लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

अर्थ

तो शोधत हिंडतो अर्थ
जगण्याचे, मरण्याचे, ये-जा करणाऱ्या श्वासांचे
याचे-त्याचे,अगदी कशाचेही.
जिभेखाली अविरत स्रवणारी लाळग्रंथी
दाढेत सरकावलेल्या तंभाखूतंल निकोटिन
आमनधपक्या नजरेत पडलेला
एका सद्गृहस्थाचा कोण्या सदगृहिनीसोबतचा
अनैतिक चोरटा संभोग.
पिवळट पडलेल्या जाईच्या वेलीवरचा
अर्धसुकला बहर,
भरवर्गात अठरासखमवर अडखळल्यावर
अष्टोदरुसे आठवायचा मोका न देताच
गालावर उमटलेले मरतुकड्या पण
मारकुट्या मास्तरांचे हिरवे बोटं.
अखंड वाहत्या रस्त्यावरचा फुटपाथ
तीन काळपट ओबडधोबड दगडांची चूल
जर्मल भगुण्यात रटरटणारे पांढरट मांसतुकडे,
जुनाट साडीच्या आडोश्याला नाहणाऱ्या
प्रशस्त छातीच्या भरदार फाटक्या बाया,
डोक्याला तेल नसणारे, पायावर धुळीचे थर मिरवत
काहीबाही खेळणारे मळकट लेकरं,
विशिष्ट तारेतले जर्दलाल विझल्या डोळ्यांचे भुरकट पुरुष,
तो लावत बसतो यांचा परस्पर अन्वयार्थ.
त्याला दिसतं ठन्न वाळक्या खोडात
एखादं हरीण एखादा मोर,
अर्धओल्याकोरड्या बाथरूम फरशीवर
अनाम  लमाण स्त्रीचा करुण चेहरा
सिगारेटच्या धुरातला चंद्र
पळणाऱ्या सफेत ढगात शेपूटधारी माणसांचे जत्थे,
आताशा त्याला कशातही काहीही दिसतं
अन मनात युरेका युरेका होतं.
त्याच्या झोपेत येत नाहीत स्वप्न
तर येतात असंख्य आवाज घुंघुं गोंगाट
मग तो म्हणतो सृजनाच्या पादरफुसक्या गप्पा
हाणू नयेत मैथुनाभिलाषी, खादाड स्वार्थी लोकांनी
तर शोधावं संगीत गोंगाटातंल,
त्याचा करावा पतंग नी सोडून द्यावा या मोकळ्या आभाळात
उंच उंच अधिक उंच...
मग चिरकावं मनात लाखदा युरेका..
फक्त एवढ्याचसाठी ,
तो शोधत हिंडतो अर्थ
जगण्याचे, मरण्याचे ये-जा करणाऱ्या श्वासांचे
याचे -त्याचे अगदी कशाचेही.

महेंद्र गौतम.

वितळू दे.


3.20 ची वेळ झालीय, मी गॅलरीत उभं राहून कॉफीच्या मगात या पूर्णकृती चंद्राला कैद करू पाहतोय, हा उत्तर रात्रीचा शांत जीवघेणा प्रहर सरसरत अंगावर येतोय!! अश्यावेळी माझ्यातला आदिम काव्यपुरुष तळातून वर येऊन शरीरमनाला व्यापून विक्राळ होतोच, त्रास आहे गं नुसता त्रास आजकाल मला माझं स्वःत्व पेलवत नाही बघ!!
"though I had choosen this solitude" चहू बाजूंनी भक्कम पोलादी भिंती आणि आत कैद मी!! जाणीवपूर्वक आपणच निवडलेला एकांत जेंव्हा असा काटेरी होतो तेंव्हा काय करायचं?  ही मगातली कॉफी हिंदकळतेय, धडपडतेय आणि हा चंद्र चकवा देतोय.त्यात हा वारा , अश्या सर्द रात्री अश्या वेगानं वाहू नये इतकंही कळत नाही का ह्याला? बहरलेल्या रातराणीच्या गंधान का न्हाऊ घालतोय हा मला सारखा??  and this bloody environment is increasing my anxiety!!
ह्यात रातरणीचाही दोष नाही म्हणा सुगंध उधळून देणे हा तिचा मूलधर्मच नाही का? पण अश्या वेळी मी माझा मूलधर्म शोधायला का धडपडावं? तू म्हणायचीस you are a multilayerd man!!
आणि मी हसत विचारायचो am i an onion which is having different layers? मग मी स्वतःला कांदापुरुष म्हणू का?
पण काही का असेना आताशा स्वतःतली ही असंख्य अस्तरं भेदून त्या मूळ गाभ्यापर्यंत प्रकर्षानं पोहचावं वाटतंय. त्या दिवशी बसमधल्या भर गर्दीत दोन ओळी सुचल्या,
"इस तन की लालसा झुठी रे
तू मन मे झाक के देख जरा"
चमकलोच मी ! आणि हल्ली एव्हढं सघन अवजड सुचतंय की बोटात पेन धरायलाही मन धजावत नाही थरथर होते बोटांची आणि मनाचीही. चार ओळी लिहायलाही ही अशी जीवघेणी दमछाक?
आणि हे असं सगळंच प्रचंड प्रतिकात्मक वर यायला लागलं तर किती अवघड होऊन जाईल!! म्हणून की काय मी कागदावर चितरलेला कांचीएव्हढा सूर्य या चौकटपसंत टीचभर आकाशात सोडायचा धीर होत नाही मला तर.पण हा वणवा अंतर्यामी सतत धगधगतोच निरंतर ही आच मी सोसतोच, हा लाव्हा मस्तक फोडू पाहतोय त्याच काय?
" जशी अंतर्यामी
तडकली काच
सोसवेना आच
जीवघेणी."
अश्या तडकल्या अंतरंगानं वावरतांना प्रचंड energy loss अनुभवतोय, त्यात पायाच्या बोटापासून थेट मस्तकापर्यंत धावणारं विष..
" धमण्यांमधून
वाहतसे विष
सुखाचे निकष
व्यर्थ सारे."
मला रडायचंय, मनसोक्त खूप जोरात ओरडून रडायचंय.
"गळ्यात दाटतो
आकांत हुंदका
पुरता पोरका
झालो आता."
हे खोदकाम खूप दिवसाचं मी सुरू केलयं, निःशंक मला वितळायचंय, वितळून स्वतःचा पारा करता आलं तर??
"कर एक घाव
तुटू दे ही फांदी
देहाची या चांदी
वितळू दे."
महेंद्र गौतम.

यात्रीक1

चालत रहा, चालणं महत्वाचं. चालत राहिलास तर सोबत समस्या, संकटं, दुःख, वेदना आणि प्रश्न देखील चालतात. प्रश्न पडू दे उत्तरावर कामं कर. थांबू मात्र नकोस.
थांबलास तर सोबत हे सगळे आगंतुक पाहुणे पण थांबतील,
रेंगाळतील हल्ला करतील साचून राहतील आणि तुझा त्रास वाढेल.
तू गांगरशील, हताश होशील, नैराश्य दाटेल मग अवघड होईल, मुळात अवघड होऊच का द्यायचं?
त्यापेक्षा वाहत रहायचं हे उत्तम.
लहान मुलं एक पाऊल टाकत आपण हरखून जातो,
त्याला म्हणतो अजून एक अजून एक आणि ते दुडुदुडु धावायला लागतं ना?
तसंच हरखून जाता आलं पाहिजे लहान मुलं होता आलं पाहिजे.
जग नेहमीच तुझा बाजारभाव ठरवतं असतं, पाच सहा वर्षांपासून ते वीस बावीस वर्षांपर्यंत
तू शिक्षण घेतोस काय शिकवतात तुला? तर स्वतःला विकण्याची कला.
ऍपटीट्युड टेस्ट असते ना? आता हा बाजार अपरिहार्य आहे तो स्वीकार
त्यासाठी दिसणं आणि दाखवणं महत्वाचं म्हणजे तू लायक आहेस हे दिसलं पाहिजे, त्यापेक्षा ते तुला जाणीवपूर्वक दाखवता आलं पाहिजे त्यासाठी तू लायक असलंच पाहिजे असं काहीच नाही.
तू कोण आहेस? तर कोणीच नाहीस हे एक उत्तर आणि याहून खरं म्हणजे तू तो आहेस जो तू स्वतःला समजतोस..
#यात्रीक
#महेंद्र गौतम.

मार वेड्या थाप आता डफावर

भरवसा टाकला होता तुझ्यावर
वाहतो रोज माझे मी कलेवर

कुठुन हा पूर भेटायास आला
कुणाच्या आतले फुटले सरोवर

तगून राहू कठीण दिवसांत या
उरीभेटू लढाई संपल्यावर

मोर्चे निषेध बाकी शुन्य सारे
सांग उरते काय जिव घेतल्यावर

जिवघेणे खेळ सत्तेचे सतत
शोषणाचा खेळ चाले निरंतर

कंठ आहे तुला मग का भितो तू?
मार वेड्या थाप आता डफावर..

महेंद्र गौतम.

भुत्या..

नानाचा पकपकपकाक नावाचा मराठी सिनेमा आहे
पाड्यापाड्यावर जाऊन सचोटीनं लोकांची सेवा करणारा एक वैदू.
त्याची सुंदर बायको एक लेकरू प्रसंगी घराकडं दुर्लक्ष करून
रुग्णाच्या हाकेला अर्ध्यारात्री धावत जाणारा भला माणूस,
एका माजोरड्या धनदांडग्याच्या पोराच्या कसल्याश्या आजारासाठी
त्याला बोलावतात दवापणी करून सगळं समजावून सांगून घरी येतो.
रात्री एक म्हातारी लांबून चालत आलेली,तिच्या नवऱ्याला साप चावलेला
म्हणून तिला पाठकुळी घेऊन तिच्या पाड्यावर जायला निघतो
इतक्यात काही माणसं येऊन वाड्यावर चल म्हणतात,
तो नकार देतो आणि पाड्यावर जाऊन म्हातारीच्या नवऱ्याला वाचवतो
घरी येऊन बघतो तर त्याच घर जळत असत आत बायको
टाहो फोडत असते याला बेदम मारून बेशुद्ध करतात
शुद्धीवर येऊन वैदू बघतो त्याचं बेचिराख झालेलं घर आत भाजून कोळसा झालेली बायको आणि मुल
तो आकांत करतो आणि धावत सुटतो रडत रडत पळत सुटतो जंगलाच्या दिशेनं
आणि मग राहायला लागतो जंगलात 'भुत्या' म्हणून
माणसाच्या वस्तीच्या दूर एकटाच. जंगलात येणाऱ्या जाणाऱ्यात याची दहशत बसते
भुत्याच जंगल होतं.
गेली कित्येक महिने मला वाटतंय असंच भुत्या होऊन दूर निघून जावं
माणसाच्या वाऱ्यालाही थांबू नये जंगला बिंगलात मरण येईपर्यंत जगावं
इथं जगण्यासारखं काही उरलंच नाही, श्वास गुदमारतोय
सगळीकडं भयानक रानटीपणा माजलाय.
भयानक चाललंय चौफेर. ऑक्सिजन अभावी निरागस लेकरं मरतायत,
खरं बोलणाराचे बिनदिक्कत मुडदे पाडल्या जातायत, गायप्रेम
देशप्रेमाला ऊत आलाय. बलात्कारी चमडी बाबाच्या समर्थनार्थ
जाळपोळ होऊन बेकसुर माणसं मारल्या जातायत.
फेसबुक व्हाट्सअपचा अणुबॉम्ब होतोय कधी नव्हे इतकं रक्तपिपासू
आणि बिनडोक वातावरण झालंय, सगळीकडे भोसका भोसकी सत्तेसाठी लोकांचा
फिअर फॅक्टर कंट्रोल करण्याची चढाओढ, ट्रोलगिरी..
विषण्णता आणि टोकाची हतबलता, कमालीच्या वेगानं आपण हुकूमशाही आणि धर्मशाहीकडं चाललोत आज.
खरं लिहायची चोरी खरं बोलायची चोरी
जे चाललंय त्याचा त्रास होतोय म्हणजे लोकांच्या दृष्टीनं आपण चुतीया
भुत्या बनून जंगलात का निघून जाऊ नये??

#महेंद्र गौतम.

झड

#झड.

सकाळी त्याचा टिनावरचा आवाज ऐकत अजून गरम गोधडीत
फुरंगुटून घ्यायचो आईनं कितीही आवाज दिले तरी उठायचोच नाही.
मग आरामात उठून गरम चहा घेऊन मस्त टीव्ही समोर ऐसपैस बसून सगळी सकाळ
लोळत काढायचो, दुपारचं जेवण उरकलं की कुठलंही आवडत पुस्तक
काढून डोळे जडावेपर्यंत वाचत राहायचं अन मग त्याचा कधी रिपरिप कधी दनदन आवाज ऐकत
गुडूप झोपायचं ते थेट संध्याकाळच्या चहालाच अंथरून सोडायचं
त्या दिवशी गावरान कोंबडीचा बेत हमखास असायचाच बाबांचा.
जेवून चुलीसमोर मस्त गप्पाची मैफिल रंगायची,मजा यायची
ओढ्याचा पूर त्याच पाणी कुणा कुणाच्या घरात घुसायचं,
तळं तर बेभान भरून ओकायचं.
आता तर अश्या झडीत छत्री घेऊन ऑफिसला जायचा जाम कंटाळा येतो
उगाच नॉस्टॅलजीअस व्हायला होतं.
अश्या झडीत काहीच नसावं दुपार लोळत काढावी
पुस्तक वाचून रंगून झोपावं संध्याकाळी बाबाच्या गप्पांसोबत
मस्त जेवण करावं ताटात आईच्या हातची हिरव्या मिरच्यांची कोथिंबीर घातलेली झणझणीत उडदाची डाळ खरपूस ज्वारीची भाकर आणि एखाद दुसरा चुलीत भाजलेला बोंबील सोबत
लिंबूमिर्ची लोणचं बस तुडुंब होऊन जावं. रात्री लाईट गेल्यावर
उशाला स्टूल ओढून कंदिलाच्या मोठ्या वातीत रिमझिम ऐकत
मस्त वाचत पडावं..
अशी झड असावी राव एकदम सुखाची झड...
#महेंद्र गौतम

मी तयार आहे.

उन्मत्त झुंबड गर्दीधारी बेगडी बाजारबुणगे
स्वतःच्या वर्चस्वाची टिमकी घेऊन सारसावणारे हात
चिक्क मांड्यातून स्रवणारा शितोष्ण लाल तळतळाट
काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
जाणीवपूर्वक येत नाही सोयीच्या कानांच्या परिघात.
लिलावउद्युक्त बाजार जिंदगाण्या.
ऊब,ओल कालबाह्य असलं तत्सम काहीबाही,
हतबलतेची शिखंडी कारणं शोधणारी फुसकी व्यस्तता.

कुणाचं बोटं धरून उतरलो होतो
या गुढघनं काळीम डोहात?
शिरत गेलो गर्द गहिऱ्या खोलात,
अस्वस्थतेच्या टुचण्या मारणारा आचरट कावळा.

हे मौन तुला कळत नाही
मलाही ते पेलत नाही आताशा
फुटतं राहत उत्फुल्ल आत काही आदीम,

असहाय जीवांवर सुरे घेऊन धावणारा
मर्दउन्मादी चिरफाडी जमाव
डोळे मिटताच दिसतो मला मी
गुहेच्या तोंडाशी टोळीसोबत्यांन सोबत
पानं आणि साली लेऊन रक्तशिरबीड हातातोंडाने
खातांना दुसऱ्या टोळीतल्या माणसाचं चविष्ट मांस.

सांग कधी हवं होतं मला मोहरेदार
गारझुळूकसंपन्न मतलई आयुष्य?
फक्त दोन क्षणांसाठीच होऊ दे मला
आतून बाहेरून पारदर्शक...
मग उरलेलं सगळं आयुष्य मी फेकून द्यायला तयार आहे..

महेंद्र गौतम.

बाबा रिटायर होताना..

बाबा रिटायर होतांना..

तेंव्हा महिन्याची चार पाच तारीख असली की सकाळपासूनच बाबा आई मस्त
प्रसन्न असायचे, सकाळी आईला काहीतरी सांगून शीळ घालत,हातात किराण्याचा मोठा थैला घेऊन ते खुशीत ऑफिसला निघायचे. संध्याकाळी आईची लगबग सुरु असायची मसाल्याचा घमघमाट स्वयंपाक घरात घुमायचा, ज्वारीच्या कडक पांढऱ्या भाकऱ्या आई अन ताई खरपूस भाजून ठेवायच्या. मग सातच्या सुमाराला बाबाची एन्ट्री व्हायची एका हातात तेलाची मोठी किटली खांद्यावर भली मोठी पिशवी.
मी पळत जाऊन किटली घ्यायचो दादा खांद्यावरची पिशवी धरू लागायचा
बाबा पिशवीतलं मटण आधी आईच्या हाती सोपवायचे. मग फ्रेश होऊन तिघांना घेऊन बाबा बसायचे
माझ्या आवडती बालूशाही, बिकानेरचा शेवचिवडा, इमरती,केळी,किराण्यातले पेंडखजुर आंब्याचा सिझन असला तर आंबे.मस्त गोल कोंडाळ करून खायचो जाम खुशीचा दिवस असायचा. जेवण उरकलं की आई सोबत मिळून रात्री ते कसला तरी हिशेब करत बसायचे.
त्यावेळी घरात फार पैसा यायचा असंही नाही पण जे यायचे
त्यात सगळं खुशीत निभायचं ददात नव्हती कशाचीच. संध्याकाळी ऑफिसवरून
बाबा आले की सगळं कुटुंब कोंडाळ करून जेवायला बसायचं बाबा जामच कॉमेडी,
भारी गपीष्ट माणूस. आता पोटापाण्यासाठी या मेट्रोत धावतो तेंव्हा त्यांचं मोठेपण कळतं, फक्त 186 रुपयांनी नौकरी सुरु केलेली, (इथं मी चांगला पाच आकडी पगार कमावतो तरी महिन्याकाठी बजेट बोंबलतो) मी कधीतरी फोन करून विचारतो काहीच हातात नसतांना घर, तिघांचं शिक्षण , ताईच लग्न, नातवांची आजारपणं.तुम्ही कस काय मॅनेज केलं? त्यांचं फक्त एकच उत्तर,
तुला सोपं वाटतं लै हिशेबान रहावं लागतं बेट्या..
दोनेक वर्षाचा होतो तेंव्हा त्यांचा अपघात झाला पायांचा पार भुगा झालेला
चारदोन ऑपरेशन्स मग पायात रॉड, तरी ते खचले नाहीत जिद्दीनं उभे राहिले
पाय जरा जाग्यावर आल्यावर काही वर्षांनी उमरखेड वरून गावी शिफ्ट झालो तेंव्हा कितीतरी वर्ष त्यांनी
तब्बल पंधरा किलोमीटर रोज सायकल वरून अपडाउन केलं.
अपघातामुळं पण फार नुकसान झालं उत्तम ढोलकीपटु त्यामुळे भजनासाठी खूप वेळा बोलावणं यायचं
त्याच्यावर परिणाम झाला, स्वतःच कलापथक होत लोकांना तुफान हसवायचे कधी जेवताना एक एक किस्सा सांगतात त्या दिवसातला अन ठसका लागेस्तोवर हसतो सगळे. आताही कधी मुड झाला की संध्याकाळी ढोलकी काढतात मग आमच्या दोघांची मैफिल सुरु होते मी जमवून ठेवलेले लोकगीतं, गझला, भजनं, काही स्वतः लिहिलेली गाणी असा धांगडधिंगा सुरु असतो, ताल आमच्या खानदानात पहिले पासूनच आहे बापू पखवाज वाजवायचे बाबा ढोलकी आता दादासुद्धा छान ढोलकी वाजवतो पण बाबसारखं त्याला "तोडता" येत नाही मी गजल सुरु केली की तो लगेच ढेपाळतो याद पिया कि आये ला तर तो एकवेळ जामच वैतागला मग बाबा स्वतःच आले म्हणाले पाहू बरं किती अवघड गातो महिंद्रा,देरे जरा.
अन असं वाजवलं महाराजा की आपली विकेटच..!! बाप आहे बेट्या जोक समजला का..??
घरात कुणावर जबरदस्ती नाही,मध्ये उमेदीची सहा वर्षे मी नुसता भटकत राहिलो
कोरिओग्राफी केली , झपाटल्या सारखा वाचत राहिलो, गजलेचा पिच्छा पुरवला कविता कथा,लिहिल्या,शिवाय मनसोक्त भटकलो. सिनेमा लिहिला तो थोडंसं उत्पन्न देऊन गंडला मग औकातीवर येऊन गुपचूप जॉब जॉईन केला थोडीसी कुरकुर करायचे पोटाकडं बघ म्हणायचे नंतर कळलं की जे केलं ते त्यांनी आधीच केलं होतं त्या क्षेत्रातली अनिश्चितता त्यांना ठाऊक होती पण माझं बेदरकार असणं त्यांनी सोसलं
प्रसंगी जेव्हढा हवा तेवढा पैसाही पुरवला विनातक्रार.
माझ्या घरी आलेला प्रत्येक दोस्त त्यांचा दोस्त होतो माह्याचा बाप लै ढिंचाक माणूस राव म्हणतो.
कितीतरी मैत्रिणी त्यांना अजून कॉल करतात. आईपासून मी बऱ्याच गोष्टी लपवतो
पण बाबाला कितीही पर्सनल बोलता येतं. अनावरच्या प्रकाशनाला त्यांना बोलावलं
हृषीकेश कांबळे सारखा परखड समीक्षक, दासू सर सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं
तेंव्हा मात्र जरा हळवे झाले प्रोग्राम संपल्यावर निघताना फक्त म्हणाले
तुला जे करायचं ते तू करणारच कोणाच्या बापाचं ऐकणार नाहीस पण थोडी जबाबदारी घे आता
निदान स्वतःच तरी बघ आमचं सोड. आता महिन्याकाठी पैसे पाठवले काय
किंवा न पाठवले काय तक्रार नसते.
गेल्या वर्षी हौसेनं सहा एक हजाराच सफारीच कापड घेऊन गेलो तेंव्हा लहान मुलासारखं
हसले म्हटले लेकरं पटकन मोठे होतात.
काल नौकरीचा शेवटचा दिवस होता त्यांचा, जंगी सत्कार झाला
डिपार्टमेंटचे मोठे मोठे अधिकारी छान बोलले मला म्हणाले तू हवा होतास
एक हॉटेल बुक केलं होतं रे कार्यक्रमासाठी,महागडं सोनाटाचं घड्याळ दिलं. एकोनचाळीस वर्षे दोन महिने एकोणतीस दिवसाची सर्व्हिस झाली कोणाकडून तक्रार नाही कुणाचे पैसे खाल्ले नाहीत याच दिवसासाठी इमानदारीने काम केलं.
मी म्हटलं आता आराम करा संध्याकाळ एन्जॉय करा.
बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकायच्यात अजून जस कोंबडी घरच्या घरी सोलणं, खेकडे फोडण साफ करण मासे नीट स्वच्छ करणं, बाजार करणं, एक नंबर मटण आणण, एका रेषेत प्लेन तावावर सुंदर लिहिणं,झपाटून जाऊन काम करणं, पटकन माणसात मिसळण आणि महत्वाचं म्हणजे प्रचंड तणावात कायम हसत राहणं.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा..!!

यायचं म्हणतेस तर

यायचंच म्हणतेस तर जरूर ये
पण येतांना चिमूटभर उजेड आणायला नको विसरुस,
कारण आताशा इथल्या रात्री असतात
जर्दकाळोख्या अन सर्दवादळी.
पुढच्या बागेतली वेल्हाळ फुलपाखरं आठवतात?
मलूल अन फिक्कट होऊन गुमसुम बसून असतात,
खूप सारी फुलांची रोपं आन त्यांना,
जमल्यास मोगरा आणि शेंदरदेठ्या प्राजक्ताची
ओंजळही घेऊन ये.
घरामागचे दोन प्रशस्त वड,
त्यांच्या शितसमंजस सावलीत पाखरं बागडायची
मुळ्या उखडू लागल्यात त्यांच्या,
येतांना धीर घेऊन ये थोडा
रोज थोडं प्रेमानं अंजारशील गोंजारशील
तर बहरतील थकल्या पारंब्यानिशी नव्यानं तेही.
तू नाहीस म्हणून वहीची पानंही सादळलीत
उणेअंशावर गोठावेत थेंब तसे शब्द गोठलेत
येतांना थोडा चेतनउष्मा आण त्यांच्यासाठी.
यायचंच म्हणतेस तर जरूर ये,
कारण हे अस्वस्थ चार भिंतींचं एक छत,
घर व्हावं म्हणून झटणाऱ्या वेड्यांचा
काफीलाही येतोय एव्हढंच.

महेंद्र गौतम.

जगुयात मात्र नक्की.

पन्हाळ्यातल्या ओल्यचिक्क धुकाळ दुपारी
हिरवटशेवाळ गडाच्या कठड्यावर बसून
मी सांगितली होती तुला एक बिनशेंडाबुडख्याची गोष्ट,
ऐकून हसत सुटली होतीस खोखो लहान पोरासारखी.
तिनेक श्रावण शिरवाळाचे दिवस रंगून जायचे
दरवर्षी पोपटीगुलाबी रंगांनी आपले.
तेंव्हा दोन्ही काळजात गच्च पसरत गेलेल्या,
खोलवर रुजलेल्या सुगंधी मुळ्या,
अपक्षयाच्या समंजस जाणिवेनं उपटून
टाकल्यात खऱ्या,
पण आतली गंधाळ ओल?
ती काहीकेल्या झालीच नाही कोरडी शेवटपर्यंत.
कमावती झालीस तेंव्हा माझ्या वाढदिवशी
तू टाकलेले दोन हजार त्यातून घेतलेला ब्रँडेड शर्ट,
तू पाठवलेलं वॅलेट.पार जुनाटलं,
चिल्लर गळते अधूनमधून पण मला टाकवत नाही ते.
पूर्ण लाल शाईत आलेलं तुझं पत्रं,
वाचतांना ओक्साबोक्सी रडलो खरा पण
दहा मिनिटांनी डोळे पुसत फाडून टाकलं मी ते
डस्टबिनमध्ये,
आता तुझ्यासाठी मी झालोय मिठाचा खडा,
परतलो तर तुझा संसार नासेल,
आणि तू फिरून यायचं म्हटलंस तरी,
ही झाटू दुनिया तुला बदफैली ठरवेल.
मुळात दोन विभिन्नलिंगी माणसात
असू शकत लैगिंकतेपलीकडेही
एक निरामय नातं असं जगातल्या किती
लोकांना वाटतं??
पण आपण भेटूयात जेंव्हा गात्र शिथिल होतील
आणि इंद्रिय सुखाच्या सर्व लालसा मावळतील
अश्या एखाद्या शांत संध्याकाळी.
मी वाचून दाखवीन तुला त्या कविता
ज्या मी मांडल्या नाहीत कधीच कुणासमोर.
आणि करेन तुला आवडणारा
माझ्या हातचा अद्रक मसाल्याच्या पेशल चहा
थरथरणाऱ्या हातांनी..
तोवर life is beautiful म्हणत जगुया..
पण जगुयात मात्र नक्की...

महेंद्र गौतम.

लघुकथा

त्यानं सिगरेटचा एक जोरदार कश घेतला छातीभर
धुर, त्यानं ओठांचा चंबू करत धूर एका रेषेत बाहेर सोडला
किक काय बसत नाही आपल्याला आजकाल,त्याला वाटलं.
पण सिगरेट तर हृदयासाठी फार घातक असते त्याला आठवलं
मग तो एकटाच मोठ्यांदा हसला,
सालं आपल्याला हृदय आहेच कुठं? त्याचा तर पार चेंदामेंदा झाला की.
बाजूला पडलेली खरकटी भांडी आणि रुमभर पसरलेली
सिग्रेटसची थोटक. त्याला वाटलं खूप जोरात बोंबलावं.
आणि अस्ताव्यस्त रडावं, नको अख्खी सोसायटी गोळा होईल.
त्याचा बॉस त्याला झापत बोलला काल,
" why you are making such typs of silly mistakes.?
काय प्रॉब्लम आहे सुट्टी हवीय का?तर घे ना सुट्टी..
साला बॉस चुतीया आहे तो हसला, मग तो परत मनाशी म्हणाला
साला आपणच चुतीया आहोत तो परत हसला.
डॉक्टर म्हणाले तू यातून बाहेर येशील सहा महिने दे स्वतःला.
त्याला उदास वाटायला लागलं तो नेहमीच्या तळ्याकडं
निघाला,
तळ्याकाठचा नेहमीचा दगड, त्याला वाटलं आपण उगीच माणूस झालो
आपणंना दगड झालो असतो तर बरं झालं असत तिच्या आयला
दगडांना दुःख नसतात वेदना होत नाहीत प्रेम तर अजिबात होत नाही
दगड माणसानंपेक्षा लैच सुखी असतात.
त्याला दिसली सोनेरी बदकांची ती नेहमी दिसणारी जोडी,
बापरे त्यांच्या भोवती तर पिटुकले सोनेरी पिलंपण
होती यावेळी, ब्वाकब्वाक करत पाण्यावर तरंगणारी.
त्याला वाटलं तो जी.ए. कथेतला बळवंत मास्तर जसा
वेडा झाला तसं आपणही वेडाच होणार नाहीतर
मग त्यानं स्वतःला जस संपवलं तसंच संपून जाणार??
आणि काय!! ते भलंमोठं सोनेरी बदक उडत आलं
ना त्याच्याजवळ,एकदम त्याच्या पायाजवळच येऊन
उतरलं ब्वाक, काय सुंदर आहे हे सोनेरी बदक तो
बघतच राहिला.
आणि मग बदक बोलायलाच लागलं माणसां सारखं
एकदम,
"जीव द्यायचा विचार करतोस? वेडं व्हावं वाटतं तुला?"
बदकं अक्राळविक्राळ हसल,
आयला याला कस कळलं? त्यानं डोकच खाजवलं.
"तुम्ही माणसंना विचित्रात विचित्र असता राव."
"कसं?" त्यानं त्या बदकाच्या सुंदर डोळ्यात बघीतलं.
"जरा म्हणून दुःख वेदना सहन होत नाही तुम्हाला
पळपुटे लेकाचे, अरे येड्या सोपं असतं वेडं होणं सोपं असत
जीव देणंसुद्धा, पण अवघड काय असतं माहितै का?
उरातल्या व्यथेला सांभाळत जगणं, प्राणांतिक वेदना सहन
करत दुसऱ्यांसाठी जगणं.
दुःखाचा बडेजाव न करता हसणं आणि हसवणं..
जग की जरा माणसांसारखा. बावळट तिच्याआयला."
बदकान सोनेरी पंख फडफडवले नितांत सुंदर होत
ते बदकं, देखणं राजबिंडं, त्याला त्याचा हेवा वाटला.
त्यानं हातातली सिगरेट दगडावर विझवली...
तळ्याचं निळशार पाणी आणि बदकांची पिलं आणि
ते बदक बघत राहिला तो बराच वेळ..
डोंगराच्या पलीकडं सूर्य केशरी रंग उधळत निघाला होता.
तो बसून राहिला बराच वेळ...

महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected