लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

बावरी...


तिला चांदण्यातही पोळतांना
धरावी उन्हाने कशी सावली?
कुरवाळतांना तिचे दुःख गहिरे
अंधार होई जणू माऊली

सांभाळते ती उरी लक्तरांना
तरी श्वास छातीत का गुदमरे?
ओठावरी हास्य बहरुन येता
नयनात का अमृतांचे झरे?

शोषूण घेते तिची वेदना ती
आणिक दिसते सदा कोरडी
जरा सावजाने निसटून जाता
घायाळ होई तिचा पारधी..

असह्यशी वेदना सोसताना
असे शांत का ती समुद्रापरी
अस्वस्थ होतो तिला पाहतांना
भासे मला ती मीरा बावरी...

महेंद्र गौतम.

हतोडा

2.
हतोडा...

एक अनादी अनंत बिंदू
तुझ्या नजरेच्या टप्प्यात कधीच न येणारा
x ची व्हॅलु मुद्दाम चुकलेल आयुष्याच
एकसामाईक समीकरण..
फिरून परत माझ्याकडेच येणार
हजारो वर्षाच आदिम दुःख
माझ्या परिवलन परिभ्रमनाच्या कक्षेत
न येणार तुझ साजूक मधाळ प्रेम
काळजात खुडलेला काटा
तुझा सहस्त्र सुपीक डोक्याचा आदिपुरुष
हुशारीने मला तुझ्या दावणीला बांधणारा
तरी डाव्या अंगठ्याला ध्वस्त करणारा
एकाकी कडवा लढवय्या
चेंदामेंदा होऊनही परत उगवणारा
डाव्या पायाचा अंगठा.......
आणि आता माझ्याही हातात हतोडा.

(सूर्योदयाच्या कविता)
महेंद्र गौतम.

सूर्योदयाच्या कविता 1..

सूर्योदयाच्या कविता  1 ...

पहाटच्या पाचाला जेंव्हा
चराचराला जाग येते
उठतात किडे मुंग्या झाडे पक्षी
कुत्री आणि डुकरसुद्धा...
तेंव्हाच जागे होतात
सर्वच धर्माचे कमालीचे श्रद्धाळू लोकं
आणखी हेही की सुरु करतात
लाउड स्पीकर जोरात...
(तेही कमालीच्या श्रद्धाळू भावनेनच)
तस विशेष काहीच नाही पण
एक धर्म दुसऱ्यावर करू पाहतो कुरघोडी
लाउड स्पीकरच्या चढ्या आवाजात...

आणि....

पहाटचा अभ्यास चांगला लक्षात राहतो म्हणून उठलेला
कुणी दहावी बारावीचा विद्यार्थी चडफडतो
रात्री उशीरा सेकंड शिफ्ट करून आलेला
कुणी कर्मचारी कूस बदलत चिडतो
हेही जरा क्षुल्लकचं....
कारण....
लोकांच्या कमालिच्या श्रद्धाळू भावनेचा
आदर करायला हवा..
लोकांच्या धार्मिक प्रवृत्तीचा विजय असो
(माणूस काय बिचारा मर्त्य प्राणी)

महेंद्र गौतम..

अस पाणी यावं...

अस पाणी यावं...

अस पाणी यावं
येवो पुरावर पूर
ओठांची ही तृष्णा
जावो लाखो कोस दूर

नाचाविही विज
अश्या तूफान वेगानं
धरेला मिठीत
घ्यावं बेभान नभानं

भिजावं हे अंग
अंतरंगही भिजावं
झाकोळ आभाळ
पुन्हा स्वच्छ स्वच्छ व्हावं

अस पाणी यावं
सारं अंतर मिटाव
साऱ्या "माणसांनी"
एका जीवानं नांदावं....

महेंद्र गौतम.

पाऊस अनावर होतो...

४. पाऊस अनावर होतो...

मी दिवस दिवस तपताना
धून वैशाखी जगताना
तो दाटून दाटून येता
मी सावर सावर म्हणतो
तो सरळ मनावर येतो
डोळ्यात कधी मग माझ्या
पाऊस अनावर होतो

पाऊस गजाबाहेरचा
आत मैना केविलवाणी
उध्वस्त राघूच्या ओठी
का व्याकुळतेची गाणी
ती कोसळ कोसळ म्हणता
तो ठण्ण कोरडा जातो
डोळ्यात कधी मैनेच्या
पाऊस अनावर होतो

ती याद जुन्या दिवसांची
पाऊस घेउनी येतो
कुणी शापीत वेडा प्रेमी
अस्वस्थ उगीचच होतो
मग थेंब थेंब रे त्याचा
त्या मरण यातना देतो
डोळ्यात कधी वेडयाच्या
पाऊस अनावर होतो.
महेंद्र गौतम.

उठाव..

जो तो इथे विचारे बाजारभाव माझा
मी ठेवला म्हणूनी कोराच ताव माझा.

कळलीच ना कधीही कविता कुणास माझी
त्यांना म्हणे कळाला आता उठाव माझा.

पोटात भूक नाचे भांडू कसा जगाशी
लागेल का उपाशी येथे निभाव माझा.

गेली जरी निघोनी श्वासात नांदते ती
जगण्यात का तिच्याही आहे अभाव माझा.

मागीतली कधीही मी भीक ना कुणाला
तो-यात चालण्याचा आहे स्वभाव माझा.

महेन्द्र गौतम.

गझल

जो तो इथे विचारे बाजारभाव माझा
मी ठेवला म्हणूनी कोराच ताव माझा

कोणास आकळेना माझी इथे कवीता
त्यांना म्हणे कळाला आता उठाव माझा

मागीतली कधीही मी भीक ना कुणाला
तो-यात चालण्याचा आहे स्वभाव माझा

महेन्द्र गौतम.

मी तडफड मासा होतो.


या किर्र मध्यरात्रीला
अंधार  का व्याकुळ झाला
का अशी तडकली धरती
बर्फातुन उठल्या ज्वाला?

पाण्याची वाफ का व्हावी
या निळसर चमचम राती
का विझू विझू पेटाव्या
निस्तेजल्या चक्षु ज्योती?

कुणी खिन्न झाडाखाली
का अश्रु ढाळीत बसले
ती कुठे कुणा कळ उठली
अन कोण  विकटसे हसले?

आवेग अनावर होतो
जीव झुरणी लागुन जातो
भेगाळ जमीनीवरचा
मी तडफड मासा होतो...

महेंद्र गौतम..

आणि...


आणि...
हि क्रमाक्रमाने खंगत जाणारी माणस बघ
त्यांच्या पाठीवरच भल मोठ बाक बघ
एकदा तुझी छापील किंमत ठरल्यावर
तुही असाच क्रमाक्रमान बोथट होत जाशील
वेड्या....!!
वेदनांना कुठे जात धर्म असतो???
चटक्यांची संवेदना तर
इथून तिथून सर्वाना सारखीच
म्हणुनच....
तुझ्यामाझ्यात जन्मावा एक तुकाराम....
नाठाळाच्या माथी काठी हाणनारा....
(अनावर)
महेंद्र गौतम.

प्रकाश प्रार्थना.

प्रकाश प्रार्थना....

भयांकित होउन जात आयुष्य. पेलवत नाही रोजचा भयभार. तश्यात रुजुन येत एखादं स्वप्न पापणीच्या काठी आणि पार हिरवा हिरवा होउन जातो अवघा भवताल. पण भयकंपित मनाची दुरावस्था स्वप्नपुर्तिचा राजमार्ग समोर दिसत असतांनाही उगीचच डगमगनारी पावलं...
तरी आतून सतत साद देत राहणार कुणीतरी. आणि मग मन हिमतीन उभं राहतं अंतरातला दिप चेतवन्यासाठी झगडत पण वादळात दिवा लावन कुठं तितकस सोप?
स्वतःचाच स्वतःशी असणारा हा झगडा......
मग खोल अंतरातुन उमटते एक प्रकाश प्रार्थना.... प्रकाशाच दान मागणारी.....

"एक स्वप्न ये पापणकाठी
उगा पाऊले डगमगती
देई हाक तो मला निरंतर
भयछाया का मजवरती?

भेदायाचे दे तू मज बळ
पाश भयाचे आवळती
दिप चेतु दे अंतरातला
दिशा उजळू दे मावळती

काय तुझी ही किमया अद्भुत
पुनवचांदण्या काजळती
मळभ दूर कर सबल हातानी
एक ज्योत दे टिमटिमती...."
महेंद्र गौतम.

पोर अबोल का झाली???

पोर अबोल का झाली.??

कसा मोडला रे दैवा
तिचा बाहुलिचा खेळं
क्रूर अजगर गिळे
एक कोकरु कोवळं.

खेळतात सैनिकही
लुटूपुटूची लढाई
कसा हातात मिठाई
उभा घेउन कसाई.

लडीवाळ चंद्राला का
नांगी विषाची मारली?
बोरी बाभळीची शय्या
वर आग पांघरली.

ऐन उमलत्या वेळी
तिचा उजेड बुडाला
तिच्या अल्लड मोराचा
कसा पिसारा झडला.

भरदिवसा डोळ्यान
तिच्या आवस पाहिली
आई बापाला कळेना
पोर अबोल का झाली???

महेंद्र गौतम.

ती अल्लड कधी.......

ती अल्लड कधी.....

ती अल्लड कधी अलवार कधी
ती विज कधी तलवार कधी
ती वादळ झंझावात कधी
अन झुळूक ती हळूवार कधी....

ती ठरवते ते होते
आभाळही खाली येते
किती सहज ती कोणाही
आपुलेसे करून घेते
रागातही तिच्या अनोखी
एक छटा प्रेममय असते
ती पत्थर होतानाही
काळीज फुलांचे जपते
ती हट्ट कधी लडिवाळ कधी
ती अल्लड कधी अलवार कधी
ती विज कधी तलवार कधी....

महेंद्र गौतम...

कुठे मनास गुंतवू...


कुठे मनास गुंतवू.

घर अस खायला उठतं
बेडरूममधल्या मलूल गाद्या
हताश चादरी उदास परदे
आणि डंख मारीत अंगावर येणारा
तिथला तुझा दरवळ.....
जरा किचनमध्ये जावं तर
दिसतं नाक फुगवून बसलेलं चहाच पातेल
उगच गुश्श्यात भडकणारा चिडका गँस
भावना गोठल्यासारखा वागणारा तुसडा फ्रिज...
एरवी मस्तीत शिट्ट्या मारणार कुकरही
कुणास ठाऊक कुठल्या प्रेशरखाली वावरत....
अन कहर म्हणजे मुकाट एकाकी
थेम्ब थेम्ब अश्रु ढाळणारा बेसिनचा नळ.....
अशी घरभर ओसंडणारी तू
अन इस्ततः विखुरलेल्या तुझ्या खुणा.....
घर कस भकास वाटत गं....
कसे जिवास शांतवु?
सांग ना.....
तू नसताना.......
कुठे मनास गुंतवू....?

(आत्ममग्न कविता)

महेंद्र गौतम.

एक मोरपंखी पाप 2

एक मोरपंखी पाप 2.

पाठशिवणीचा बाई
तुही खेळू नये खेळ
सळसळावी नागीण
तशी सरकते वेळ

वेचावेत अंतरंगी
गोड मौक्तिकांचे क्षणं
बेभानल्या वेदनेला
घट्ट मिठीच आंदण

नभ तरारून आल
खोल पृथ्वीलाही ओलं
सृजनाच्या ध्यासापायी
पंचप्राण उधाणलं

मुक्या पाखराचे आसू
त्याचं दुःखच वेगळ
विडा रंगताना सांग
कोण स्मरतो सोवळ...?

महेंद्र गौतम.

12मार्च 2014

गंध अत्तराचा ऊरे...


सोसताना सय तुझी
शहारून गेलो राणी
आज दिसभर गारा
आज दिसभर पाणी.

चंद्रमोळी घर माझे
चांदवेड्या चांदण्यात
बरसत येणा सये
आज माझ्या अंगणात.

कानी वाजे सदाकदा
आता तुझा पायरव
आठवांचे भ्रमर गे
करतात गुंजारव.

दिन जाय दिनावाणा
झुरु झुरु रात सरे
रिती झाली कुपी तरी
गंध अत्तराचा ऊरे....

महेंद्र गौतम...

एक मोरपंखी पाप...

गच्च आवसेच्या राती
ऐकू येई चन्द्रधुन
राजा गराड्यात उभा
पण पोरका आतून

पाणीदार वेदनेला
मुकेपणाचाच सोस
निवडुंगात गा फुल
होई दुःख हलकस

रोज रडते अवेळी
तिला सौंदर्याचा शाप
अन अंधारात घड़े
एक मोरपंखी पाप.....
महेन्द्र गौतम

हिशेब थोडा बाकी आहे.....


हिशेब थोडा बाकी आहे....

अजून उगा मोहरून येतो
तुझ्या घराच्या पुढील रस्ता
अजून ढळत्या रात्रफुलांचा
हिशेब थोडा बाकी आहे.

कमरेमध्ये किंचित वाकून
अदबिने मज हसतो बघुनी
तुझ्या दारच्या प्राजक्ताचा
हिशेब थोडा बाकी आहे.

कसे हिंडलो नशेत आपण
वेचीत किरणे त्या चंद्राची
त्या चुकार चन्द्रकिरणांचा
हिशेब थोडा बाकी आहे.

उरात तेव्हा अविरत चाले
आतुरतेचा फुगडी झिम्मा
अधीर उताविळ त्या श्वासांचा
हिशेब थोडा बाकी आहे..

अजून आहे तसाच चिकटून
अंगांगाला तुझा गोडवा
ओठावरल्या अवीट चवीचा
हिशेब थोडा बाकी आहे.....

महेन्द्र गौतम.

ती....

आणि एक दिवस अचानक
सकाळीच ती अंगणात उभी.
पार सुकत चाललेल्या
झाडाला पाणी देता देता
मी डोळे विस्फारित म्हणालो;
आता येतेयेस? किती वेळच वाट बघतोय.
रात्री स्वप्नात काही गुलाबाच्या
उमल्नोमुख कळया आल्या
तेव्हाच थोडी थोडी तुझी
चाहुल लागली खर तर.
मोठी गोड हसली ती नेहमीप्रमाणे
म्हणाली...
यायच तर होतच यावेळी जरा
उशीर झाला एव्हढच....
मला उगच ते समोरच मलूल
रोपट तरारल्याचा भास झाला.
ओलावलेले हात अंगातल्या
जुन्या स्वेटरला पुसत मी आत गेलो
लिहायच्या टेबलाच्या खुर्चीत बसलो.
ती टेबलाजवळ येउन उभी
हलकेच हातावर हात ठेवत परत गोड हसली
यावेळी जरा अधिकच मोहक वाटली.
म्हटल......
येत चल अधून मधून अशीच
तुझ्यामुळेच तर जगावस वाटत ग....
"याव तर लागतच..."
एव्हढ़ बोलून ती परत अदृश्य......
आता टेबलावरच्या कवितेच्या वहिची
पान तेवढी फडफडत होती.......
महेंद्र गौतम.
31st December2013..
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected