लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

उध्वस्त घरट्याच्या कविता 1

उध्वस्त घरट्याच्या कविता 1

तो मदमस्त स्वतःच्या पंखावर
अपार विश्वास असलेला.
त्याला दिसायचं आभाळ निळेशार
तो म्हणायचा,
एक भरारी आणि मी कवेत घेईल हे आकाश
त्याच्या आणि आभाळामधलं अंतर
अगदीच ठुसक वाटायचं त्याला.
इतक्यात ती लहरत आली त्याच्याजवळ
तोही ओढल्या गेलाच,
मग ती दोघ तरंगत राहायची
या फांदीहून त्या फांदीवर
मग एक दिवस ती म्हणाली
प्रेम आहे माझ्यावर?
तो म्हणाला हो....
किती?
खुप या आभाळाएव्हढं....
तिनं त्याच्या चोचीत प्रेमानं चोच घातली,
म्हणाली घरटं करशील माझ्यासाठी?
त्यानं एकदा आभाळाकडं पाहिलं
आणि मनाशी म्हणाला...
आभाळ काय कुठं पळून चाललं?
ही सोबत असेल तर युं काबीज करेन मी .
मग तो जोडायला लागला एक एक काडी
बांधू लागला घरटं अपार कष्टानं
तो दूरवरून एक काडी आणायचा,थकून जायचा
ती म्हणायची ही काही छान नाही
आणि फेकून द्यायची,
मग तो पुन्हा पंखात बळ भरायचा
आणि तिच्या आवडत्या कडीसाठी उड्डाण भरायचा.
तो तिला म्हणायचा,
हे घरटं होईल तेंव्हा यात एक पिल्लू येईल
मी कष्टानं चारा आणीन
पिल्लाला नी तुला भरवीन.
ती अगम्य हसत हो म्हणायची.
होता होता तिच्या मनासारखं घरटं झालं तयार
फांदीवर बसून तो वाट पाहू लागला तिची.
ती यायला टाळायला लागली त्यानं समजून घेतलं
असेल काही अडचण बिचारीची.
येईल की आज ना उद्या घाई कशाला?
दिवस चालले याचा धीर सुटला.
तिला घेऊन तो आलाच
म्हणाला बघ तरी आपलं घरटं..
ती घरट्याजवळ आली आणि पंखाच्या एका फटकाऱ्यात
मोडूनच टाकलं ते घरटं.
तो हादरला काही कळलं नाही त्याला
ती निर्दयतेनं उडून गेली,
त्याला दिसलं ती विसावलीय भलत्याच घरट्यात.
आणि प्रेमानं चोचं घालत होती कुण्या दुसऱ्याच्याच चोचीत.

आता त्या उध्वस्त घरट्याच्या अवशेषांच्या बाजूला
तो खिन्न बसून असतो,
त्याला आठवतात
एकेका काडीसाठी केलेले कष्ट
पिलाच बघितलेलं स्वप्न.
उदासून बघतो आभाळाकडं...
आभाळातलं आणि त्याच्यातलं अंतर
आता भयंकर वाढलंय....

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected