लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पिसा पांडू

पांड्या रे पांड्या
दुकान मांड्या
दुकानाची किल्ली हरवली
पांड्यान बायको झोडपली...
पिसा पांडू दिसला रे दिसला की पोरंटोरं हमखास असा गलका करायची पण पांडू कधी चिडला नाही उलट शेवटी हसत हसत उजव्या हाताची तर्जनी छातीपर्यंत नेऊन नाचवत मान डोलवत ,"पांड्याने बायको झोडपली"म्हणायचा पांडू...
तो कधीतरी भटकत भटकत आमच्या गावात आला आणि मरेपर्यंत गावातच राहिला. लहानपणापासून बघत होतो त्याला.
उन्हाळ्याची सुट्टी पडली की रणरणती दुपार कुलरच्या हवेत पेंगून काढायची पद्धत नव्हती तर तेंव्हा अड्डा पडायचा कैलास विलास मामाच्या ऐसपैस थंडगार गोठ्यात. तिथे असायचा पांडुचा मुक्काम. एका कोपऱ्यात तिथे पांडुचा पांढरा " झोऱ्या" असायचा,रात्रीचा तिथेच झोपायचा तो. मोठी माणसं तरुण पोरं रमी खेळत बसायची आम्ही बारके पोरं त्यांचा डाव पाहायचो नाहीतर मग किटी,बिल तिर्रट,नखादुवा, कोयी अस कायबाय खेळायचो.
बोर झाल की कुणीतरी जाऊन पांडूची खोडी काढायचं तरी तो कायम शांत असायचा. हडकूळा, रापलेला काळपट चेहरा,कायम बारीक कापलेले केस ,अजिबात न वाढलेली दाढी मिशी त्याचं बोलणं गुणगुणल्यासारख नाकातल्या नाकात अन खूप कमी आवाजात. गावात रिकामचोट वात्रट पोरांना चिडवायला त्यावेळी बरेच जण होते जस "ऐ लोड्या तुह्या तोंडात मिश्या" म्हटल्यावर ढोर वळायची काठी घेऊन धावणारा लोडबा, पिंकी बाली म्हटलं की खवटघार पेटीतल्या शिव्या देणाऱ्या दोन म्हाताऱ्या किंवा "किती वाजले" अस विचारल्यावर हातात दगड घेऊन मारायला येणारा एक म्हातारा.पोरं या लोकांची टवाळी करत अन मोठी माणसं पण मज्जा पाहत पण पांडुला कोणी त्रास देताना दिसलं की कोणी तरी कळता माणूस वा म्हातारी माय हमखास म्हणणार,
"ऐ डेंगरहो कहाला तरास देता रं त्या असराप जीवाला?"
त्याचा सकाळचा चहा कुठेही व्हायचा सकाळ झाली की हातात फुटका "कोप" घेऊन कुणाच्याही अंगणात पांडू गेला की आपसूक घरातली बाई त्याला चहा देई, हप्त्यातले तिन्ही दिवस त्याला कोणाकडून ना कोणाकडून वशाट भेटायचं आखाडी असो की होळी त्याच्या जर्मलच्या परातीत गोडधोड यायचचं
तो रस्त्याने बिडीचे थोटकं गोळा करत हिंडायचा आणि कुणाच्याही वतलाच्या जाळावर बिडी पेटवायचा पेटवताना काय करायला पांडू अस विचारलं तर बिडी पेटवायलो जाळ पुढं करू का म्हणून विचारायचा. मुगा उडदाच्या दिवसात उन्हाला शेंगा टाकल्यावर पांडू ढोर येऊ देऊ नको बस उलसक म्हटल्यावर हातात काठी घेऊन देवासारखा पांडू शेंगाची राखणं करत बसायचा एखाद्या मावशीला झोक्यातल पोरं सोडून पाणी भरायचं असेल तर त्याला झोका द्यायला लावून ती माऊली कामं आवरायची.
असच एकदा गोठ्यात बसलेलो असतांना विलास मामा बोलला ये बारक्या तुला गंमत दाखवतो जा जाऊन दोन चार रद्दीचे कागद घेऊन ये, मी असेच पेपरचे तुकडे शोधून आणले मामा पांडूजवळ गेला त्याला बिडी दिली म्हणाला हे वाचून दाखव,
गण्या गण्या गणपती चारी कमळ झळकती पासून बे एक बे पर्यंत आणि क कमळाचा ण बाणांचा पासून क का की पर्यंत चारी कागद त्याने तालासुरात वाचले.
दहावी झाली आणि शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं डिप्लोमाला गेल्यावर त्या दिवसात वाचायचा नाद लागला काहीबाही लिहायला सुरुवात झाली होती आणि महत्वाचं म्हणजे "बघायला आणि ऐकायला" शिकलो होतो summar vacation ला गावात आल्यावर पांडू तसाच दिसायचा. त्याच्या जगण्यात फरक नव्हता. एकदा आमच्या म्हाताऱ्यांच्या अड्ड्यात मी सहज पुंजाबापूला विचारलं,"पांडू आपल्या गावात कव्हा आला?"आणि मग कळली पिश्या पांडूची कहाणी, त्याच गाव नदीच्या पलीकडं चांगला 15 20 एकरचा मालक होता पांडू, घरदार सगळं होत.तेंव्हा जवान होता, तालमीत जायचा, शेतात घाम गाळायचा, जत्रेत कुस्ती धरायचा आणि अश्याच एका जत्रेत एक तमाशाचा फड आला त्यात होती चंद्रकला!!! मस्त देखणी कसकाय कुणास ठाऊक पण तरण्या पांडूच सूत जुळलं तिच्यासोबत. आणि महिन्याभरात निघून गेली याला सोडून. ती गेली तेंव्हापासून पांडू शांत झाला खात नव्हता पित नव्हता फारसा कोणाशी बोलत नव्हता घरी भाऊ भावजयी आणि म्हातारी आई, तरणताठ पोर गुमसुम राहू लागलं एका जागी घुम्यासारखं तासंतास बसू लागलं म्हटल्यावर म्हातारी हादरली अंगारे धुपारे झाले पण पांडू काही सुधारला नाहीच. आई होती तोवर ती करायची जेऊ खाऊ घालायची ती गेली आणि पांडून गाव सोडलं भटकत भटकत आमच्या गावी आला आणि इथंच राहिला.
मला कळल्यावर मग मी त्याला हटकून बोलायचो मजूर बिडीचं बंडल द्यायचो एकदिवस त्याला रद्दी देऊन बोललो हे चंद्राचं पत्र आलंय तुला.त्यानं निर्विकारपणे तो कागद हातात घेतला शून्यात बघावं तसं कागदाकडं बघत राहिला मी म्हटलं वाच ना मोठ्यानं
प्रिय पांडुरंग आम्ही  सुखरूप आहोत तू लग्न कर आणि सुखी राहा
काळजात चर्र झालं त्यानं बिडी शिलगावली आणि मोठा दम घेतला पुन्हा विझल्या डोळ्यांनी धुराकडं बघत राहिला. मी म्हटलं चंद्रा कव्हा गेली पांडू?
चांगली व्हती गेली बिचारी पोटामाग पांडू उदास हसला,जाताना म्हणी पोरगी पाह्य लगन कर अन सुखी राह्य...
त्याच्या एकदोन वर्षांनी पांडू गेला मी कॉलेजलाच होतो पोरांनी डफडं लावून वाजत गाजत पांडूला निरोप दिला झाडून सगळे माणसं त्याच्या अंत्ययात्रेत होते गेला तेंव्हा थोडा आजारी होता पण झोपेत असतांनाच कुठल्याच त्रासाविणा तो गेला शांतपणे.
शिक्षण आणि करिअर साठी गाव सोडलं शहर सेमी मेट्रो आणि शेवटी  मेट्रोसिटीत येऊन स्थिरावलो, one night stand आणि कपडे बदलतात तसे gf bf बदलणाऱ्या दुनियेत कधीतरी निरपेक्ष प्रेम करून वेडा झालेला पांडू हटकून आठवतो आणि करमत नाही बराचवेळ....
महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected