लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पाखरं वाट बघतायत.



पाखरं वाट बघतायत
डहाळ्या डहाळ्यावर बसून
काळ्या भुईतून तांबडा सूर्य उगवेल याची.
कोण्या येड्या फकीरानं
पाखरांना दिलाय महामंत्र
वणव्यापासून ऊब मिळवण्याचा
तेंव्हापासून.....
पिवळ्याधम्मक सोनफुलांनी
डवरलेल्या फांद्याफांद्यावर
पंखात बळ साठवत
पाखरं बसून आहेत निर्धास्त.
ही वणव्याची राखं उडतेय
आता मृगाचे थेंब कोसळतील
उध्वस्त राखेतून हजारो कोंब तरारतील.
पाखरांच्या करुणघन डोळ्यात बहरतंय
उद्याच हिरवं स्वप्न.
पाखरांच्या चोची अधीक गुलाबी
पिसं अधीक शुभ्र
आणि मनं पिसासारखं अल्लद होतंय
मला अश्वत्थाच्या पानांची सळसळ जाणवतेय.......

(पाखरं गाणी गाणारं आहेत.)

महेंद्र गौतम......

माणसानं...

माणसानं.....
1.

माणसानं पकडू नयेत मासे
पाण्यात विष टाकून..
किंवा गळ आणि जाळं टाकून
करू नये फितुरी.

पाण्यातले मासे लढू शकतं नाहीत
जमिनीवरच्या कावेबाज माणसांशी

माणसानं सताड शिरावं प्रहावात
अन खुशाल पकडावेत मासे
मोकळ्या हाताने

मुकाबला बरोबरीचा हवा...

2.
माणसानं भूक असेल तेव्हढंच
घ्यायला हवं वाढून.
खरतर तोडू नये झाडाचं फळ सुद्धा
फक्त गोळा करावेत
आपोआप गळून पडलेली फळं.

उगीचच उगवत बसला माणूस
धान्यसुद्धा जमीनीतून
एव्हढं विपुल अन्न
आजूबाजुला उपलब्ध असतांना..

माणूस जन्मण्या अगोदर
बुद्धं जन्मायला हवा होता..

महेंद्र गौतम.

आत्ममग्न कविता 7.

भुरभुरत्या ओलसर सोनेरी वाळूत
हातात हात घेऊन,
तुला बघायचा होता माझ्यासोबत
निळ्या समुद्रात बुडून विझणारा
नारंगी सूर्याचा लामणदिवा...

पडल्या पापणीनीशी वागवायचीस
उरात सतत एक घोडनवरी दुःख
तरी हसून पेलायचीस
दिवसाच्या तमाम आव्हानांना.

बागेतल्या कोपऱ्यातला तो बेंच आठवतो
जिथं दिवसभराच्या कामानं थकून येऊन
बोलत बसायचीस माझ्याशी
चार सुखदुःखाच्या गोष्टी..

तू झाली होतीस कधीतरी माझ्या दुःखाची सोबतीन
आणि जेंव्हा काळवंडल होतं आभाळ
तेंव्हा दिली होतीस कवितेची वही
त्यावरचे शब्द आजही टवटवीत वाटतात
"No one can know what he can do
until he tries...."
आता सगळ्याच गोष्टी दाटून येतात
भग्न बुद्धमुर्तीमागचा गार अंधार दाटतो
ओलेते ओठ आठवतात आणि आठवते
तुझी अनावर आवेगाची गडद मिठी
आजही मी तपासतो कैकवेळा पण
मला सापडत नाही त्या स्पर्शात
वासनेचा इवलासा मागमुसही...
म्हणालीस की तुला बाईपणाची जाणीव करून देणारा
मी होतो पहिला पुरुष....
पण बाये....
तू झाली होतीस कधीतरी माझी माय
आणि तुझ्या ओढणीत सापडली होती मला
आजीच्या गोष्टीतल्या पाची पांडवासहीत
ऐरावतालाही झेलणाऱ्या कुंतीच्या पदराची ऊब...

Ana....
मला लिहायची होती नेहमीच तुझ्यावर एक दिर्घकविता
पण आले आले म्हणता शब्द फितूर होतात..
अन दुष्काळी ढगासारख होऊन जात मन
भरून तर येतं पण बरसता येत नाही....
भरून तर येत पण बरसता येत नाही....

महेंद्र गौतम.
12 जुलै 2016...

पाखरं गाणी गाणार आहेत.

या एव्हढयाश्या जमिनीवर
जर पेरशील मुठभर धान्यं
तर आनंदान बेभान होऊन
नाचत येतील थवाभर पाखरं या रानात

बाब फक्त घामाच्या चार धारांची आहे

धर्म धर्म करत कुणाही गैबान्याच्या नादी लागण्यापेक्षा
फक्त निसंकोच प्रेम कर सर्वांवर,
एव्हढी साधी सरळ गोष्ट आहे.

महेंद्र गौतम
(पाखरं गाणी गाणार आहेत.)

पाझर...

पाखरं उडत येतायत नी घेऊन येतायत
हजारो गुलाब आपल्या पाखरचोचीत...

आणि तळ गातंय लाटांसोबत
एक सूर्यफेनील सोनस्वराच
सांजसोनेरी गाणं.......

बरं झालं सगळी बाग कोमेजून
बेचीराख होण्याअगोदर हे घडतंय...

आता मला स्पष्ट ऐकू येतोय
त्या अवाढव्य कातळाच्या खोल आत
पाझर फुटत असल्याचा आवाज.....

महेंद्र गौतम...

जराशी सांज ढळतांना...

जराशी सांज ढळतांना...

जराशी सांज ढळतांना
तुझा आभास दरवळतो
कुणी पाण्यात ही जळतो
कुणाला मोगरा छळतो...

अशी निसटून जातांना
पुसटसा गंध ठेवून जा
तिथे चांदणे बहरतांना
ईथे अंधार तळमळतो...

तिच्या स्वप्निल डोळ्यातून
आसवांनो नका येवू
कशी सय दाटूनी येते
आणि प्राजक्त ओघळतो...

महेंद्र गौतम.

वेदनेला साथ लाभो अक्षरांची.

वेदनेला साथ लाभो अक्षरांची
दुःख व्हावे मोकळे कवितेसवे
मी कधी विकणार नाही आसवांना
फक्त दे सोसायचे मज बळ नवे.

महेंद्र गौतम.

थोरांचे अभंग

स्वतः वाजवावी
स्वतःचीच पुंगी
लोकांचीये लुंगी
ओढू नये.

व्हायचे असेल
जर तुला थोरं
बन आधी चोर
साळसूद

नसे तुला जरी
काडीची अक्कल
करावी नक्कल
भैताडांची

बिंधास्त ठोकावे
आपुले रे मत
लोकांना चुलीत
जावो द्यावे

आहे ईथे सारा
येड्यांचा बाजार
मार फाट्यावर
ऐकेकास....

महेंद्र गौतम.

अप्पा 3

दिसायला चॉकलेट हिरो आणि एकुणातच आपण कलाकार वगैरे असल्यामुळे अन गॅदरिंगा वगैरे गाजवत असल्यामुळे काही काही पोरी हटकून बोलायला वगैरे यायच्या आणि आपल्यालासुद्धा पोरी लहानपणापासूनच फार आवडत असल्यामुळे आपण मुळीच कुठल्याही मुलीला न दुखावता त्यांच्याशी सुमधूर वार्तालाप वगैरे करायचो ( किती हा मनाचा मोठेपणा ;-) )
तर वॉलमॅगजीनवर तेंव्हा "कातरवेळ" नामक कविता झळकली आणि अगदी भर रस्त्यात दोन बऱ्यापैकी सुंदर जुनीयर पोरींनी मला आवाज दिला, मग कविता खूप छान आहे, खूप आवडली अस काहीस आमचं अतिशयच प्रेमळ आणि लडीवाळ  बोलणं चाललेल असतांना मला समोरून खांदे उडवत अप्पा येतांना दिसला,
"अयं गोतम$$$" त्याच्या या पहिल्या हाकेला मी ऐकून न ऐकल्यासारखं केल्यावर, त्याने "अयं फोकनीच्या गोतमराम$$$$" अशी दणदणीत हाक हाणली,
( हा प्राणी मज कधी गोतम, कधी गोतमराम कधी गोतम-गोईंदा तर कधी गोतम गंभीर असल्या विशेषणाने संबोधित असे,आमच्या तीर्थरूपाच्या नावाची एव्हढी क्रूर चीरफाड कुणीसुद्धा केली नसेल).
त्याच्या या प्रेममधुर हाकेने त्या सफरचंदी गालाच्या पोरी बावरल्या आणि माझ्या स्टमकमध्ये एकाएकी डचमळून आलं.
मी केविलवाणं वगैरे हसून कुठं निघालास अस विचारलं असता,
"रात्री रवीनाची डिलीव्हरी झाली अन तिच्या दुधाचा खरवस घेऊन दादा येतोय" अस मला उत्साहात सांगून तो लगबगीन निघूनही गेला.
हे ऐकल्यावर बिच्याऱ्या पोरी विचित्र लालेलाल,कावऱ्या अधिक  बावऱ्या होऊन निरोप घेत्या झाल्या.
तर अप्पाकड साताठ म्हशी होत्या आणि प्रत्येकीच नावं माधुरी,करिश्मा वगैरे.
म्हणजे अख्ख्या बॉलीवुडचं सौंदर्य अप्पाच्या गोठ्यात नांदत होत, त्याच्या तळ्यात डुंबून चिखलाने शिरबीड होत होतं.आणि विशेष म्हणजे त्याच्या रेड्याचं नाव होत महंमद अली.
कॉलेज सुटल्यावर मुन्नाभाऊच्या टपरीवर सामुहीक चहापान आटपल्यावर टॉवल आणि बनियानवर अप्पा हॉस्टेलच्या गेटपुढच्या बेंचवर बसून गाणं म्हणतं रहायचा अर्थात येणाऱ्या जाणाऱ्याची विनाकारणं छेड काढणं हेही त्यात समाविष्ट असायच
म्हणजे "छानसी म्हेबुबा हो मेरी कब ऐसा मेने सोचा था" हे गाणं गुनागुणतांना समोरून जर मेकचा सुध्या येतांना दिसला तर "हे कोळश्याच्या खाणीतून नाही बर कॉलेजमधूनच आलय, बिच्याऱ्याचा रंगच तसा आहे, आता असता भौ डोंबळे लोकं जगात" अस हटकून बाजूच्याला बोलणारं. किंवा काळे नामक विद्यार्थी येतांना दिसल्यास "हम काळे है तो क्या हुवा दिळवाळे हे" असं बोंबलणार.
काहीएक घेणंदेणं नसतांना येणाऱ्या जाणाऱ्याला भाबडेपणान छेडणं हे वैशिष्ट अप्पानं कायम जपलं.
तर माझी वाट लावून अप्पा गेला आणि संध्याकाळच्या सुमाराला चिवड्यासाठी मी त्याला ढुंढायला लागलो, सगळीकडं शोधल्यावर कुणीतरी तो होस्टेलच्या टेरेसवर असल्याच सांगीतल. कधी नव्हे तो अप्पा पाण्याच्या टाकीवर एकटा अन शांत बसलेला दिसला, मी कचकचून एक शिवी देऊनही अप्पा स्तब्धच होता, जवळ जाऊन पाहतो तर त्याच्या डोळ्यात पाणी. विचारल काय झालं. तर म्हणतो,
" तातेराव गेला रे लेका!!!! फाशी घेतली त्यानं शेतात, कर्जाला कटाळला होता बिचारा"
हा तातेराव त्याचा शेजारी होता आठ एकर शेतीचा मालक. मी पहिल्यांदाच त्याला अस ऑक्साबोक्सी रडतांना बघीतलं, त्याची समजूत घालून त्याला मी घेऊन आलो पण त्या दिवशी तो जेवला नाही, पुढचे दोनतिन दिवस तो खिन्नच होता.
आजही कधी जुन्या मित्र-मैत्रिणीचा अड्डा जमल्यावर मला, " मह्या ती फुपाटा कविता म्हणंना लेका"असा आग्रह होतो. कधी एखाद्या कार्यक्रमात ती कविता सादर केलीच तर तिला हमखास उत्स्फूर्त दाद मिळते. बी. रघुनाथ मोहत्सवात तर इंद्रजीत भालेराव अन लोकनाथ यशवंत काकाजींनी फुपाटाच कौतुक केल. जेंव्हा एखादा कविता ऐकून " मह्या फार्म भन्नाट आहे राव अस बोलतो तेंव्हा मी मनात म्हणतं असतो,
मी तर फक्त "अप्पा" शब्दात मांडायचा प्रयत्न केला राजेहो........
महेंद्र गौतम.

जायचे निघूनी भोगल्यावर..

डुंबूनी डोळ्यात जावे भेटल्यावर
तेव्हढा अधिकार उरला ना तुझ्यावर

वेदना आपसूक बोलू लागते
शेवटी पर्याय नसतो झिंगल्यावर

मी उगा स्मरतो जुन्या वेड्या क्षणांना
केव्हढा ओशाळतो तूज पाहिल्यावर

टाळूनी तुजला जरी जातो पुढे
हुंदका दाटून येतो थांबल्यावर

घे पुन्हा आवरून सारा हा पसारा
जायचे आहे निघूनी भोगल्यावर...

महेंद्र गौतम..

ग्लानी.

ही ग्लानी तुटू नये
घट्ट मिटून घ्यावेत डोळे
कोनाडयातल्या पणतीने खुशाल फडफडावे
सूर्यकिरणं चिमटीत पकडून
त्याची सुई करणारांनी खुशाल भरावेत
लोकांचे फाटकेघाव...
या अंधाराच्या तळाला मी घेईन उबदार झोप...
रांजणाच्या बुडाच्या थंडाव्याला
झोपलेल्या नार्सिस गांडूळा सारखी...
ज्यांचं रक्त तापतं त्यांनी खुशाल
मारावी डफावर थाप
मी मात्र गाईन भावकविता
मंजूळ स्वरात.....
ही ग्लानी तुटू नये
घट्ट मिटून घ्यावेत डोळे...
(पाखरं गाणी गाणारं आहेत)
महेंद्र गौतम...

आकाश का सापडेना??

आकाश का सापडेना?

दूर आभाळात कुठे
तुझा चंद्र लपला गे?
उजेडाला काळोखाची
घरघर कशी लागे?

झाडं अश्वत्थाचे एक
चंद्रबिंब पानोपानी
छायेखाली त्याच्या सारा
तम कसा मिटला गे?

युगे लोटलीत माझे
आकाश का सापडेना
पुन्हा मस्तकात एक
शूळ कसा उठला गे?

एक देह एक वाचा
एक मन एक मान
एव्हढीच बात मग
दुजाभाव कुठला गे???

महेंद्र गौतम..

साखरी बोरं अन कडवट दरुमाय.

साहेब घ्या ना साखरी बोरं आहेत... मी चमकून पाहील, समोर बोरांची रास. क्षणार्धात डोळ्यासमोर बाबुराव काळेच्या गोठ्यातली भली मोठी बोर तरळली. शाळा सुटली की तिच्याखाली  पोरांचे जत्थेच्या जत्थे जमायचे. लहानच नाही तर बुजुर्ग मंडळीसुद्धा ढेकूळ, दगड किंवा उसाच टिपरू मारून बोरांचा सडा वेचायचे. पिवळट हिरवा रंग, दाताखाली जाता पाणीच होणारं  टपोरं अवीट फळ. जिभेवर स्वर्ग अवतरायचा. हसत दगड झेलत रसाळ बोरं देणारी प्रसन्न साखरी बोर. बोरीच्या बाजूला दरुमायच घर. बोरीवरचा एखादंदूसरा तरी  गोटा तिच्या पत्रावर पडायचा त्यासरशी तिची एक खमंग पेटितली शिवी बाहेर यायची कोणी तिकड लक्ष द्यायच नाही दणदिशी दगड पत्रावर आदळायचा आणि तिच्या शिव्या सुरु व्हायच्या ती बाहेर मात्र कधी दिसायची नाही. येणाऱ्या जाणाऱ्या आयाबाया म्हणायच्या "लेकरायला वक्ट्या वंगाळ शिव्या देती तिला अळया पडतील."
एक दिवस दुपारची भिंतीला धरून चालणारी दरुमाय दिसली, एवढ्या दिवसात तिला पहिल्यांदाच पाहत होतो. देवीचे वण असलेला भयंकर चेहरा, डोळ्यात पडलेलं फूल, सरळसोट नाक ,शुभ्र पिंजारलेले केस, जाम तंतरली तिला पाहून.
बोरांचा सिझन संपला तस तिकड फिरकणही बंद झालं, एक दिवस तिच्या घराकडून जातांना आतून विचित्र कन्हण्याचा आवाज आला, धूम पळालो.
काही दिवसांनी कळलं तिच्या स्तनात खरचं अळया पडल्या. उमेदवारी करणारा तरुण डॉक्टर फिरोज दिवसाआड येऊन तिचं ड्रेसिंग करायचा. आता तिच्या घरसमोरून जातांना "आयडिंगचा" उग्र दर्प यायचा, रक्तानं माखलेले कापसाचे बोळे आढळायचे. फिरोज मन लाऊन तिची विनामूल्य सुश्रुषा करत राहिला. आणि एक दिवस ती गेली.
कुणी बोलल दरुमाय अशी विचित्र नव्हती, पण भर जवानीत भरधाव उतारात बेकाबू बैलांच्या बैलगाडीच्या चाकात येऊन तिचा नवरा गेला तेंव्हापासून ती अशी झाली.
काही दिवसांनी बांधकामाला अडथळा होतो म्हणून काळ्यांनी ती साखरी बोरं तोडली.
तिचं प्रशस्त खोडं मात्र आहे. आता कधी तिकडं गेलोच तर त्या खोडावरुन हात फिरवतो तेंव्हा आठवते साखरी बोरांची अविट गोड चव आणि कडवट दरुमाय...

महेंद्र गौतम

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected