लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

बावरी...


तिला चांदण्यातही पोळतांना
धरावी उन्हाने कशी सावली?
कुरवाळतांना तिचे दुःख गहिरे
अंधार होई जणू माऊली

सांभाळते ती उरी लक्तरांना
तरी श्वास छातीत का गुदमरे?
ओठावरी हास्य बहरुन येता
नयनात का अमृतांचे झरे?

शोषूण घेते तिची वेदना ती
आणिक दिसते सदा कोरडी
जरा सावजाने निसटून जाता
घायाळ होई तिचा पारधी..

असह्यशी वेदना सोसताना
असे शांत का ती समुद्रापरी
अस्वस्थ होतो तिला पाहतांना
भासे मला ती मीरा बावरी...

महेंद्र गौतम.

हतोडा

2.
हतोडा...

एक अनादी अनंत बिंदू
तुझ्या नजरेच्या टप्प्यात कधीच न येणारा
x ची व्हॅलु मुद्दाम चुकलेल आयुष्याच
एकसामाईक समीकरण..
फिरून परत माझ्याकडेच येणार
हजारो वर्षाच आदिम दुःख
माझ्या परिवलन परिभ्रमनाच्या कक्षेत
न येणार तुझ साजूक मधाळ प्रेम
काळजात खुडलेला काटा
तुझा सहस्त्र सुपीक डोक्याचा आदिपुरुष
हुशारीने मला तुझ्या दावणीला बांधणारा
तरी डाव्या अंगठ्याला ध्वस्त करणारा
एकाकी कडवा लढवय्या
चेंदामेंदा होऊनही परत उगवणारा
डाव्या पायाचा अंगठा.......
आणि आता माझ्याही हातात हतोडा.

(सूर्योदयाच्या कविता)
महेंद्र गौतम.

सूर्योदयाच्या कविता 1..

सूर्योदयाच्या कविता  1 ...

पहाटच्या पाचाला जेंव्हा
चराचराला जाग येते
उठतात किडे मुंग्या झाडे पक्षी
कुत्री आणि डुकरसुद्धा...
तेंव्हाच जागे होतात
सर्वच धर्माचे कमालीचे श्रद्धाळू लोकं
आणखी हेही की सुरु करतात
लाउड स्पीकर जोरात...
(तेही कमालीच्या श्रद्धाळू भावनेनच)
तस विशेष काहीच नाही पण
एक धर्म दुसऱ्यावर करू पाहतो कुरघोडी
लाउड स्पीकरच्या चढ्या आवाजात...

आणि....

पहाटचा अभ्यास चांगला लक्षात राहतो म्हणून उठलेला
कुणी दहावी बारावीचा विद्यार्थी चडफडतो
रात्री उशीरा सेकंड शिफ्ट करून आलेला
कुणी कर्मचारी कूस बदलत चिडतो
हेही जरा क्षुल्लकचं....
कारण....
लोकांच्या कमालिच्या श्रद्धाळू भावनेचा
आदर करायला हवा..
लोकांच्या धार्मिक प्रवृत्तीचा विजय असो
(माणूस काय बिचारा मर्त्य प्राणी)

महेंद्र गौतम..

अस पाणी यावं...

अस पाणी यावं...

अस पाणी यावं
येवो पुरावर पूर
ओठांची ही तृष्णा
जावो लाखो कोस दूर

नाचाविही विज
अश्या तूफान वेगानं
धरेला मिठीत
घ्यावं बेभान नभानं

भिजावं हे अंग
अंतरंगही भिजावं
झाकोळ आभाळ
पुन्हा स्वच्छ स्वच्छ व्हावं

अस पाणी यावं
सारं अंतर मिटाव
साऱ्या "माणसांनी"
एका जीवानं नांदावं....

महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected