लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

उजेडायला हवं...!!!

उजेडायला हवं...!!!
खास काहितरी अस घडायला हवं....
कुणावरतरी प्रेम जडायला हवं...
साचलेलं आयुष्य त्यास सडका वासं.....
झर्यासम बेधडकं पडायला हवं....
थांबलेत अश्रू कधीचे पापणकाठी......
एकवार मोकळुन रडायला हवं.....
रे सोन्याचा जरी पिंजरा तो पिंजराच...
फडफडून एकदा उडायला हवं....
तुडवतो 'माही' रोज काळोखाची वाटं.....
आतमध्ये एकदा उजेडायला हवं.....
महेंद्र कांबळे.

उतारा......

उतारा...
लहाणपणी जेव्हा....
पिवळंधम्मक तोंड करत
बनियानीवर रस सांडवत
तडस लागेपर्यंत आंबे खायचो....

तेव्हा माय (आजी)
मायेनं हातावर चारसहा
जांभळं ठेवत म्हणायची...
'आंबे पचत्यात जांभळानं
हा आंब्यावर रामबाण उतारा हाय'..,
आता......
रात्री ब-याच उशीरवर
मित्रांसोबत 'बसल्यावर'
जेव्हा सकाळी डोकं जडावतं
अन् जिभंही कशिशीच सपकते....
तेव्हा एखादा जिगरदोस्त
हातावर 'टिन' ठेवत म्हणतो...
घे माझ्याजवळ 'उतारा' आहे...
महेंद्र कांबळे.

सर.....

अचानक ब-याच वर्षानंतर
त्या दिवशी प्रवासात सर भेटले...
पायाला हात लावेपर्यंत
मला ओळखलच नाही त्यांनी
आणि मग गप्पकन मिठी मारत म्हणाले...

'बाळ..!!
किती वर्षानंतर भेटतोयसं..?'
सर्वांनाच मायेनं ओथंबलेल्या
'बाळ' ह्या संबोधनानं ते पुकारत....
चार-सहा वाक्यात एक संस्कृत श्लोक
अगदी ठरलेलाचं....
बोलता बोलता बोलून गेले,
'पार बदललंय रे जग...!!
टोंगळ्याएवढं पोरगंही पुड्या खातं
हल्ली...'
बाणाने घायाळ झालेल्या पक्षाची तडफड
दिसली त्यांच्या डोळ्यात..
मी म्हटलं,'सर, उगाच मनाला लावून
घेता तुम्ही'
खरय रे बाबा.....
पण खरं नी प्रामाणिक जगण्याला
हे लोक हरकत का घेतात उगाचं..?
माझा मित्र खाजगी क्लासच दुकान
चालवतो
आणि माझ्यापेक्षा चौपट कमावतो...!
मला मात्र अजुनही
विद्यार्थीच खर धन वाटतात...!!
खेळाच्या तासाला मी विद्यार्थ्यांत
जाऊन खेळतो
त्यांच्यात बसून डबा खातो
म्हणून सहशिक्षक टर उडवतात...
स्टाफरुममध्ये सिगारेटी फुंकत अन्
पान तंबाखुचे तोबरे भरत न बसणारा मी
बावळट आहे का खरचं?
मी म्हटलं,
'सर, पन्नास कामचुकारात
एकावन्नावा कामसू कसा मिसळणार?'
'खरयं...!' ते म्हणाले,
पण हेच लोक संस्थाचालकांपुढं
का शेपटी हलवतात कळत नाही..?
'त्या' संस्थाचालकाच्या वाढदिवसाला
एका महिन्याचा पगार कापला सक्तीनं
आणि त्याला कार भेट दिली...
मी म्हटलं अन्याय आहे.. तर म्हणतात..
'घरी बसा...!'
मला उगाच आत काहितरी तुटल्यासारखं
झालं...
त्यांचा थांबा आला
हात घट्ट पकडून ते म्हणाले....
'काही असो, पण मला माझी जुनी लेकरं
जेव्हा भेटतात...
तेव्हा वाटतं की..
मी जगातला सगळ्यात श्रीमंत अन्
सुखी माणुस आहे..
मी त्यांना निरोप दिला
गाडी सुरु झाली अन् माझे सर मागे
पडले....!!!
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे...
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected