ऐकतेस...?
काय?
मला ट्रेनिंगसाठी दोन महीने मॅक्सिकोला जाव लागेल..
खळकन डोळेच पाणावले तिचे....
त् तुझ्याशिवाय दोन महिने..? कशी रे जगु..?
ए वेडाबाई. मी काय कायमचा चाललो का ? नि पैसे पण मिळतील खुप म्हणजे तुला स्विर्त्झंलंडला नेता येईल लग्नानंतर..
त्याचा हात घट्ट दाबला तिनं..
मला नाही सहन होणार एकही क्षण....
दिर्घ सुस्कारा टाकला त्यानं
त्यालासुध्दा कुठ वाटत होतं तिला सोडुन जावं..
खुप वेळनंतर बराचसा गंभीर होत त्यान विचारल...
एक बोलु ?
हं..!!
दोन महीने काँन्टॅक्ट तोडायचा आपण.. no call, msg & no mail...
ती चिनभीनंच झाली..
का?
शांतपणे तो उत्तरला..
बघं गेल्या दोन वर्षापासून रोज भेटतो आपणं... शिवाय फोनवर तास न् तास बोलतोचं. पण लग्न करायचयं आता. प्रेमात सगळच गोड गोड असतं पण संसार वेगळाचं. म्हणुन या नात्याचा त्रयस्थपणे विचार करुन निर्णय घेउयात..
हे काय भलतचं? वैतागुन आगतिक होऊन तिन विचारलं..
अगं सर्रास किती लग्न मोडतात हल्ली.. आपल तसचं होऊ नये असं वाटत मला..
शेवटी खुप मनधरणी केल्यानंतर ती तयार झाली..
आणि एक दिवस तो उडुन गेला ट्रेनिंगसाठी..
पहिल्याच दिवशी सैरभैर झाला तो. तिला बोलायची अनावर ईच्छा झाली किमान एक मेल तरी टाकावा अस राहुन राहुन वाटलं. पण सावरला आणि कामात गढून गेला.
दोन महीन्यानंतर...
आज त्याचा परतायचा दिवस. आता एअरपोर्टवर ती येईल एखादं छानसं गुलाब घेउन पाणावल्या डोळ्यांनी म्हणेल वेलकम... किती वाट पहायची..?
हे रिस्टवाँच तिला नक्की आवडेल एव्हढ महागडं का आणलं म्हणून ओरडेल नेहमी सारखी...
पण ती आलीचं नाही. वडील आणि मित्रचं फक्त तिथे. तो गोंधळला वारंवार बाहेर पाहू लागला.
रागावली असेल कदाचित...!
संध्याकाळी भेटुन, गुडघ्यावर बसुन तिला म्हणायचं जिंकलीस तू.. नाहीच जगता येणार तुझ्याशिवाय.. खुदकन हसेल न मिठित येऊन बसेल मग...
संध्याकाळी धावतपळत तो बागेत पोहचला.. तिथेही शुकशुकाट...!
हातात फुलांचा गुच्छ न गिफ्ट घेऊन ताटकळत राहिला खुप वेळ.
शेवटी काँल केला...
स्विच ऑफ...???
भयंकर रागावला आता. भेटल्यावर खडसावायचं चांगलचं.. कंटाळून तो परतला...
रात्री मात्र काही केल्या झोप येईना... तिचा सेलसुध्दा ऑफचं..!
fb वर जाण्यासाठी त्यान लॅपी उघडला.. तिचा मेसेज..
प्रिय आकाश.
कल्पना आहे तु रागावला असशिल.
खरतर संपर्कात न राहण्याची अट घालुन तु निघून गेलास तेव्हा कससच झालं.
पण रिकाम्या वेळात विचार करतांना कैक नविन गोष्टिंचा उलगडा झाला.
या नात्यात मला काही स्पेसचं नाही. नेहमी तु म्हणशील तिच पुर्व दिशा.
जगात मलाही माझी ओळख असावी.. मला माझ करीअर आहे, तुझ्या प्रेमापोटी साफ विसरलेच होते... घरघर, मुलबाळं नकोय मला असलं काकूबाई आयुष्य..!
माझा विचार सोड. जमणार नाही आपलं.
क्षितीज म्हणजे आभाळ नी धरतीच्या मिलनाची जागा अस सांगितल होतसं. खरतर ते कधीच भेटत नसतात एकमेकांना..
कल्पना आणि वास्तव दोन्ही गोष्टी भिन्नचं.
साँरी..
मला वास्तवात जगायचयं आता, कल्पनेत नाही.
चांगली मुलगी बघून लग्न उरकुन टाक...
मोठ्यानं ओरडावस वाटल त्याला. डोळे घळघळु लागले.. विंचवान दंश केल्यागत वेदना सर्वांगभर पसरली..
मस्तक सुन्न पडलं.. ओंजळीत तोंड घेउन मुसमुसायला लागला.  फिक्कट चेह-यानच त्यांन ऑफीसच आगत स्वागत स्विकारलं.. मॅनेजरच्या खुर्चित बसतांनाही त्याला आनंद नव्हता. त्याला घरी जावसं वाटलं. थांबला कसाबसा..
संध्याकाळी सरळ बागेत गेला. नेहमीची जागा.. अन् डोळे पाणावले... कितीतरी हृद्यंगम भेटी तरळल्या नजरेसमोर क्षणात.. आठवांच्या विखारी इंगळ्या पुन्हा डसू लागल्या. पुन्हा सेल काढला परत ऑफचं..
कुणाशी फारसं न बोलता ,काम करत, रडत कुढत तो दिवस कंठु लागला..
आणि एक दिवस अचानकचं मित्रांच टोळक त्याच्या घरी धडकलं.. हास्यकल्लोळात तो नावापुरताचं.
काय झालयं एव्हढा उदास का?
nothing, त्यान विषय टाळला.
पण मित्र खनपटीलाच बसले.
ब्रे---क---अ---प.....!!
मान वळवत तो चाचरत बोलला अन् क्षणात वातावरण बदललं...!
जडाउन त्यान सगळ सांगितलं..
झाल ते वाईटचं.. मुली असतातच अश्या.. सावरं.. आयुष्याचा सत्यानाश नको. जाळ तिचे फोटो ग्रिटिंग्ज.. फेक गिफ्ट कचर्यात. डिलीट मेसेजेस..
काही दिवसात घरी सुध्दा कळलं.. सावरलं सगळ्यांनी मिळुन.
आता तिच्या विचारानही त्याला संताप यायचा... मनसोक्त शिव्या हासडायचा तो...
लग्नाची कुजबुज सुरु झाली घरी. या रविवारी त्यानं मुलगी बघायच नक्की केलं.
तो बाहेर पडला.. अचानकच अंधारुन आलं अन जोरदार सरी कोसळू लागल्या, आस-यासाठी तो एका हाँटेलात शिरला..
आकाश राईट...? कुणितरी जवळ येत त्याच्याशी बोललं..
हो..! पण तु..?
अरे मी अवनीची मैत्रिण. कशी आहे आता ती...?
बरी.. तो सहज बोलुन गेला.
एकदाच भेटले तिला. पण खुप वाईट झाल यार..!!
त्याला काहिचं संदर्भ लागेना..
म्हणजे तु गेल्यावर हप्त्याभरातच तिचा अपघात नंतर मेजर सर्जरी... कस सहन केल असेल बिचारीने..?
म्हणजे तिचा अपघात झाला.. त्याला गरगरुन आलं....
डोळ्यापुढे अंधारि आली मटकन खाली बसला तो.
अरे काय झाल?
क्षणात तो ऊठला अन भर पावसात धावत सुटला..
बेल वाजली. दारात तिची आई...
अवनी कुठेय?
त्या रुममध्ये. पण आपण?
ओल्या अंगानिशीच तो रुमकडे धावला. तिची आई त्याच्या मागं..
त्या रुममधला डेटाँल न औषधांचा तिव्र भपकारा आला.
तु...? ती चपापलिचं.. उठुन बसण्यासाठी धडपडली.
आकाश.. तिच्या आईकडे बघुन ती बोलली. तशी तीची आईही निघुन गेली.
रागावलोय तुझ्यावरं.. तिच्या जवळ जात भावनावेगान तिचे दोन्ही हात पकडले त्यानं..
ऐक ना..!
नाही ऐकायचं. एव्हढ घडुन मला काहिच थांग नाही लागु दिलास...
कसं कळवू? तुझ्याशिवाय भानावरच नव्हते. अपघातात डाव्या कुशीत गज शिरला. सर्जरी केली पण ईन्फेक्शन झालचं औषधांचा पण उपयोग नाही झाला एव्हढं वाढल की गर्भाशयचं काढाव लागलं माझं....!!
कशी देणार मी तुला मुलं मगं...? म्हणुन.. पुढचे सगळे शब्द अश्रुत मिसळले....
गहिवरुन त्यान मिठीत घेतलं...
मुल नाही तर नाही. पण मला तु हविस अवनी. दत्तक घेता येतील मुलं.. पण तुझ्याशिवाय नाहीच जगता येणारं...!!
त्याला बिलगुन ती स्फुंदत होती...
बाहेरचा पाऊस आता थांबला होता...
अन् आभाळही निरभ्र झाल होतं..
समाप्त.
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected