लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

साखरी बोरं अन कडवट दरुमाय.

साहेब घ्या ना साखरी बोरं आहेत... मी चमकून पाहील, समोर बोरांची रास. क्षणार्धात डोळ्यासमोर बाबुराव काळेच्या गोठ्यातली भली मोठी बोर तरळली. शाळा सुटली की तिच्याखाली  पोरांचे जत्थेच्या जत्थे जमायचे. लहानच नाही तर बुजुर्ग मंडळीसुद्धा ढेकूळ, दगड किंवा उसाच टिपरू मारून बोरांचा सडा वेचायचे. पिवळट हिरवा रंग, दाताखाली जाता पाणीच होणारं  टपोरं अवीट फळ. जिभेवर स्वर्ग अवतरायचा. हसत दगड झेलत रसाळ बोरं देणारी प्रसन्न साखरी बोर. बोरीच्या बाजूला दरुमायच घर. बोरीवरचा एखादंदूसरा तरी  गोटा तिच्या पत्रावर पडायचा त्यासरशी तिची एक खमंग पेटितली शिवी बाहेर यायची कोणी तिकड लक्ष द्यायच नाही दणदिशी दगड पत्रावर आदळायचा आणि तिच्या शिव्या सुरु व्हायच्या ती बाहेर मात्र कधी दिसायची नाही. येणाऱ्या जाणाऱ्या आयाबाया म्हणायच्या "लेकरायला वक्ट्या वंगाळ शिव्या देती तिला अळया पडतील."
एक दिवस दुपारची भिंतीला धरून चालणारी दरुमाय दिसली, एवढ्या दिवसात तिला पहिल्यांदाच पाहत होतो. देवीचे वण असलेला भयंकर चेहरा, डोळ्यात पडलेलं फूल, सरळसोट नाक ,शुभ्र पिंजारलेले केस, जाम तंतरली तिला पाहून.
बोरांचा सिझन संपला तस तिकड फिरकणही बंद झालं, एक दिवस तिच्या घराकडून जातांना आतून विचित्र कन्हण्याचा आवाज आला, धूम पळालो.
काही दिवसांनी कळलं तिच्या स्तनात खरचं अळया पडल्या. उमेदवारी करणारा तरुण डॉक्टर फिरोज दिवसाआड येऊन तिचं ड्रेसिंग करायचा. आता तिच्या घरसमोरून जातांना "आयडिंगचा" उग्र दर्प यायचा, रक्तानं माखलेले कापसाचे बोळे आढळायचे. फिरोज मन लाऊन तिची विनामूल्य सुश्रुषा करत राहिला. आणि एक दिवस ती गेली.
कुणी बोलल दरुमाय अशी विचित्र नव्हती, पण भर जवानीत भरधाव उतारात बेकाबू बैलांच्या बैलगाडीच्या चाकात येऊन तिचा नवरा गेला तेंव्हापासून ती अशी झाली.
काही दिवसांनी बांधकामाला अडथळा होतो म्हणून काळ्यांनी ती साखरी बोरं तोडली.
तिचं प्रशस्त खोडं मात्र आहे. आता कधी तिकडं गेलोच तर त्या खोडावरुन हात फिरवतो तेंव्हा आठवते साखरी बोरांची अविट गोड चव आणि कडवट दरुमाय...

महेंद्र गौतम

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected