येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Tuesday, 11 April 2017

मुक्ती

तुझ्या मायाळू स्पर्शाला
आसुसला माझा देह
ऊनकातर दुपारी
कसा जांभूळला डोह.

कधी चालत जातांना
पायांची गा थरथर
कसं पाऊल मी टेकू
धरा कायम अस्थिर.

कसा धुक्यातून येई
स्पर्श रेशमी रेशमी
करपल्या काळजाला
ओरखड्याचीच हमी

आत दुभंगल काही
जाण कोणालाच नाही
कसं सारखं वाटतं
मी तो उरलोच नाही

माझा ध्यास पतंगाचा
जातो खुशीनं जळाया
कुठं पेटलं सरण
लागे नभ उजळाया

नको विषारी आसरा
नाही कोणावर सक्ती
व्यथा पोखरे वाळवी
मिळो याच्यातून मुक्ती

महेंद्र गौतम.