लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

युद्ध

युद्ध कधीच संपलं नव्हतं
आणि हे युद्ध कधीच संपणार नाही कदाचित..
मित्रा, जिथे हक्कही दिल्या जातो
भीक दिल्याच्या अविर्भावात,
जिथला मारेकरी घालतो उघड हौदोस
जिथे खुनी निर्दोष सुटून फिरतात
उजळमाथ्याने राजाच्याच संमतीने.
जिथे पिडितांच्या उरातला उद्रेक उसळल्यावर
त्यांनाच डांबल्या जात तुरुंगात.
विचारांची लढाई विचारानं लढावी हे सर्वसंमत असतांना
जिथे शुद्ध तार्किक प्रतिवाद करणाऱ्याला
भ्याडपणे घातल्या जाते गोळी
जिथे खुन्याचं केलं जातं निर्लज्ज समर्थन
आणि सत्याचे पहारेकरीच आरोपींना पाठीशी घालत
निरपराधांची डोकी फोडतात
अश्या प्रदेशात युद्ध अटळ असतं.
इथे स्वखुशीने जन्मत नसतो
कुणी बागी मानसिंग किंवा तुकाराम वा ढसाळ
आणि आनंदाने भिरकावीत नसतो
कोणताच जब्या दगडसुद्धा.
युद्धातही असतो फरक
माझ्या प्रिय दांभिक,पक्षपाती
आणि सोईस्कर सहिष्णू असणाऱ्या पाखंडी मित्रा,
कुणी शोषणासाठी युद्ध करतं
तर कुणी शांततेने माणूस म्हणून जगायला मिळावं म्हणून.
महेंद्र गौतम.

पाखर गाणी गाणार आहेत 5

पाखरांनो...
परत गोंदवून घेऊ आता कपाळावर
एक टळटळीत सूर्यबिंब,
अन परत मनात ढळढळीत बिंबवू
की आपण आहोत झुंजार विजिगीषु
पूर्वजांचे वारस,
ज्यांनी हजारो वर्षे अन्याय सोसून
जीवघेणे अत्याचार पचवून
जीवट आशेनं अन निकरांन
मिटू दिलं नाही आपल्या अस्तित्वाचं निशाण.
इथला भ्याड कसाई नव्यानं जागा झालाय
आपल्याला थव्यावेगळं करून टिपण्यासाठी
बुद्धीभ्रमाचे असंख्य जाळे फेकल्या जातायेत
आपल्यावर निरंतर,
संभ्रम अन अनुल्लेखाच्या कैच्या सारसावतायत
आपल्या पंखांना छाटण्यासाठी,
आणि परत आवळल्या जातोय फास
कंठाभोवती नेहमीप्रमाणे,
ही माजलेली शोषणाधिष्टीत व्यवस्था
परत नंगानाच करेलंस दिसतंय,
आता ह्या पक्षपाती संस्कृतीच्या
छाताडावर नाचायला हवं
तेंव्हा चोची तासून घेऊ,
नख्यांना धार लावू नव्याने
पाखरांनो उरात श्वास भरून
मुक्तीचा उद्घोष करू
आता कंठरवान  संपूर्ण समानतेचं गाणं गाऊ..
महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected