लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पाऊस अनावर होतो...

४. पाऊस अनावर होतो...

मी दिवस दिवस तपताना
धून वैशाखी जगताना
तो दाटून दाटून येता
मी सावर सावर म्हणतो
तो सरळ मनावर येतो
डोळ्यात कधी मग माझ्या
पाऊस अनावर होतो

पाऊस गजाबाहेरचा
आत मैना केविलवाणी
उध्वस्त राघूच्या ओठी
का व्याकुळतेची गाणी
ती कोसळ कोसळ म्हणता
तो ठण्ण कोरडा जातो
डोळ्यात कधी मैनेच्या
पाऊस अनावर होतो

ती याद जुन्या दिवसांची
पाऊस घेउनी येतो
कुणी शापीत वेडा प्रेमी
अस्वस्थ उगीचच होतो
मग थेंब थेंब रे त्याचा
त्या मरण यातना देतो
डोळ्यात कधी वेडयाच्या
पाऊस अनावर होतो.
महेंद्र गौतम.

उठाव..

जो तो इथे विचारे बाजारभाव माझा
मी ठेवला म्हणूनी कोराच ताव माझा.

कळलीच ना कधीही कविता कुणास माझी
त्यांना म्हणे कळाला आता उठाव माझा.

पोटात भूक नाचे भांडू कसा जगाशी
लागेल का उपाशी येथे निभाव माझा.

गेली जरी निघोनी श्वासात नांदते ती
जगण्यात का तिच्याही आहे अभाव माझा.

मागीतली कधीही मी भीक ना कुणाला
तो-यात चालण्याचा आहे स्वभाव माझा.

महेन्द्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected