लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

'अर्घ्यदान'चं दैनीक 'सकाळ'मध्ये आलेलं परिक्षणं..

काँलेज (ग्रामिण) ........

काँलेज (ग्रामिण)
या येळी ठरवलचं व्हतं.. जाणार
आपणबी कालेजात जाणार...
ती निळीजांबळी झॅक बिल्डींग
आयन्यावाणी फरश्या
मोठी पुस्तकाची लायबरी त्या गार्डनमंदी झोकात
फिरणार... जाणार आपणबी कालेजात
जाणार... ईस्त्री केलेले मास्तर..
भल्या मोठ्या खोल्या चितरागत
कापडातली पोरं... हाव डू हाव डू मनना-
या
पोरी...
आपणबी हाव डू मननारं..
जाणार आपणबी कालेजात जाणारं...
त्या दिशी सांचाला बाला सपश्टच
सांगीतलं... बा यंदा धावी व्हईल
मंग मला कालेजात धाड
दोन जिनच्या पँड घे साळतल्यासारख
ढुंगणावर ठिगळवाली ईजार नगं
शरट पण घे
या येळी गाड्यावरच नग दुकानातले घे...
बेवडा मारता मारता बाप हसला पण लय
बेस बोलला
एक टायमचा बेवडा कमी करणार पण
तुला शिकीवणार
तू मोठा लेक....
धाडणार तुला कालेजात धाडणार... पण
धावी पास नापास कळायच्या आतचं.. बाप
लिवर फुगुन गेला..
निस्त नवसागरच व्हतं
त्याच्या लिवरमधी... माय मने तुवा बाप
चांगला व्हता दारू ढोसायचा पर
घराकडबी बगायचा... आता सा जिवाच
एकटी कसं बगू..? तू मोठा लेक
तुबी द्याया पायजी टेकू.... आता त्याच
कालेजापुडच्या हाटेलात
कपबश्या ईसळतांना... मन
कवा कवा ईचारत...
आपण कवा कालेजात जाणारं...?
सालं आपण कवा कालेजात जाणार...?
महेंद्र कांबळे.

काँलेज म्हणजे....

काँलेज म्हणजे....
काँलेज म्हणजे....
उरात स्वप्न
अन् पंखात बळ...
स्वतःला सिध्द करण्याची
अविरत तळमळं...
काँलेज म्हणजे...
ओस ओस क्लास
अन् फुललेला कट्टा
कट्ट्यावरती तोंडाचा

सुरू दांडपट्टा...
काँलेज म्हणजे...
मागे बसुन दंगा
कुणाशिही पंगा
मॅमला दिलेला त्रास
अन् मोग-याचा श्वास...
काँलेज म्हणजे...
भटकायचा आटापिटा
सरसरत्या पावसात
धुंडाळलेल्या वाटा...
काँलेज म्हणजे
एक मिसळ सहा पाव
भैय्या चार कटींग लगावं..
टिचर्सची खपामर्जी..
गरमागरम अंडाभुर्जी..
काँलेज म्हणजे
कुणालातरी छेडणं
कुणीतरी आवडणं..
कुणाच्यातरी नंबसाठी
लाख लफडी करणं...
काँलेज म्हणजे
काँमनऑफची दमदाटी
क्वचीत लाडिगोडी
अन् पेट्रोलपंपपर्यंत
ढकलत नेलेली गाडी...
काँलेज म्हणजे...
नुस्तीच मज्जा करणं..
एकमेकांच्या बापाच्या नावानं..
एकमेकांना हाका मारणं...
काँलेज म्हणजे
लंचब्रेकमध्ये डब्बा शेअर करणं...
सतत तिच्या गोष्टी सांगुन
मित्रांना बोअर करणं...
काँलेज म्हणजे...
बहरलेली रातराणी
टेबल वाजवत म्हटलेली
बेधुंद गाणी...
काँलेज म्हणजे
क्रिकेटची मॅच
गुडघे फोडुन घेतलेला
अफलातुन कॅच...
काँलेज म्हणजे
काँरीडोरमध्ये केलेली झुकझुक गाडी
पिएलमध्ये वाढलेली दाढी
परिक्षेची धाकधुक थोडी...
काँलेज म्हणजे
फाटका खिसा
अन् काँलेज म्हणजेच
"विद्यार्थीदशा"..
काँलेज म्हणजे....
मित्राची घट्ट मिठी
मैत्रिणीच ओळखिच हसू..
अविरत चालत राहत काँलेज...
भले आपण त्यात असू किंवा नसू....
महेंद्र कांबळे.

माझ्या त्या सा-या कविता .........

माझ्या त्या सा-या कविता
ज्यात कधी चंद्र असायचा
कधी सुर्य दिसायचा
कधी मोगराही गंधवेड हसायचा.
माझ्या त्या सा-या कविता
ज्यात सकारात्मकतेचा सूर होता
धपापता उर होता
गढुळपिवळा पूर होता.
माझ्या त्या सा-या कविता
काही प्रेमबंबाळ होत्या
काही अवखळ खट्याळ होत्या
काळीजविरहाचा जाळ होत्या.
माझ्या त्या सा-या कविता
ज्यात काव्य अगदिच कमी
पण भावना मात्र अस्सल होती
शब्दाशब्दांमध्ये कसलितरी टस्सल होती.
माझ्या त्या सा-या कविता
कुठली काँलेजमध्ये झळकलेली
एखादी दैनिकात आलेली
एकतर खास 'तिला'
'ईम्प्रेस' करायला लिहिलेली.
माझ्या त्या सा-या कविता
ज्या गझलेवर जळत नव्हत्या
वृत्तबध्द नाहीत म्हणुन सलत नव्हत्या
लोकभितीन काजळत नव्हत्या...
----------------
कधी फार गुदमरायला झाल्यावर
जुन्या वहितून त्यांची भेट घेतो...
अन् त्यांच्याहून नजर फिरवत
एकटाच खुळ्यागत हसत राहतो...
महेंद्र कांबळे.

फुपाटा....

आपल्याबी आयुक्षात
अस कायतरी घडावं
मलेबी वाटते राजेहो
का मी पिरमात पडावं...
कालेजातल्या जवा मी
पोरी पायतो
सर्ग फक्त मले
दोनच बोट रायतो...
पायतो पोरापोरीयला
गुलूगुलू बोलताना
मनात सारखा सुरु रायतो
ताना धिन तंदाना...
म्हनं हे पोर पोरी
संग आईसकीरीम खात्यात
एकमेकाईसंग म्हनं
सिनेमाला बि जात्यात..
एक पोरगी मले
लय लय आवडते
पण दिसली ती का माई
चड्डीच गयते....
--------------------
कालेजातुन जवा
घरी मी येतो
झोपड्याला पाहून मनात
पयला ईचार येतो
पावसाळ्यात गळक्या झोपड्यात
कसं झोपावं?
दोन वर्सापास्न भईन घरीच हाय
तिच्या लग्नाच काय करावं?
थकलेल्या मायचा जवा
चेहरा पायतो..
पिरमाचा ईचार
मनातुनच पयतो...
मले रोज दिसते
करजान बेजार झालेला बाप
अन् भाकरिची वाट पायनारी दिवडी..
संसारगाडा वडायची त्याला चिंता केवडी..?
आठ एकर कोरडवाहू
वायता वायता..
जाईन माई बी जिनगानी सडून
शेतक-याईच्या पोराईन
काय करावं पिरमात पडून?
काय करावं पिरमात पडून?
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे.

हुरहुर....

संध्याकाळच्या मंद प्रकाशात
मी एकटाच...
दिवसभराच्या कामाची
गोळाबेरीज करण्यात मश्गुल
खिडकीबाहेरच्या निंबाची पाने...
हलतात हलके हलके
नुकताच सुर्याच्या सोनेरी किरणांना
त्यांनी निरोप दिलेला....
खिडकीबाहेर टाकतो
सहज एक कटाक्ष
काहीतरी हलतं माझ्याही मनाच्या
खोल खोल डोहातं...
कश्याच्या तरी जाणीवेनं..
बघतो परत मंदस्मित करणा-या
मोहक संध्येकडं,
हातातले कागद गुंडाळून ठेवतं
मी हसतो गालातं..
थंडगार झुळूक चेह-यावर
घेत....
मनाशीच म्हणतो...
'काल जाम भांडली होतीस
फोनवरं.....
आता काय करत असशीलं?'
महेंद्र कांबळे

happy friendship day....

तसा तर मिही एक लहानसा जिवं....
या प्रचंड
पृथ्विगोलाच्या कुठल्याशा एका कोप-यात...
रेगांळत रेगांळत जगणारा
अन् तू भेटलासं...
दुनियेच्या बाजारात चिक्कार अपयशी मी...
जिकण्याच्या घिसाडघाईतही..
माझ्यासाठी तू थांबलास...
माझी लायकीच नाही यार 
विषादून जेव्हा बोललो..
माझ्यासाठी तू खास आहेस
फक्त तूच म्हणालासं...
आता आठवतयं...
पहिल्यादांच जेव्हा खरडल्या होत्या काही ओळी..
त्या वाचून चमकला होता
एक अवर्णनीय आनंद
तुझ्या डोळी...
आणि काँलेजात झळकलेला
तो पहिला लेखं...
त्यात रंग भरायला...
रात्रभर तू खपलासं...
खरतरं तू भरत होतास
तेव्हा रंग...
रंगहिन होत चाललेल्या
माझ्या आयुष्यातचं...
तापभरल्या अंगाने
जेव्हा आलो होतो..
तेव्हा चार शिव्या देऊन
डाँक्टरकडे नेणारा तू होतासं...
तू होतासं...
VIMP नोट्स माझ्यासाठी
झेराँक्स करणारा
गाढवा अभ्यास कर म्हणतं
माझे प्राँब्लम्स साँल्व करणारा..
पैशाच्या चणचणीत स्वतःच एटिएम माझ्या खिशात कोंबणारा...
कुणास ठाऊक पण 
जेव्हा जेव्हा तुझ्याकडं बघतो तेव्हा मला नाही वाटतं की...
मी आहे एक जिवं...
या प्रचंड पृथ्विगोलाच्या
कुठल्याशा कोप-यात
रांगत रांगत जगणारा...
(कायम तुझ्या ऋणाईत)
महेंद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected