लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

डोह गढूळला कोणी?


चंद्र उगवला पूर्ण
डोह गढूळला कोणी
टीप गाळीत बसल्या
नदीपात्रात हत्तीणी..

उन्ह पाऊस झेलून
उभा मठातला चाफा
त्याच्या बुडाशी बसून
कोण गातं प्रेमगाणी..

नको नजर देऊस
ऐक घरंदाज पोरी
पुढे डोंगर दिसता
होतं काळजाचं पाणी..

तश्या शुभ्र एकांतात
मोह मिठीचा आवर
वाट विंचवाची नांगी
तुझे पाय अनवाणी..

महेंद्र गौतम.

जुईझळा

तुझ्या कापुरक्षणांचा
केव्हढा हा गोतावळा
तुझ्यासाठी काळजात
पेटतात दीपमाळा..

निस्तेजल्या आभाळाला
लागो चांदण्यांचे घड
तुझ्या नावाच्या किती मी
जपल्यात जपमाळा

फाटक्या या पदरात
टाक दान तू सुगंधी
तुझ्यासाठी सोसल्या मी
सांग किती जुईझळा...

धाव धावुनी थकलो
कस्तुरी मी मृग जरी
कधी हाताशी येशील
सांग माझ्या मृगजळा...

महेंद्र गौतम

सीमा

सीमा...
जेंव्हा नव्हत्या या पृथ्वीतलावर कुठल्याच सीमा
तेंव्हा नव्हतं कुठलंच युद्ध
आणि माणूसही नव्हता एव्हढा अशांत आणि अस्वस्थ.

ईथे मशिन्सच नाहीत तर
माणूसही होत गेला
दिवसेंदिवस अधिकाधिक कॉम्पॅक्ट.

आणि जेंव्हा आखत गेला माणूस,
प्रदेशाच्या, धर्माच्या , वर्णाच्या, लिंगाच्या
आणि जातीच्या सीमा...
तेंव्हाच आलं हे अटळ युद्ध
आणि माणूसही होत गेला
अशांत, अस्वस्थ आणि भयगंडग्रस्त.

मला या सीमाच मेंदूतून टाकायच्यात पुसून
कायमच्या.

महेंद्र गौतम

स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा.

शुभेच्छा...
स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा
जनतेला खेळवणाऱ्या खात्या नेत्यांना शुभेच्छा
त्यांना खेळवणाऱ्या मूठभर उद्योजकांना शुभेच्छा
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा..
पुड्यासोडू उडत्या राजाला शुभेच्छा
गटार गॅसच्या बुडबुड्याला शुभेच्छा
आंबेवाल्या मिशाळ बुढ्याला शुभेच्छा
अच्छेदिनच्या गुडगूड्याला शुभेच्छा
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा...
शेळीच्या बलात्काऱ्याला शुभेच्छा
गायीच्या हिरव्या चाऱ्याला शुभेच्छा
पंधरा लाख घेऊन आलेल्या वाऱ्याला शुभेच्छा
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा..
संविधान जाळणाऱ्या देशभक्तांना शुभेच्छा
गायीवाल्या अतिदेशभक्तांना शुभेच्छा
बॉम्ब बनवणाऱ्याला शुभेच्छा
बॉम्ब बाळगणाऱ्यालाही शुभेच्छा
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा...
कुणालाही नक्षलवादी ठरावणाऱ्याला शुभेच्छा
दंगेखोरांना क्लीनचिट देणाऱ्याला शुभेच्छा
बस जाळणाऱ्याला शुभेच्छा
बस फोडणाऱ्याला शुभेच्छा
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा...
खाण्यापिण्यावर बंदी घालणाऱ्याला शुभेच्छा
विचारवंतावर गोळी झाडणाऱ्याला शुभेच्छा
अन खुनाचा तपास करणाऱ्यालाही शुभेच्छा
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा...
"तिकडे सीमेवर सैनिक"वाल्यांना शुभेच्छा
दाजीच्या सगळ्या साल्यांना शुभेच्छा
धरण भरणाऱ्या दादाला शुभेच्छा
गोलंगोल जाणत्या राजाला शुभेच्छा
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा....
किती देऊ सरता सरेनात शुभेच्छा
छाप माप गंधाडया अश्या सगळ्यांना शुभेच्छा..
शुभेच्छा भौ सगळ्यांना शुभेच्छा...

मंगेंद्र गोतगावकर...

विजय असो

त्याला थुंकून विझवायचा होता अक्खाच्या अक्खा सूर्य
पण त्याने गिळून टाकला अवघा सूर्य
आणि शिटू लागला सटासट तेजस्वी दिव्य लेंड्या..
भक्तांनी हरकून केला त्याच्याच नावाचा गजर.
कारण त्यांचा विश्वास होता की तोच देऊ शकतो
त्यांना मजबूत ओर्ग्याझमचं दणकट सुखं.
तो म्हणाला भक्तो,
तुम्हीच आहात माझे सच्चे भक्त
कारण तुमची कितीही ठासून मारली तरी
तुम्हाला गोड वाटत ...
तुम्ही करता माझ्या नावाचा जयजयकार...
माझा विजय असो माझा विजय असो माझा विजय असो..

महेंद्र गौतम.

दुनिया जागी

मी लिहीत जातो शब्द
आणि प्रारब्ध, अधांतर होते.
ही झंकारत ये धूळ
कोण मंजुळ, विराणी गाते.

तू देऊन बघ ना हाक
पुन्हा हकनाक, बळी मी जातो.
का तुटू पाहती बंध
केव्हढा गंध, रानभर होतो.

हे कुठून येती लोट
किती अलोट, या उर्मीलाटा.
हा तलम रुपेरी पार
बोचरा वार, भंगल्या वाटा.

हा किती रोजचा त्रास
कसा वनवास, भोगतो जोगी
ही टकमक एकल रात
कुणाच्या आत ही दुनिया जागी.

महेंद्र गौतम.

पावसाची गझल

सांगू नकोस मित्रा तू बात पावसाची
दांभिक फार असते ही जात पावसाची

बडवून ऊर रडते येथे सदाच छप्पर
जागून काढते घर दर रात पावसाची

चिंता कुणी पिलांची करती वर पाहून
कोणी अघोर गाणी गातात पावसाची

गंधाळल्या मिठयांच्या मी वाहिल्यात होड्या
स्वप्ने पुरात वाहून जातात पावसाची

बसले कसे पिसारे फुलवून 'मोर' सारे
झाली कुठे आताशा सुरवात पावसाची....

महेंद्र गौतम.

पिसा पांडू

पांड्या रे पांड्या
दुकान मांड्या
दुकानाची किल्ली हरवली
पांड्यान बायको झोडपली...
पिसा पांडू दिसला रे दिसला की पोरंटोरं हमखास असा गलका करायची पण पांडू कधी चिडला नाही उलट शेवटी हसत हसत उजव्या हाताची तर्जनी छातीपर्यंत नेऊन नाचवत मान डोलवत ,"पांड्याने बायको झोडपली"म्हणायचा पांडू...
तो कधीतरी भटकत भटकत आमच्या गावात आला आणि मरेपर्यंत गावातच राहिला. लहानपणापासून बघत होतो त्याला.
उन्हाळ्याची सुट्टी पडली की रणरणती दुपार कुलरच्या हवेत पेंगून काढायची पद्धत नव्हती तर तेंव्हा अड्डा पडायचा कैलास विलास मामाच्या ऐसपैस थंडगार गोठ्यात. तिथे असायचा पांडुचा मुक्काम. एका कोपऱ्यात तिथे पांडुचा पांढरा " झोऱ्या" असायचा,रात्रीचा तिथेच झोपायचा तो. मोठी माणसं तरुण पोरं रमी खेळत बसायची आम्ही बारके पोरं त्यांचा डाव पाहायचो नाहीतर मग किटी,बिल तिर्रट,नखादुवा, कोयी अस कायबाय खेळायचो.
बोर झाल की कुणीतरी जाऊन पांडूची खोडी काढायचं तरी तो कायम शांत असायचा. हडकूळा, रापलेला काळपट चेहरा,कायम बारीक कापलेले केस ,अजिबात न वाढलेली दाढी मिशी त्याचं बोलणं गुणगुणल्यासारख नाकातल्या नाकात अन खूप कमी आवाजात. गावात रिकामचोट वात्रट पोरांना चिडवायला त्यावेळी बरेच जण होते जस "ऐ लोड्या तुह्या तोंडात मिश्या" म्हटल्यावर ढोर वळायची काठी घेऊन धावणारा लोडबा, पिंकी बाली म्हटलं की खवटघार पेटीतल्या शिव्या देणाऱ्या दोन म्हाताऱ्या किंवा "किती वाजले" अस विचारल्यावर हातात दगड घेऊन मारायला येणारा एक म्हातारा.पोरं या लोकांची टवाळी करत अन मोठी माणसं पण मज्जा पाहत पण पांडुला कोणी त्रास देताना दिसलं की कोणी तरी कळता माणूस वा म्हातारी माय हमखास म्हणणार,
"ऐ डेंगरहो कहाला तरास देता रं त्या असराप जीवाला?"
त्याचा सकाळचा चहा कुठेही व्हायचा सकाळ झाली की हातात फुटका "कोप" घेऊन कुणाच्याही अंगणात पांडू गेला की आपसूक घरातली बाई त्याला चहा देई, हप्त्यातले तिन्ही दिवस त्याला कोणाकडून ना कोणाकडून वशाट भेटायचं आखाडी असो की होळी त्याच्या जर्मलच्या परातीत गोडधोड यायचचं
तो रस्त्याने बिडीचे थोटकं गोळा करत हिंडायचा आणि कुणाच्याही वतलाच्या जाळावर बिडी पेटवायचा पेटवताना काय करायला पांडू अस विचारलं तर बिडी पेटवायलो जाळ पुढं करू का म्हणून विचारायचा. मुगा उडदाच्या दिवसात उन्हाला शेंगा टाकल्यावर पांडू ढोर येऊ देऊ नको बस उलसक म्हटल्यावर हातात काठी घेऊन देवासारखा पांडू शेंगाची राखणं करत बसायचा एखाद्या मावशीला झोक्यातल पोरं सोडून पाणी भरायचं असेल तर त्याला झोका द्यायला लावून ती माऊली कामं आवरायची.
असच एकदा गोठ्यात बसलेलो असतांना विलास मामा बोलला ये बारक्या तुला गंमत दाखवतो जा जाऊन दोन चार रद्दीचे कागद घेऊन ये, मी असेच पेपरचे तुकडे शोधून आणले मामा पांडूजवळ गेला त्याला बिडी दिली म्हणाला हे वाचून दाखव,
गण्या गण्या गणपती चारी कमळ झळकती पासून बे एक बे पर्यंत आणि क कमळाचा ण बाणांचा पासून क का की पर्यंत चारी कागद त्याने तालासुरात वाचले.
दहावी झाली आणि शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं डिप्लोमाला गेल्यावर त्या दिवसात वाचायचा नाद लागला काहीबाही लिहायला सुरुवात झाली होती आणि महत्वाचं म्हणजे "बघायला आणि ऐकायला" शिकलो होतो summar vacation ला गावात आल्यावर पांडू तसाच दिसायचा. त्याच्या जगण्यात फरक नव्हता. एकदा आमच्या म्हाताऱ्यांच्या अड्ड्यात मी सहज पुंजाबापूला विचारलं,"पांडू आपल्या गावात कव्हा आला?"आणि मग कळली पिश्या पांडूची कहाणी, त्याच गाव नदीच्या पलीकडं चांगला 15 20 एकरचा मालक होता पांडू, घरदार सगळं होत.तेंव्हा जवान होता, तालमीत जायचा, शेतात घाम गाळायचा, जत्रेत कुस्ती धरायचा आणि अश्याच एका जत्रेत एक तमाशाचा फड आला त्यात होती चंद्रकला!!! मस्त देखणी कसकाय कुणास ठाऊक पण तरण्या पांडूच सूत जुळलं तिच्यासोबत. आणि महिन्याभरात निघून गेली याला सोडून. ती गेली तेंव्हापासून पांडू शांत झाला खात नव्हता पित नव्हता फारसा कोणाशी बोलत नव्हता घरी भाऊ भावजयी आणि म्हातारी आई, तरणताठ पोर गुमसुम राहू लागलं एका जागी घुम्यासारखं तासंतास बसू लागलं म्हटल्यावर म्हातारी हादरली अंगारे धुपारे झाले पण पांडू काही सुधारला नाहीच. आई होती तोवर ती करायची जेऊ खाऊ घालायची ती गेली आणि पांडून गाव सोडलं भटकत भटकत आमच्या गावी आला आणि इथंच राहिला.
मला कळल्यावर मग मी त्याला हटकून बोलायचो मजूर बिडीचं बंडल द्यायचो एकदिवस त्याला रद्दी देऊन बोललो हे चंद्राचं पत्र आलंय तुला.त्यानं निर्विकारपणे तो कागद हातात घेतला शून्यात बघावं तसं कागदाकडं बघत राहिला मी म्हटलं वाच ना मोठ्यानं
प्रिय पांडुरंग आम्ही  सुखरूप आहोत तू लग्न कर आणि सुखी राहा
काळजात चर्र झालं त्यानं बिडी शिलगावली आणि मोठा दम घेतला पुन्हा विझल्या डोळ्यांनी धुराकडं बघत राहिला. मी म्हटलं चंद्रा कव्हा गेली पांडू?
चांगली व्हती गेली बिचारी पोटामाग पांडू उदास हसला,जाताना म्हणी पोरगी पाह्य लगन कर अन सुखी राह्य...
त्याच्या एकदोन वर्षांनी पांडू गेला मी कॉलेजलाच होतो पोरांनी डफडं लावून वाजत गाजत पांडूला निरोप दिला झाडून सगळे माणसं त्याच्या अंत्ययात्रेत होते गेला तेंव्हा थोडा आजारी होता पण झोपेत असतांनाच कुठल्याच त्रासाविणा तो गेला शांतपणे.
शिक्षण आणि करिअर साठी गाव सोडलं शहर सेमी मेट्रो आणि शेवटी  मेट्रोसिटीत येऊन स्थिरावलो, one night stand आणि कपडे बदलतात तसे gf bf बदलणाऱ्या दुनियेत कधीतरी निरपेक्ष प्रेम करून वेडा झालेला पांडू हटकून आठवतो आणि करमत नाही बराचवेळ....
महेंद्र गौतम.

युद्ध

युद्ध कधीच संपलं नव्हतं
आणि हे युद्ध कधीच संपणार नाही कदाचित..
मित्रा, जिथे हक्कही दिल्या जातो
भीक दिल्याच्या अविर्भावात,
जिथला मारेकरी घालतो उघड हौदोस
जिथे खुनी निर्दोष सुटून फिरतात
उजळमाथ्याने राजाच्याच संमतीने.
जिथे पिडितांच्या उरातला उद्रेक उसळल्यावर
त्यांनाच डांबल्या जात तुरुंगात.
विचारांची लढाई विचारानं लढावी हे सर्वसंमत असतांना
जिथे शुद्ध तार्किक प्रतिवाद करणाऱ्याला
भ्याडपणे घातल्या जाते गोळी
जिथे खुन्याचं केलं जातं निर्लज्ज समर्थन
आणि सत्याचे पहारेकरीच आरोपींना पाठीशी घालत
निरपराधांची डोकी फोडतात
अश्या प्रदेशात युद्ध अटळ असतं.
इथे स्वखुशीने जन्मत नसतो
कुणी बागी मानसिंग किंवा तुकाराम वा ढसाळ
आणि आनंदाने भिरकावीत नसतो
कोणताच जब्या दगडसुद्धा.
युद्धातही असतो फरक
माझ्या प्रिय दांभिक,पक्षपाती
आणि सोईस्कर सहिष्णू असणाऱ्या पाखंडी मित्रा,
कुणी शोषणासाठी युद्ध करतं
तर कुणी शांततेने माणूस म्हणून जगायला मिळावं म्हणून.
महेंद्र गौतम.

पाखर गाणी गाणार आहेत 5

पाखरांनो...
परत गोंदवून घेऊ आता कपाळावर
एक टळटळीत सूर्यबिंब,
अन परत मनात ढळढळीत बिंबवू
की आपण आहोत झुंजार विजिगीषु
पूर्वजांचे वारस,
ज्यांनी हजारो वर्षे अन्याय सोसून
जीवघेणे अत्याचार पचवून
जीवट आशेनं अन निकरांन
मिटू दिलं नाही आपल्या अस्तित्वाचं निशाण.
इथला भ्याड कसाई नव्यानं जागा झालाय
आपल्याला थव्यावेगळं करून टिपण्यासाठी
बुद्धीभ्रमाचे असंख्य जाळे फेकल्या जातायेत
आपल्यावर निरंतर,
संभ्रम अन अनुल्लेखाच्या कैच्या सारसावतायत
आपल्या पंखांना छाटण्यासाठी,
आणि परत आवळल्या जातोय फास
कंठाभोवती नेहमीप्रमाणे,
ही माजलेली शोषणाधिष्टीत व्यवस्था
परत नंगानाच करेलंस दिसतंय,
आता ह्या पक्षपाती संस्कृतीच्या
छाताडावर नाचायला हवं
तेंव्हा चोची तासून घेऊ,
नख्यांना धार लावू नव्याने
पाखरांनो उरात श्वास भरून
मुक्तीचा उद्घोष करू
आता कंठरवान  संपूर्ण समानतेचं गाणं गाऊ..
महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected