लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

द्रोहपर्व.

नक्षलवादी….
वस्तीवस्तीतून पाड्यापाड्यातून
शोषितांच्या असहाय चिरकाळ्या घुमताना.
नपुंसक पोलिस अन वांझोट सरकार
न्याय देण्या कमी पडतस दिसतांना.
त्याच्या डोळ्यात आसवांसोबत राग दाटून येण साहजिकच.
मायसारखी जपलेली शेतच्या शेत
लाटणारे गब्बर भडवे बघून
त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाणही साहजिकच.
कुठंही सहज मिळणारी बंदूक
आता त्यान घेतलीच तर… बोंबलू नका.
तुम्हीच जन्माला घालताय
रोज एक नवा नक्षलवादी…!!!!
(द्रोहपर्व)
महेंद्र गौतम.

क्रांतीगीत….!!!!

आली कशी ग्लानी
आज विचारणा कोणी.
आत्मघाती निद्रेतुनी जाग येऊ दे.
या गांडूळाचे पुन्हा नाग होऊ दे.

रक्त शूरवीरांच आहे तुझ्या अंगात
पेटूनी उठ गड्या ये पुन्हा रंगात
बंडाचा यांना पुन्हा भाग होऊ दे
या गांडूळाचे पुन्हा नाग होऊ दे.

घोंगावते जे तुझ्या वादळ उरात
निषेधाच गाण गाऊ आज सारे सुरात
डोळ्यातही दाटुनिया राग येऊ दे.
या गांडूळाचे पुन्हा नाग होऊ दे.

रुकू नको ; झुकू नको
घेतला वसा टाकू नको
अरे हक्क आहे तुझा वेड्या
भिक कुणा मागू नको.
क्रांतीने लाल हा भूभाग होऊ दे
या गांडूळाचे पुन्हा नाग होऊ दे.!!!
महेंद्र गौतम.

सये असं छळू नये…!


सये असं छळू नये
सये असं जाळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

तुला छळायाची घाई
मला जळायाची घाई
नदीलाही सागराला
कशी मिळायची घाई
उभा सागरात तरी
प्याया पाणी मिळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

सये जाता जाता असं
नको फिरून गं बघू
कसं मनाला या सांगू
वेड्या राती नको जागू
असं पुढ गेल्यावर
पुन्हा मागे वळू नये
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?

तुझ्या आठवाचा गंध
जसा प्राजक्त सांडला
काल म्हणे तुझ्यासवे
माझा मोगरा भांडला
तुही सय एकट्यात
माझी कुरवाळू नये.
माझं काळीज पेटलं
कसं तुला कळू नये?
महेंद्र गौतम.

दरवळं...

आज ब-याच दिवसानंतर फुलांनी लदबदलेली जाई बघीतली, नभात कृष्णनिळ्या मेघांची ही वर्दळ,
ढगाळ कुंद,वातावरण ,रात्रीच्या सरींच्या ओल्या खुणा.मायला उगच हळवं व्हायला झालं.
फार वर्षाअगोदर घरच्या परसात हजारमोगरा होता तोही असाच बेभान फुलायचा आणि मला येता जाता उगच
रोमँटीक करुन टाकायचा. अशीच एक बाजुच्या घरची रातराणी. अवघी रात्र स्वतःच्या सुगंधान भारुन टाकणारी.
रात्री उशीरवर वाचत बसल्यावर थकवा आला की बाहेर जाऊन उरभर सुगंध घ्यायचो. तेव्हढ्या रात्री विनाकारणच
कुणाचीतरी आठवण यायची.गावच्या मठात चारदोन चाफ्याची भलीमोठी झाडं आहेतं.
लहानपणी तळ्यावर पोहायला गेल म्हणजे हमखास फुल वेचायचो, एकदा एकजण येऊन म्हणाला झाडाहुन खुपसारी फुलं काढुन
द्या एक रुपया देतो, लगेच सगळे सरसर झाडावर. त्यान ती फुल नव्याको-या साडीच्या मध्ये पसरवली आणि एक
रुपया देऊन, शिळ घालत तो निघुनही गेला.जिला ती साडी मिळाली असेल ती बिचारी आनंदान वेडावलीच असणार.
शाळेत असताना गणतंत्र दिन म्हणजे सण असल्यासारखाच साजरा करायचो, त्याच्या आदल्या दिवशीच ती म्हणाली
एखाद पूर्ण न उमललेलं लालजर्द गुलाबाच फुल देशील का आणून सकाळी? दहावीला होतो तेंव्हा, पूर्ण गाव पालथं घातलं
शेवटी गावालगतच्या एका मळ्यातून तिला हवं तस फुल मिळवलं. रात्रीतून सुकू नये म्हणून त्याभोवती ओलं फडक गुंडाळलेलं
आणि रात्री मध्येच उठून चारदोनवेळा त्यावर पाणी शिंपडलेल लख्ख आठवत. सकाळी तिला देताना उगीचच शहारलेलो.
तिनेही मग चार मोग-याची फुलं अल्लद हातावर टेकवली होती. काही वर्षांअगोदर लग्न होऊन ती सौदीला निघून गेली.
मध्ये एकदा अशीच रस्त्यात भेटली होती फार वर्षांनी, ते फुल अजूनही जपून ठेवल्याचं सांगत होती.
एखादं दुर गेलेलं जिवाभावाचं माणुस अत्तराच्या रिकाम्या शिशीसारखचं खरतरं, दुर जाऊनही त्याच्या आठवणींचा दरवळ मागे
राहिलेला.. मग मोगरा दिसला की त्याची आठवण ठरलेलीचं...
कुणाच्यातरी फार सुंदर ओळी आहेत..
प्रेम करावे जगण्यावर
प्रेम करावे मरण्यावर
प्रेम करावे फुलता फुलता
सुगंध उधळुन देण्यावरं..
महेंद्र कांबळे.

पावसाची चारोळी

धरतीच्या वेदना
आभाळाला कळतात….
त्याचे अश्रू मग
पाऊस होऊन गळतात…
महेंद्र गौतम.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected