लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

आत्ममग्न कविता 7.


तू दारात रांगोळी काढलीस तेंव्हा
उनगलेल्या रानात पाखरांनी म्हटलं
एक ओजस उडतं गाणं
अन डवरलेलं लदबद झाड
निष्पर्ण हसत सुटल वेड्यासारखं
त्याच्या बुडाशी लालभडकं फुलांचा
केव्हढा सडा पडलेला...
ते बघून लांब चोचीचा काळाजांभळा
मधपिपासू पक्षी, भुंगे-फुलपाखरं
विस्मयानंदान भिरभिरायला लागली
अगदी फेर धरून झिम्मा खेळत राहिले बराचवेळ
तू माथ्यावर चंद्रबिंदी कोरलीस
आणि केसातून न्हालेल्या पाण्याचा
जेंव्हा ओघळला मौक्तिक थेंब
तेंव्हा दवबिंदू शहारला
अन नेहमीपेक्षा जास्तच प्रकाश धरला
सूर्यकिरणांनी या भकास मलूल घरावर
एक हसणं विसरलेल घर
उजळून निघालय तू आल्यावर....

महेंद्र गौतम.

एक गोष्ट त्याची तिची.

तो दिलफेक, काळजात वाहतं गाणं असणारा, कविता गझलेत जगणारा. जवळून गेला तर घमघमत्या सुगंधाची झुळूक सोडणारा... दिल दर्या त्यामुळे आजूबाजुला चिक्कार दोस्त. त्यात कलाकार  म्हणून गॅदरिंगा गाजवणारा.. त्याच्या जगण्यात एक चव होती त्याच्या जगण्यात एक लय होती,फुलांची बात होती, अत्तराची रात होती.
ती साधी,बिचारी नकळत ओढल्या गेली,गुरफटली आणि आपसूक विस्कटली. जाणूनबुजून विस्कटण्याचेच दिवस ,त्यात तो वेडा जीव लावला तो लावला मग  कश्याचीच तमा नाही कुठल्याच गोष्टीला सिमा नाही.. गोष्ट सुरु झाली बरीच पुढे गेली सगळेच खुश होते, हेही खर होतं, कॉलेजची धुंदी आयुष्य बर होत...
आता कॉलेज संपेल मग अस अस करायचं सोबतीन जगायचं नी सोबतीन मरायचं. मरायची गोष्ट कुठून आली रडवेली ती पुसायची तो जरासा हसायचा ती वेडी रुसायची.
रुसण्यातही गम्मत होती मनवण्यात तर जम्मत होती....
एकाएकी विपरीत घडल पाठीवरती आभाळ पडल.. आयुष्याने घात केला त्याचा बाबा सोडून गेला. आयुष्य बदलवणारा मृत्यु, सैरभैर झालेलं घरट, चिनभीन पिलं, त्यात हाच मोठा आईला आधार. आई बोलली वडिलांच्या जागी नौकरी धर पाठच्या भावंडांच शिक्षण पूर्ण कर. उध्वस्त जरी जग होत त्याला सावरण भाग होत.
तो बोलला फक्त एकदाच जाऊन येऊ दे, वाट बघत असेल ती,डोळाभर बघून घेऊ दे.
तिला सगळ समजाऊन सांगेन, शाहणी आहे ती माझ्यासाठी थांबेल.
ते भेटले त्यानं सगळ सांगीतल. तिही राजी झाली तू हाक देशील तेंव्हा धावत येईल म्हणाली. तिला मागे सोडून तो परतला विस्कटलेल घरट सावरायला लागला. एक प्रवास सुरु झाला, कल्याण ते सीएसटी, ऑफिस, खर्डेखशी, चुकलेली एसटी...
तिची पत्र यायची खुशाली कळायची. याच गाण विरुन गेलं,जगणच हरवलेल.
एकदा तिच पत्र आलं, मला येऊन घेऊन जा.
त्याच काहीच उत्तर नाही, लोकभयान आईन पत्र त्याला दिलच नाही.
कधीतरी त्याला समजल कधीचच तिचं लग्न झाल.
खिन्न हसला जरासा तक्रार केली नाही, सुखानं जगावं तिनं जरी माझी झाली नाही.
पुढे चालून कधीतरी त्याचही मग लग्न झालं, हिरवा चुडा घालून हाती, आयुष्यात कोणी आलं. मोठ्या मनाची होती ती सांभाळून घेतलं त्याला, हळूहळू तोही मग पूर्वीसारखा फुलून आला. दोन गोजिरवाणी फुलपाखर पुन्हा आयुष्याच सुरु चक्र...
दरम्यान वर्षाच्या ठरावीक दिवशी, त्याच्या गावावरून तिची गाडी जायची. कसा कोण जाणे पण कळायच त्याला, सिट नंबर डब्बा नंबर अगदी सगळच.
पाच मिनिट गाडी थांबायची, डोळ्यांनीच ती बोलून घ्यायची.
मध्ये पुन्हा तो जगायला लागला कवितेसाठी जागायला लागला. नाटकाला त्याच्या पारितोषिकही मिळालं. आयुष्य सुरळीत सुरु झालं.
तिशी सरली तो पस्तिशीत आला, आणि कच्छचा भूकंप झाला. कच्छमध्ये तिचं घर, याचा जीव पुन्हा टांगणीवर.. खाण्यात लक्ष नाही पिण्यात लक्ष नाही. ठंड उसासे कशातच काही नाही.
उदास बसलेला असतांना बायको जवळ आली मी बॅग भरलिये तुम्ही जाऊन या म्हणाली, एकदा डोळ्यांनी तिला पाहून या म्हणाली. तिनं उबदार हात त्याच्या हातावर ठेवला लागबगिने तोही निघाला..
गुजरात-कच्छ सगळीकडे ढिगारेच ढिगारे.. एका ढिगाऱ्यासमोर ती विमनस्क बसलेली दिसली, याच्याकडे पाहून चकीत हसली..
नवरा नव्हता जवळ ,ख्याली खुशाली विचारुन झाली. बॅग बायकोन भरलिये ऐकून नशीबवान आहेस म्हणाली.
चाळीशी कधीच पार झाली.
आजही ठरावीक दिवशी, ठरावीक वेळी ठरावीक प्लेटफार्मवर तिच्या गाडीची वाट पाहत तो उभा असतो...
फरक एव्हढाच आता सोबत बायकोही असते...

महेंद्र गौतम..

गझल

ओळ ओळ भांडत गेलो
तुला कवितेतुन मांडत गेलो
तू दिलेस अनावर अश्रु डोळ्यांना
मी होऊन गझल सांडत गेलो....
----++-----------+++-----------------------++-------------------------
किती त्रास होतो फुले माळतांना
नवा घाव देशी जुने बोलतांना

कशी ये फुलूनी शरीरात जाई
असे काय होते तुला पाहतांना

अवेळीच येतो नभी चांद वेडा
जरा काळजी घे सये चालतांना

किती रेशमी पाश हे पाकळ्यांचे
कसे सोडवावे मिठी सोडतांना

नको अंत पाहू अता गे असा तू
अरे जिव जातो व्यथा साहतांना.......

महेंद्र गौतम...

आत्ममग्न कविता 6

तू तक्रार करतेस अधून मधून माझ्या स्थलांतराच्या सवयीची
पण तुलाही हे कळतच ,की किती गरजेच असत
नवनवीन प्रदेश धुंडाळत फिरणही
मी जीवाच्या आकांताने वणवणतो खरा
पण मला खात्रीये, की मला नक्कीच सापडेल ती जागा
जिथे अगदी सगळ्याच पाखरांसाठी खुल असेल
पांढऱ्या अभ्रावरच नीळ आकाश
आणि प्रत्येक चिमणचोचीला पिता येईल
निर्भयपणे कुठल्याही झुळझुळ झऱ्याच पाणी
जिथे झाडांवर साचलेली नसेल कुठलीही धूळ
आणि सर्व पाखरांच असेल एकच कुळ
मग गळ्याभोवतीच्या शुभ्र पिसांना येईल
एक छान गुलाबी रंगछटा
तेंव्हा मलाही करता येईल मोकळ मोहक नृत्य
आणि तोच असेल खऱ्या अर्थान
तुझा माझा विणीचा हंगाम....

(आत्ममग्न कविता)
महेंद्र गौतम.

सूर्योदयाच्या कविता

कोण्या खिन्न मध्यरात्री
जीर्ण वडाच्या आदिम ढोलीत
घुत्कारणाऱ्या जर्जर घुबडाच्या साक्षीने
तुझ्या काळ्याकभीन्न देहात
अनंत प्रकाशपारंब्यांनी
कुणी केलय हे तेजाच बीजारोपण.
जात्याच सुगंधी मलमली मनाची तू
आता लवलवती आगिनपात कशी होऊ बघतेस??
ह्या कुठल्या स्थित्यंतराच्या उंबरठयावर उभीयेस
जिथे तुला मायांगात रॉड टाकण्याची
वा डोक्यात घुसणाऱ्या
भिरभिरत्या गोळीचीही भीती वाटत नाही??

काल शुभ्र कबूतरांचा थवा
गवतबीज टीपत कुजबुजतांना बघितलाय मी
लवकरच सूर्योदय होणारेय म्हणे....
( सूर्योदयाच्या कविता)

महेंद्र गौतम.

अप्पा 2

हॉस्टेलच्या विंगमधून टॉवेल लावून अप्पा हिंडत राहायचा. कायम कुठल्यातरी गाण्याची वाट लावणं हा त्याचा अजून एक मुलभूत राष्ट्रिय हक्क. त्याची गाण म्हणण्याची पध्दतही एकूणच मजेदार... म्हणजे कुठल्याही कडव्याअगोदर मनान एक शब्द घुसडून गाण म्हणणे जस की
" अन चंदनसा बदन
मंग चंचल चितवन
अग बाई धीरेसे तेरा यु मुस्काना...
अन तिच्या मायला मुझे दोष न देना जगवालो
अरे बाबा हो जाऊ अगर मैं दिवाना"
ढण्टड्यान....
हे शेवटच ढण्टड्यान मात्र कॉमन.
होस्टेलची एक खासीयत असते होस्टेल कधीच झोपत नाही पण 10 11 वाजले की आपली विकेट जायची मला डिस्टर्ब करू नये म्हणून " मी रोज सकाळी 3 वाजता उठत असतो  अशी अफवा फैलावून टाकली (तसा पाचला उठायचो) त्यामुळे सहसा मी झोपलेला असतांना मुल रूम मध्ये आली तरी हळूच बोलायची किंवा अजीबात यायचीच नाहीत पण अपवाद अप्पा...
रात्रीच्या बारा एक वाजता रूमचा दरवाजा धडधड वाजायचा डोळे चोळत उघडून बघतो तर अप्पा तेही निर्विकार चेहऱ्यानीशी...
मी वैतागून "काय बे??"
तो एकदम भाबड्याने " काय नाही, झोपला होता का फो....?"
एव्हढ बोलून रूम मध्ये न येताच तो चालू लागायचा..
अबे पण काही काम होत का? त्याच्या पाठमोऱ्या आकृतिकड पाहून मी बोंबलायचो..
काही नाही झोपला का तेच बघायला आलो होतो.. माझ्याकडे न बघताच अत्यंत भाबडेपणाने तो चालायला लागायचा.
त्याच्या सोबत "फुलपाखर " बघायला जाणही कधी तुमच्यावर बेतेल ते सांगता यायच नाही. एकदा मला त्यानं पार गोत्यात आणलेल.. फाइल घेऊन त्याच्यासोबत लगबगीने कुठल्याश्या प्रैक्टिकलला जात होतो. समोरून कॉलेजची मिस यूनिवर्स येत होती त्यानं तिला जवळ येऊ दिल.
अगदी जवळ आल्यावर त्याच्या ष्टायलीत माझा खांदा गदगद हलवत बोलला  " पाय रे लेका कशी सोन्यासारखी पोरगी आहे बिचारी...
पण आडनाव हागे...."
ती बिचारी बराच वेळ आमच्याकड शिंग रोखून बघत राहिली मायला.

(गोष्ट मंतरलेल्या दिवसांची)
महेंद्र गौतम..

तू धूसर धुकेरी हसणारी.

तू धूसर धुकेरी हसणारी...

एक थेंब जरासा ओघळला
अन रात्र जराशी तळमळली
का दार जरासे किणकीणले
पण अधीर पापणी हिरमुसली.

तू शब्दांच्याही पलिकडली
तू धूसर धुकेरी हसणारी
तू असूनही का नसणारी
अन अदृश्यातून दिसणारी

ये विकल विव्हल या वाटेतून
जगण्याचे लक्तरं झाले गं
कर हृदयाचे या फूल पुन्हा
हे तनमन व्याकूळ ओले गं...

महेंद्र गौतम.

गोष्ट मुंबईची : मुंबई डायरी

गोष्ट मुंबईची

धुंदीत चालण आपल्याला आवडतं त्यातल्या त्यात जर डोक्यात एखादी गोष्ट वा ओळ रेंगाळत असली तर रस्ता कसा सरला कळत नाही..,

असाच क्रॉसिंगवरुन जात होतो, "भैय्या" असा आवाज समोरून कानी पडला चमकून पाहिल, विचित्र वेडंवाकड तोंड करत नी अटकत अटकत बोलत  "ती" मला म्हणाली "कानात हेडफोन टाकून चालू नको कधी पटरी  ओलांडतांना डावी उजवीकडं बघून जा बरं.."
हे सांगताना तिला कष्ट पडत होते विकलांग होती ती मला आठवल दोन दिवसां अगोदर एक तरुण कटला होता असाच कानात हेडफोन होता त्याच्या. मी मान हलवली तिच्याकड बघून हसलो ती निघून गेली. बाजूचा एक मिशाळ तुपाळ चेह-याचा माणूस मला म्हणाला " अर्धवट आहे ती, परवा एकजण कटला तिच्यासमोर तेंव्हापासून प्रत्येकाला असच सांगत सुटलिये.
मी म्हटलं बरोबर आहे राव इतरांना जपणारे, दुसऱ्यांच्या जीवाची काळजी करणारे माणसं अर्धवटच तर असतात हल्ली तुपाळ, मिशाळ मामा माझ्याकडं बघत राहिला. मी पळालो ०८:४५ मि. डोंबिवली पकडायची होती..,

-महेंद्र गौतम.


अनावरचा प्रकाशन समारंभ.

अनावर या माझ्या दिलीपराज प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झालेल्या दुसऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांच्या हस्ते अध्यक्ष श्री. ऋषिकेश कांबळे सर आणि कविवर्य अभय दाणी.
23 जानेवारी 2015.
महेंद्र गौतम.

जरा विसावू या वळणावर

विसावा

आरिंग मिरींग 1

आता ऑटोतून उतरल्यावर पायाला लागतो तो चकचकीत पण रुक्ष सीमेंट रस्ता. पूर्वी गावच्या या वाटेवर ममताळू माती खेळायची आणि अनवाणी पायाने तिच्यावर हुंदडताना तिचा स्निग्ध स्पर्श हवाहवासा वाटायचा.
पाऊसकाळात चिखल व्हायचा थोडाबहूत मग याच वाटेवर एखादा टैक्टरभर मुरूम पडायचा गावच्या डोंगराचा ग्रामपंचायतकडून. आणि  रस्त्यावरुन फिरणाऱ्या अजस्त्र "दबईमागे" फिरतांना केव्हढा हुरूप यायचा तेंव्हा.
दोन्ही बाजूच्या नाल्या जोरदार पावसान स्वच्छ व्हायच्या आणि त्या भरून वाहणाऱ्या पाण्यात मग होड्यांची पैज लागायची; आता त्या मातीवर सीमेंट अंथरण्याचा कोडगेपणा चाललाय सगळीकडे. पायाला होणारा तो ओला वेल्हाळ स्पर्श हरवला, आणि कितीही पडलेला पाऊस निघून चालला, नालीवाटे,गावच्या ओढ्याच्या सोबतीने दूर कुठेतरी. त्याच जमिनीत मुरणच हरवल.
तेंव्हा हाताहातात मोबाईल नव्हते की 24 तासाच कार्टून नव्हतं होते ते मोकळ्या हवेतले जीव दमवून आनंद देणारे खेळ. मग ते चिंगाट पळत गावची गल्ली न गल्ली पालथी घालत खेळलेला चोर पोलीस असो की तास न तास चाललेला "ईस्टाप" असो. शाळा सुटल्या सुटल्या कसेबसे कपडे बदलून एका मोकळ्या जागेत सगळे भिडू जमत. मग सुरु होई जितनापातनीचा खेळ मध्येच थकवा घालवण्यासाठी "माझ्या मामाच पत्र हरवल"चा फेरा घडे.
अग्गल दुग्गल "चिपून" ठरायच. तिन तिन भिडू गोलाकार हात गुंफून उभे राहत जो "आला" तो अग्गल. सगळ कस फेअर.
जेवणं आटोपून अंधार पडला की बैठे खेळ सुरु व्हायचे.
"थापट मापट केली
दत्तान नेली
दत्त माझा भाऊ
सिंधीचा काटा
डोंगरवाटा
डोंगरातली भावली
वस्सकन धावली
धर रे बेट्या एकच कान."
मग एकमेकांचा कान धरून....
"चाऊ म्याउ घुगर्या खाऊ
काना काना कुर्र
चिमण्या गेल्या भुर्र....."
किंवा
"खार कबूतर डोली डस्टर पिंजर खार."
किंवा
आरिंग मिरिंग
लवंगा चिरिंग
चीरता चीरता
डूब डूब बाजा
गाई गोपी
उतरला राजा...
किंवा मुठीवर मुठ ठेऊन " एक आंबा पिकला एक आंबा गाभुळला" नाहीतर वितीवर वित ठेऊन "मह्या चिचिवर कोण हाय".... अस काहिबाही चालायच.
नंतर उद्याचा जुजबी अभ्यास आटपून म्हाताऱ्या मायच्या गोधडीत तिच्या उबदार थोपटन्यासहीत "नकट भूत, राकेस बडा बाकेस किंवा श्रावण साखळीची" कहानी ऐकत गुडूप झोपण.
उन्हाळा असला की अंगणोअंगणी खाटा पडायच्या. माय मग आभाळातल चार चांदण्यांच खटल दाखवायची तिच्या शेजारचे तिन चोर दिसायचे, माय म्हणायची "आभाळ लै खाली होत आधी एकदा एक म्हतारी रोजच्यासारखी सकाळी सकाळी उठून आंगण झाडू लागली अन आभाळ लागल फटकन तिच्या डोक्याला झाडता झाडता रागान तिन एक फडा दिला ठेऊन, तेंव्हापासून आभाळ गेल वर...."
कधी कधी बापूला आग्रह व्हायचा "बापू बापू काहाणी सांगा ना..."
त्या म्हाताऱ्या झुर्रीदार चेह-यावर एक प्रसन्न पण खट्याळ हसू उमटायच मग, "बर बर सांगू का कहानी?"
एकसाथ सगळे ओरडायचे "हौ$$$"
" कहानी कहानी कुच्च
ढुंगन गेल उच्च...."
की सगळे हसून हसून लोटपोट.......

महेंद्र गौतम.

माझी माणस.

पहिल्यांदा जेंव्हा त्याला भेटलो तेंव्हा लक्षात राहिले त्याचे स्निग्ध स्नेहाळ डोळे आणि बोलण्यातल मार्दव. तो बिग बी अमोल सारखा डॅशिंग नव्हता की विक्की भाई सारखा हरहुन्नरी कलाकार नव्हता पण होता एकदम कूल. मी फर्स्टला होतो तेंव्हा हा फाइनलला होता, मुळात आमचे सगळे सिनिअर्स खतरनाक होते, रॅगींग नव्हतं पण इंट्रो एव्हढा कडक होता की सांगता सोय नाही. पण तेच सिनीअर्स जातांना स्वतःच्या नोट्स कॅल्सी ड्राफ्टर ड्राइंग बोर्ड देऊन जात, अडचणीला धाउन येत. काही काही हलकट होते ते असो पण सिनीअर म्हटलं की टरकायची, "खाली मुंडी तीसरी गुंडीची" भीति वाटायची. स्कॉलरशिपचा मला काहीतरी प्रॉब्लम आलेला ह्याची साखरे बाबूसोबत चांगली घसट म्हणून ह्याला भेटायला गेलो आणि आईशप्पथ सिनीअर्सबद्दलच माझं मत बदलल, तेंव्हापासून आतापर्यन्त हा माझे प्रॉब्लम्स सॉल्व करतोय.
म्हणजे फर्स्टला तापानं फणफणलो तेंव्हा सायकलवरुन मला कंदोई डॉक्टरकडे हाच घेऊन गेला (त्याने बसायच्या जागी लै जो-यात सुई दिली होती).अनावरच्या प्रकाशनाचा जास्तीत जास्त खर्च ह्यानेच उचलला. अगदी काल परवा उपाशीपोटी एन्डोस्कोपी झाल्यावर जेंव्हा ग्लानी आली तेंव्हा सावरायलासुद्धा हाच होता.
सुरवातीच्या माझ्या पाणचट कविता हा आवडीने वाचायचा कुणी वाचू नये म्हणून मी कपाटातल्या आतल्या कप्प्यात ठेवायचो तरी हा बिनदिक्कत तिथेही लुडबुडायचा ह्यानेच मला डायरी दिली होती पहिल्यांदा.
एका स्थानिक दैनिकात  माझी "कातरवेळ" छापून आली होती तेंव्हा ह्याने मला मेहतामध्ये ट्रीट दिली 25 रूपयात भरपेट थाली होती तेंव्हा. खर सांगतो सिनेमाचा स्क्रीनप्ले ज्यादिवशी लॉक केला तेंव्हा खुशीत येऊन आमच्या प्रोड्यूसरने जबरदस्त पार्टी दिलेली पण वाशीममधल्या मेहताच्या थालीची चव काय नव्हती त्यात.
पण आयुष्यात खुप सोसल ह्याने परिस्थितिशी खुप झुंजला हा माणूस. एव्हढे दुःखाचे कढ पचवून कायम हसतमुख कस राहता येत ह्याला हे एक कोड मला कधी सुटल नाही.
विपरीत परिस्थितीत ताईने जिद्दीने शिकवल, डिप्लोमा पास झाल्या झाल्या
सरकारी नौकरीसुद्धा लागली आणि ती सांभाळून त्याने B.E. कम्पलीट केल तेंव्हाच्या जीवघेण्या कसरतीबद्दल त्याने मला लिहिल एकदा.
" आधार वाटाव अस सोबत कुणीच नव्हतं पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणणारं कुणीतरी असाव लागत रे".
BE झाल्यावर सुखासीन नौकरी सोडून हा बिजनेसमध्ये पडला आणि हात  पोळून घेतल्यावर M. Tech.करून प्राध्यापक झाला. आता जरा बरे दिवस आलेत बेट्याला अगदी कालपरवाच त्याचा साखरपुडाही झाला. भैताडाला बायको चांगली भेटलिये विशेष म्हणजे खुप समंजस आहे. खुप खुश होते दोघेही साखरपुड्यात. खुप दिवसानंतर ह्याला एव्हढ खुश पाहून फार बर वाटल.
आज त्याचा वाढदिवस "हजार बाराशे वर्ष जग दोस्ता."
शुभेच्छा रे.

महेंद्र गौतम.

आत्ममग्न कविता 5


या गावचा किंवा त्या गावचा
तू पडू नयेस माझं गावं शोधायच्या भानगडीत
मला सगळी गावं आताशा माझीच वाटू लागलीयेत..
कारण इकडे जातीयतेतून कुणाला सपासप कापताना
बघितल्यावर जेव्हढा अस्वस्थ होतो
तेव्हढच दुःख होत मला  शेजारच्या मुलांचा
हकनाक गेलेला बळी पाहून..
आणि जराभर अजिबात करमत नाही
एका गोऱ्याने अंदाधूंद फायरिंगने
काही काळ्यांना संपवलेल पाहून.
एखाद्या पाडयात नुकतंच जन्मलेल तान्हूल मूल
किंवा कुठे आडरानात उमललेल गंधूल फूल
मला दोघांकडही बघून हर्षान नाचावसं वाटतं..
शेवटी सगळ्या नद्यांच पाणी सागरालाच जाऊन मिळत...
म्हणूनच तू पडू नयेस माझ गावं शोधायच्या भानगडीत
कारण आताशा मला सगळी गावं माझीच वाटू लागलीयेत....

महेंद्र गौतम

पाऊस जरा येता

पाऊस जरा येता छळतो तुझा अबोला
कोठे ढगास वेड्या कळतो तुझा अबोला

हा राग आग मिरची अन नाक लाल शेंडा
मी काय करू ज्याने पळतो तुझा अबोला??

हो तूच खरी बाई मान्यं जेंव्हा करतो
तेंव्हाच गड्या कोठे टळतो तुझा अबोला

पाहून कुणासंगे कोणास चालतांना
माझ्या मनात तेंव्हा जळतो तुझा अबोला....

सय दाटते तुझी अन रात्रं वैरी होते
डोळ्यांमधून माझ्या गळतो तुझा अबोला..

महेंद्र गौतम

मसाप निवडणूक

2012 मध्ये माझा पहिला संग्रह प्रकाशीत झाला होता 'अर्घ्यदान'. मला वाटल संग्रह चार जाणत्या लोकांना दाखवून अभिप्राय घ्यावा, त्यांच मार्गदर्शन घ्याव जेणेकरून उणीवा समजतील, लिखाणाची दिशा स्पष्ट होईल. आपल काही चुकतमाकत असल्यास तेही समजेल.  म्हणून कित्येकांना स्वखर्चाने पुस्तक पाठवल, मसापमधल्या लोकांचे नंबर मिळवले. पहिला कॉल केला....
"हैलो सर मी महेंद्र बोलतोय.
बोला.
सर मला जरा तुम्हाला भेटायला यायच होत.
कश्यासंदर्भात???
नुकताच माझा काव्य संग्रह प्रकाशीत झालाय थोडस मार्गदर्शन हव होत.......
नाहीहो हातावर काम पडलीत वेळच नाही सध्या..
बर तुम्हाला जेंव्हा वेळ असेल तेंव्हा येतो तुम्ही फ्री झालेकी.....
नाही हो एवढ्यात काही जमणारच नाही...
बर जेंव्हा जमेल तेंव्हा........
ते मी कस सांगू???? ठेवतो.....
फोन कट.
परत दुसऱ्या कोणाला फोन करण्याची हिम्मत नाही झाली एवढा जबरदस्त हिरमोड झाला..
"अनावर"च्या प्रकाशनाच्यावेळी "दासु" बोलत होते संग्रह वाचताना मला प्रश्न पडला की महेंद्र गौतम हे नाव मी यापूर्वी ऐकल कस नाही? या कविचा एक संग्रह येऊन गेला तरी आपण त्याच पुस्तक वाचल कस नाही.. मला ओरडून सांगावस वाटल सर तुमच्यापर्यन्त येण्याच धाडसच झाल नाही.....
दूसरी बाजू अशी की काहिच्या काही लिहून त्याच कौतुक व्हाव असा अट्टहास करणारे लोक सुद्धा  बरेच येऊन गेलेत आयुष्यात किंबहुना कितीतरी जणांची पुस्तक न वाचता मी स्वतः अडगळीत फेकलीत एव्हढ डोक्यात जात काही जणांच लिहीन... मग अश्यावेळी प्रस्थापित नवोदितांना डावलतात अश्या बोंबा का मारायच्या उगाच???
सांगायचा मुद्दा एव्हढाच की मसापची रणधुमाळी सुरु आहे बदल करू, परिवर्तन करू अश्या हाकाट्या ऐकू येताहेत.. काही भेंडी बदल घडणार नाही.. एक कळप जाऊन दूसरा कळप येईल एव्हढाच काय तो झाला तर बदल होईल.. मग तेच थोर कवी तेच थोर लेखक त्याच महान लोकांनी मायमराठी वाचवण्याचा घेतलेला वसा प्रत्येक पत्रिकेवर त्याच कळपशील लोकांची नाव... तेच नवोदितांना अन्नुलेखान मारण... तेच तेच सगळ....
तरिपण मी मतदान करणार आहे दोन्ही गटात काही चांगली माणस नक्कीच आहेत मी गट न पाहता त्या माणसांना मत देणार आहे...
आणि सगळ्या प्रस्थापितांना फाट्यावर मारून आपल गुपचुप जे सुचेल ते भलबूर लिहित बसणार आहे....

महेंद्र गौतम.

आत्ममग्न कविता 4

आत्ममग्न कविता 4...

माझ्या गावावरुन कधी तुझी वाट गेलीच
तर माझ्याकड नक्की येशील ना?
भाबड्या पाणीदार डोळ्यांनी म्हणालीस खरी
पण वेडीच आहेस..
तुला माहितेत माझ्या प्रवासाच्या विचित्र वेळा
ज्या तुला कधीच झेपल्या नाहीत
मुळात मी तरी तुला कुठे झेपलो??
आणि तुझ्या थिंकिंग बिगवाल्या नवऱ्याला तर अजिबातच नाही...
मेहंदीभरल्या हळदओल्या हातांनी
जेंव्हा त्याच्याशी ओळख करून दिलीस
तेंव्हा तो म्हणाला होता "मला नाइन पॉइंट टिंग टिंग पैकेज आहे"
तू किती कमावतो??
मिहि जरा विक्षिप्त बेफिकीर सुरात बोललो
जास्त नाही पण माझी एक कविता करोडोच्या घरात असते....
तेंव्हा विचित्र भेदरून बघत राहिला तो
मी स्टेजवरुन उतरेपर्यंत....
तुझा जिव्हाळा कळतो गं
पण असू दे...
वादळ सोसणार नाहीत आता तुला...

महेंद्र गौतम.

डायरीच पान

मुंबई भिनत जाते तुमच्यात लोकल वाहत राहते रक्तातून. उर दडपवणाऱ्या राक्षसी गर्दीचा तुम्ही केंव्हा भाग होऊन जाता कळत पण नाही. परवा घाईत नेमका लगेजच्या डब्ब्यात घुसलो तिथे एक ग्रुप हसत खिदळत चाललेला. खदखद हसवणारे जोक्स, पटकन दोस्ती झाली म्हटल सगळेच एका जागी जॉब करता का? सगळे हसले "नाय रे सगळे वेगवेगळ्या जागी आहेत पण 11 वर्षापासून एकाच ठरलेल्या डब्ब्यात मग जुळतात ऋणानुबंध तू पण येत चल हां". दादर कधी आल कळल पण नाही जातांना खांद्यावर थोपटून डोक्याला कुरवाळत बाय...

संध्याकाळी साईट संपवून परतत असतांना डब्ब्यात हातात पिशवी घेऊन डोळे मिटून ध्यानस्थ मुन्यासारखा वाटणारा,भरगच्च काळ्यापांढऱ्या दाढीचा, अर्ध चमचमणार टक्कल असलेला एक माणूस.. त्याने एक स्टेशन जाऊ दिल आणि पिशवी सावरत अचानक गाऊ लागला  " एक दिन बिक जाएगा माटी के मोल जगमे रह जायेगे प्यारे तेरे बोल.." मी मुकेशचा एव्हढा मोठा फॅन नाही तरी त्याच वावड देखील नाही मुड आलाच तर कधी चांदसी मेहबूबा किंवा चंदनसा बदन ऐकतो पण गाणाऱ्याच्या आवाजात बात नक्कीच होती तो तल्लीन होऊन गात राहिला  कुणास ठाऊक कशी पण तंद्री लागली कुणीतरी बोट धरून भुतकाळात घेऊन गेल्यासारख वाटल मधली पाच सहा वर्ष गळून पडली तेंव्हा लाथाडलेली चांगल्या पॅकेजची नोकरी गमावलेले  काही लाख, हातात दोन पुर्ण पुस्तक आणि दोन अर्धवट सिनेमे... आत सगळा कोलाहल माजला..  स्वप्नांच्या माग ऊर फाटेस्तोवर धावण आठवल.....
मस्त आलाप घेऊन तो त्या दरवाजातून या दरवाजात आला जणू त्याचा  स्टेज परफोर्मन्स सुरुये असा, नेमका माझ्याजवळ. आपसूक हात खिशाकड वळला आणि त्याने खांद्याला थोपटून मला थोपवल अधूर गाण पूर्ण केल..
"पैसो के लिए नहीं गाया दोस्त. भगवान की दया से दो चाल और तिन टैक्सीया चलती है इस गरीब की मुंबई में. 55 साल पहले एक ख्वाब लेकर लखनऊ से यहाँ आया था बस भूक ने वो ख्वाब निगल डाला मायानगरी तो हमें रास नहीं आयी.. अभी कभीकभार ऐसे ही कलाकार होने की खुजली मिटा लेता हू " त्याच्या डोळ्यात कसलीतरी अभिजात अस्वस्थता दिसली... पिशवी सावरत तो पुढच्या स्टेशनवर उतरून गेला... त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत मला "सं.भा."च्या ओळी आठवल्या...
"उरात होती स्वप्ने आणिक
स्वरात होते गाणे
कुठे जायचे होते
आले कोठे पाय दिवाणे."

महेंद्र गौतम.
5 जून 2015.








All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected