लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गोष्ट एका निंबाची.

शिकत होतो तेंव्हा सुट्टटीत वगैरे घरी जायला उशीरच व्हायचा
सकाळी मस्त आवरून जेऊन खाऊन 11च्या सुमाराला बाहेर
पडायचो, निंबाच्या सावलीत चारसहा टणक म्हाताऱ्यांचा कंपू
हमखास बसलेला असायचा, कुणी बाजेवर कुणी ओट्यावर
मस्त गप्पा टाकत बसायचे, सगळे नात्यानं आईचे काका कुणी आईचे आजोबा
मी दुरून येतानाच दिसलो की सगळे म्हातारे खुश व्हायचे,
"अरे बारक्या आलं" दुरूनच आवाज यायचा, हे सगळे आपले जानी दोस्त
"आरं तुह्या बायलीला मी कव्हा आलास?
सगळे खोखो हसायचे, मी मध्ये जाऊन आरामात बसायचो
त्यांचा रखरखीत सुरकुतल्या हातांचा उबदार मयाळू स्पर्श.
मग गप्पांचा फड रंगायचा, कोणी वाघ खाल्ल्याची गोष्ट सांगायचं
तर कोणी पंतुल्याचोराची.
मग हळूच एखादा विचारायचा,
"कावून सुकत चालला बाबा अश्यान तुह्या बायकोला
आम्हालाच संभाळावं लागलं की रं, पुन्हा खोखो.
एकजण माझी कडं घेत म्हणायचा आरं लेकराला अभ्यास किती
असतोय, मंग आन कसं लागलं रं अंगाला?
हौ ते मातर बराबर सगळे माना डोलवायचे.
बरं बाबा तुह्या मित्रीनी काय म्हणतात?
एकदा लावून दे बरं मला फोन तिच्या बायली..
या म्हाताऱ्यांनी मला दुष्काळाच्या , पळापळीच्या
कितीतरी रंजक गोष्टी सांगितल्या, यांचे पत्त्यांचे डाव पण
रंगायचे खेळही अजब म्हणजे मुंगूस, रपस. कधीतरी किटी.
दिवस झर्कन उडून जायचा, मध्येच एखाद्या पोराच्या हातावर
एखादी पन्नाशी देऊन मी भजे मागवायचो. त्या सगळ्यांना
माझ्या हातचा चहा आवडायचा, मग एखादा म्हातारा म्हणे घरी
ये ना बाबा माय आठवण काढू लागलती रं.
मग संध्याकाळी घरी गेल्यावर माय नुकतीच निंदनाऊन आलेली
असायची, मी गेल्यावर तोंडावून हात फिरवायची. मस्त चुलीत चिपाड तुराट्या कोंबून
शेळीच्या दुधाचा घट्ट चहा ठेवायची.
कधीतरी संध्याकाळी भजनाची बैठक बसायची ढोलकीवर
बाबा असायचे, काय दम होता एकाएकाच्या आवाजात.
मग एखाद गाणं आपणही म्हणायचो, गाणं सुरु करायच्या अगोदर
आ$$ असं नाही म्हटलं की, एखादा म्हातारा म्हणायचा
"ये शेपुळ ढोपऱ्या सूर धर आधी."
काय गवळणी म्हणायचे एक एक
राधा गोदा मंदा चंदा
निघाल्या बाजाराला बाजाराला
अन बाई ग कसतरी होतंय मला...
आयुष्याच्या उतारवयात असलेली ही मंडळी कायम
खुश..
तीनचार वर्षां अगोदर पोटापाण्याला लागलो.
मग मी येतांना दिसलो की विचारायचे कव्हा आले सायब?
मी अवघडून जायचो, भजनातही पहिल्या गाण्याचा मान
मलाच दिल्या जायचा,
कुणीतरी हळवं होत विचारायचं " बाबा सोबतीनं कव्हा आंतु?
सगळेच थकत चालले होते.
गेल्या दोन वर्षात कुणी अटॅकन कुणी काविळान
असं एकेक करत गेलं, दादाचा फोन यायचा अरे पुंजाबापू गेले रे
दिवसभर कामात लक्ष नाही लागायचं.
आता यावेळी गावी गेलो तेंव्हा रस्त्यानं जातांना सावकाश
चाललेले तुका बापू दिसले, मी पळत जाऊन दोन्ही हात गच्च धरले म्हाताऱ्याच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं,
"दमा लै तरास देतोय रं." म्हटलं चला बसू
एका खोडावर मस्त गप्पा टाकत बसलो आता कोणी निंबाखाली
बसत नाही हताश हसले तुकाबापू. जाताना बळजबरी
तीनशे रुपये मी खिश्यात कोंबले म्हटलं दवाखाना करा.

आता त्या निंबाखालून जातांना कससच होतं. गावी गेलो
तरी मी फिरकत नाही तिकडे.

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected