येथील सर्व कविता माझ्या स्वताच्या असून माझ्या परवानगी शिवाय कुठेही प्रकाशित करता येणार नाही

Friday, 5 May 2017

जगुयात मात्र नक्की.

पन्हाळ्यातल्या ओल्यचिक्क धुकाळ दुपारी
हिरवटशेवाळ गडाच्या कठड्यावर बसून
मी सांगितली होती तुला एक बिनशेंडाबुडख्याची गोष्ट,
ऐकून हसत सुटली होतीस खोखो लहान पोरासारखी.
तिनेक श्रावण शिरवाळाचे दिवस रंगून जायचे
दरवर्षी पोपटीगुलाबी रंगांनी आपले.
तेंव्हा दोन्ही काळजात गच्च पसरत गेलेल्या,
खोलवर रुजलेल्या सुगंधी मुळ्या,
अपक्षयाच्या समंजस जाणिवेनं उपटून
टाकल्यात खऱ्या,
पण आतली गंधाळ ओल?
ती काहीकेल्या झालीच नाही कोरडी शेवटपर्यंत.
कमावती झालीस तेंव्हा माझ्या वाढदिवशी
तू टाकलेले दोन हजार त्यातून घेतलेला ब्रँडेड शर्ट,
तू पाठवलेलं वॅलेट.पार जुनाटलं,
चिल्लर गळते अधूनमधून पण मला टाकवत नाही ते.
पूर्ण लाल शाईत आलेलं तुझं पत्रं,
वाचतांना ओक्साबोक्सी रडलो खरा पण
दहा मिनिटांनी डोळे पुसत फाडून टाकलं मी ते
डस्टबिनमध्ये,
आता तुझ्यासाठी मी झालोय मिठाचा खडा,
परतलो तर तुझा संसार नासेल,
आणि तू फिरून यायचं म्हटलंस तरी,
ही झाटू दुनिया तुला बदफैली ठरवेल.
मुळात दोन विभिन्नलिंगी माणसात
असू शकत लैगिंकतेपलीकडेही
एक निरामय नातं असं जगातल्या किती
लोकांना वाटतं??
पण आपण भेटूयात जेंव्हा गात्र शिथिल होतील
आणि इंद्रिय सुखाच्या सर्व लालसा मावळतील
अश्या एखाद्या शांत संध्याकाळी.
मी वाचून दाखवीन तुला त्या कविता
ज्या मी मांडल्या नाहीत कधीच कुणासमोर.
आणि करेन तुला आवडणारा
माझ्या हातचा अद्रक मसाल्याच्या पेशल चहा
थरथरणाऱ्या हातांनी..
तोवर life is beautiful म्हणत जगुया..
पण जगुयात मात्र नक्की...

महेंद्र गौतम.