लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

तरक्कीपसंद गझल..

आताच लाविली मी शब्दास धार आहे.
बंडासवेच माझा झाला करार आहे.
आता मला हवासा दे घाव तू कसाया.
तो घाव झेलण्याला हा मी तयार आहे.
बोटात टोचणारा काटाच जाहलो मी.
ही बाग सोडण्याचा माझा विचार आहे.
गेलेत माजुनिया खाऊन कोळसा हे.
देशात आज माझ्या दाता फरार आहे.
आहेस ना खरा तू? मग बोल ना जरा तू.
गांडूळ या जिण्याला माझा नकार आहे.
महेंद्र गौतम.

सृजन सोहळा… वेगवेगळ्या रंगात भेटणारा पाऊस...

तो या वर्षी बेछूट बरसतोय. पण सतत मुसळधार बरसण्याचा कधी त्यालाही कंटाळा येतोच की, मग तो जरा मंद मंद भुरभुरतो. अन् अश्यावेळी 'त्याला' वाटत 'तिनं' जवळ असावं,
जरा सोबतीनं हे भुरभुरतं पाऊसगाणं ऐकावं. पण ती तर कमालीची 'बिझी'. सासू, सासरा, दिरं सगळ्यांचं तिलाच तर करावं लागतं. मग तो जरा खट्टूच होतो, कुरकुरतो. पण ती म्हणते समजुन घे,
गेल्या साली दुष्काळाच्या किती झळा सोसल्यातं, प्यायच्या पाण्याची वाणवा, जिवं की प्राणं असणार गोधनं छावण्यात ठेवावं लागलं. आता सगळं चैतन्य पावसाच्या रुपात परतलयं.
आता मुबलक मिळणार पाणि एकदा भरुन घेऊदे मग मी येतेच.. तोवर जरा थांब.
1.
भुरभूर पावसाची
कुरकुर साजणाची
कशी सोडुनिया येऊ?
कामं घर-अंगणाची.

आत सासू खोकणारी
अन दीर बसे दारी
हव सासूला हि पाणी
आणि दिराला भाकरी
सोडी सासरा 'ऑर्डर'
मला चहा करण्याची
कशी सोडुनिया येऊ?
कामं घर-अंगणाची.

माझ्या मनातही राजा
नाचे श्रावणाचा मोर
समजाऊ तुला कशी?
लागे जीवाला हा घोर
भाषा समजून घेणा
जर माझ्या नयनाची
कशी सोडुनिया येऊ?
कामं घर-अंगणाची.

गेल्या साली तू रुसला
अन दुष्काळ मातला
होता सुना सुना गोठा
आणि सुन्न सुन्न ओटा
थांब थांब रे सजना
वेळ पाणी भरण्याची
कशी सोडुनिया येऊ?
कामं घर-अंगणाची…….
(महेंद्र गौतम.)
अहो तो एकाएकीच मुसळधार आला काल, बिचारीला काही उमगलचं नाही. रानात आडोसा तरी कुठं शोधणार ती? आता भिजण्याशिवाय कुठला पर्यायचं नाही ठेवला पावसानं.
पण गोष्ट ईथच थांबत नाही. त्या भर पावसात सजणान एकांतात तिला गाठलं आणि मग ती नको नको म्हणतांना ते दोघेही बरसत राहीले अगदी बेभान होऊन....

२. तृप्त पाऊस…
बाई पिसाटला वारा
अन रान पिसाटल
भर पावसात काल
सजनान गाठीयल

विद्दुलता कडकली
आत आग भडकली
त्यान फुंकर मारून
फुल कळीच का केल?
भर पावसात काल
सजनान गाठीयल.

कशी अतृप्त तृषार्त
होती भेगाळली माती
त्यान तृप्त तृप्त केलं
सार रान भिजवलं
भर पावसात काल
सजनान गाठीयल.

असा रानात पाऊस
पानापानात पाऊस
पावसाने आनंदाच
दान ओंजळीत दिल
भर पावसात काल
सजनान गाठीयल…
(महेंद्र गौतम)

पाऊस प्रत्येकात सृजनशक्ती जागवतो, ईतरांसारखाच 'त्याच्याही' चेह-यावर पाऊस प्रसन्नता फुलवतो.. पण माझा पाऊस वेगळा अन् त्याचा वेगळाचं.
माझा पाऊस हळुवार, रोमँटिक तर त्याचा रांगडा धुवाँधार. मला पाऊस कल्पना देतो तर त्याला नवी उमेद.
सजल काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ वेढल्यावर त्याचे बाहु फुरफुरतात, कष्ट करायला तो आसूसतो. तो झिंगतो, रानं हिरवं करायच्या वेडानं अक्षरशः 'पेटतो'..

३. ऋतू सृजानाचा .….

थेंब थेंब पावसाचा
कसा साठला ढगात
बघ उरूस थेंबाचा
कसा चालला नभात.

कस अंधारून आल
दाट दाटलं आभाळ
राणी उरातही माझ्या
अस पेटलं आभाळ

थेंब थेंब बरसला
जीव शिवरास आला
पीस वेचू सतरंगी
मोर-नाचनीला चला.

आता करूया पेरणी
करू काम गळू घाम
रान करूया हिरव
घेऊ घामाचा या दाम

पाडू पाऊस कष्टाचा
गळू घाम निढळाचा
असा देखणा पाऊस
असे ऋतू सृजानाचा .
(महेंद्र गौतम)

दरवेळी काही पाऊस रोमँटिकचं असतो अस नाही. एखादा पाऊस उद्विग्नही असतोचं की, नेहमीच काही तो आनंद घेऊन येत नाही. कधी ठसठसणा-या जिवघेण्या वेदनाही आणतो.
गतकाळातल्या सुखद भिज-या आठवणी देऊन कुणाला तरी पाऊस काळीज-चटका होऊन भेटतो. मग थेंब अंगावर आल्यावर कुणीतरं पोळंत ओल्या ओल्या पावसात अक्षरशः होरपळतं..
मग अश्यावेळी डोळ्यातला पाऊस अनावर होतोचं ना?

४. पोळता पाऊस

मी दिवस दिवस तपताना
धून वैशाखी जगताना
तो दाटून दाटून येता
मी सावर सावर म्हणतो
तो सरळ मनावर येतो
डोळ्यात कधी मग माझ्या
पाऊस अनावर होतो

पाऊस गजाबाहेरचा
आत मैना केविलवाणी
उध्वस्त राघूच्या ओठी
का व्याकुळतेची गाणी
ती कोसळ कोसळ म्हणता
तो ठन्न कोरडा जातो
डोळ्यात कधी मैनेच्या
पाऊस अनावर होतो

ती याद जुन्या दिवसांची
पाऊस घेउनी येतो
कुणी शापीत वेडा प्रेमी
अस्वस्थ उगीचच होतो
मग थेंब थेंब रे त्याचा
त्या मरण यातना देतो
डोळ्यात कधी वेडयाच्या
पाऊस अनावर होतो.
महेंद्र गौतम.
९४०५७०६६१२.
(आवडल्यास नक्की पोच द्या आणि तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेल्या कवितेचा क्रमांक कमेंट मध्ये पोस्ट करा.)

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected